राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जुलै २०२३ या महिन्यात उभी फूट पडली आहे. अजित पवार आणि त्यांना पाठिंबा देणारे आमदार यांनी सत्तेत सहभागी होणं पसंत केलं आहे. अजित पवार यांनी २ जुलै २०२३ या दिवशी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आणि ते महायुतीत सहभागी झाले. तेव्हापासून राष्ट्रवादीत दोन गट पडले आहेत. एक आहे शरद पवार गट तर दुसरा आहे अजित पवार गट.

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट

या दोन्ही गटांचा वाद निवडणूक आयोगात गेला तेव्हा निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे नाव आणि घड्याळ हे चिन्ह अजित पवारांना दिलं आहे. तर शरद पवार यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार हे नाव दिलं आहे तर तुतारी वाजवणारा माणूस हे पक्षचिन्ह दिलं आहे. अशात लोकसभा निवडणूक आल्यानंतर दोन्ही गटांनी निवडणुकीची तयारी सुरु केली आहे. शरद पवार आणि त्यांचा पक्ष महाविकास आघाडीत आहे. तर अजित पवार सत्तेत आहेत.

सातत्याने अजित पवारांवर होते आहे टीका

अजित पवारांनी वेगळा निर्णय घेतल्यापासून त्यांच्यावर सातत्याने पक्ष चोरल्याची टीका होते आहे. तसंच अजित पवार सोडून गेले, त्यांनी वेगळा निर्णय घेतला अशीही टीका होते आहे. काही दिवसांपूर्वीच अजित पवारांचे बंधू श्रीनिवास पवार यांनीही अजितला साथ देणार नाही असं म्हटलं होतं. लोकसभा निवडणुकीत बारामती मतदारसंघात सुनेत्रा पवार विरुद्ध सुप्रिया सुळे असा सामना रंगण्याची चिन्हं आहेत. अशात सुनेत्रा पवार यांनी पहिल्यांदाच या सगळ्या परिस्थितीवर भाष्य केलं आहे.

हे पण वाचा- “नात्यांची एक्सपायरी डेट असते”, म्हणणाऱ्या श्रीनिवास पवारांना सूज्ञ बारामतीकरांचं पत्र, “नालायक…”

काय म्हटलं आहे सुनेत्रा पवार यांनी?

“अनेक वर्षांपासून शरद पवारही हे सांगत आले आहेत की व्यक्ती स्वातंत्र्य प्रत्येकाला मिळालं पाहिजे. आपण संविधानाच्या गोष्टी करतो, लोकशाही म्हणतो. लोकशाही असेल तर अजित पवारांनी जी भूमिका घेतली तेव्हा त्यांच्याबरोबर राष्ट्रवादीच्या स्थापनेपासूनचे ८० टक्के लोक अजित पवारांसह आले. पक्षातले ८० टक्के लोक जर अजित पवारांसह आले आहेत, लोकशाही आहे तर मग पक्ष चोरला किंवा सोडून गेला, चुकीचं वागला असं कसं काय म्हणता येईल. जर लोकशाहीच्या गप्पा आपण मारतो तर लोकशाही नक्की कशाला म्हणायचं?” असे प्रश्न विचारत सुनेत्रा पवार यांनी पहिल्यांदाच शरद पवार आणि त्यांच्यासह असलेल्या नेत्यांना प्रश्न विचारला आहे.