-
जगदीप धनखड यांची उपराष्ट्रपती म्हणून निवड झाली आहे. या निवडणुकीत त्यांनी मार्गारेट अल्वा यांचा पराभव केला. ११ ऑगस्ट रोजी ते उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेणार आहेत.
-
राजस्थानमधील झुंझुनू या छोट्या जिल्ह्यातून देशातील दुसऱ्या क्रमांकाच्या सर्वोच्च पदापर्यंतचा प्रवास करणाऱ्या जगदीप धनखड यांनी आयुष्यात अनेक चढउतारांचा सामना केला. आज ते उपराष्ट्रपती झाले आहेत. त्यांचा आतापर्यंतचा राजकीय प्रवास कसा होता, जाणून घेऊया.
-
जगदीप धनखड यांचा जन्म १८ मे १९५१ रोजी राजस्थानमधील झुंझुनू जिल्ह्यातील किठाणा या गावात झाला. चार भावंडांमध्ये ते दुसऱ्या क्रमांकावर आहेत. त्यांचे सुरुवातीचे शिक्षण किठाणा गावातील शासकीय माध्यमिक विद्यालयातून झाले. गावातून पाचवीपर्यंत शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी गरधना येथील शासकीय माध्यमिक विद्यालयात प्रवेश घेतला. पुढे त्यांनी चित्तौडगड येथील सैनिक स्कूलमध्येही शिक्षण घेतले.
-
बारावीनंतर त्यांनी भौतिकशास्त्रात पदवी संपादन केली. त्यानंतर त्यांनी कायद्याचे शिक्षणही पूर्ण केले. पुढे त्यांची आयआयटी आणि नंतर एनडीएसाठी निवड झाली होती. मात्र, त्यांनी प्रवेश घेतला नाही. पदवीनंतर त्यांनी देशातील सर्वात मोठी नागरी सेवा परीक्षाही उत्तीर्ण केली होती. मात्र, आयएएस होण्याऐवजी त्यांनी कायद्याचा व्यवसाय निवडला. राजस्थान उच्च न्यायालयातून त्यांनी वकिली सुरू केली. ते राजस्थान बार कौन्सिलचे अध्यक्षही होते.
-
धनखड यांनी आपल्या राजकारणाची सुरुवात जनता दलमधून केली. ते १९८९ मध्ये झुंझुनूमधून ते पहिल्यांदा खासदार म्हणून निवडून आले. १९८९ ते १९९१ या काळात व्हीपी सिंह आणि चंद्रशेखर यांच्या सरकारमध्ये ते केंद्रीय मंत्रीही होते. मात्र, १९९१ च्या लोकसभा निवडणुकीत जनता दलने जगदीप धनखड यांचे तिकीट कापल्याने त्यांनी पक्ष सोडला आणि काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि १९९३ मध्ये अजमेरमधील किशनगडमधून काँग्रेसच्या तिकीटावर निवडणूक लढवली आणि आमदार झाले.
-
२००३ मध्ये त्यांचे काँग्रेसमध्येही मदभेद झाले आणि त्यांनी काँग्रेससोडून भाजपमध्ये प्रवेश केला. २०१९ मध्ये त्यांना पश्चिम बंगालचे राज्यपाल बनवण्यात आले. आता त्यांची देशाचे १४वे उपराष्ट्रपती म्हणून निवड झाली आहे. ते ११ ऑगस्टरोजी उपराष्ट्रपती म्हणून शपथ घेतील.

दिल्लीतील बंगाली कुटुंबाची बांगलादेशला रवानगी; नातेवाईक म्हणाले, “ते तर आपलेच नागरिक, त्यांना परत कोण आणणार?”