-
अमेरिकेतील महत्त्वाच्या अशा न्यूयॉर्क शहराच्या महापौरपदासाठी भारतीय वंशाचा नेता जोहरान ममदानी याला पंसती मिळत आहे. डेमोक्रॅटिक पक्षाकडून निवडणूक लढवत असलेल्या जोहरान ममदानी यांना मोठा पाठिंबा मिळत आहे.
-
रिपब्लिकन पक्षाचे नेते आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सुरुवातीपासून जोहरान ममदानी यांना विरोध केला. मात्र आता निवडणुकीच्या तोंडावर ममदानी यांची प्रसिद्धी कमी होत नसल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी थेट उघड धमकी दिली आहे.
-
जोहरान ममदानी यांचे आई-वडील भारतीय आहेत. त्यांचे वडील महमूद ममदानी युगांडात शिक्षणतज्ज्ञ होते. तर आई मीरा नायर भारतीय चित्रपट निर्मात्या आहेत.
-
जोहरान यांचा जन्म आणि संगोपन युगांडातील कंपाला येथे झाले आहे. ते सात वर्षांचे असताना आपल्या पालकांसह न्यू यॉर्कला स्थलांतरित झाले.
-
२०१८ मध्ये जोहरान ममदानी यांना अमेरिकन नागरिकत्व मिळाले आणि त्यांनी या नुकतेच सीरियन कलाकार रामा दुवाजीशी लग्न केले आहे.
-
जोहरान ममदानी यांनी अमेरिकेमधील मेन राज्यातील बोडोइन कॉलेजमधून आफ्रिकाना स्टडीजमध्ये बॅचलर पदवी मिळवली आहे. राजकारणात येण्यापूर्वी त्यांनी एक सल्लागार म्हणून काम केले. ममदानी यांनी रॅप आणि लेखन क्षेत्रातही काम केले आहे.
-
न्यूयॉर्क शहराच्या महापौरपदासाठी ते निवडणुकीला उभे राहिले आहेत. जगातील सर्वांत महागड्या शहरांपैकी एक अशी न्यूयॉर्क शहराची ओळख आहे. शहरात भाडे आणि किराणा मालाच्या किमती कमी करणे यांसारख्या धोरणांवर ते लक्ष केंद्रित करणार असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
-
जोहरान ममदानी हे कम्युनिस्ट असल्याचा आरोप डोनाल्ड ट्रम्प वारंवार करत आले आहेत. जोहरान ममदानी हा कम्युनिस्ट आहे. त्याच्याशी स्पर्धा करताना मला मजा येईल, असे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प मागे म्हणाले होते.
-
जोहरान ममदानी यांनी ट्रम्प यांच्या विधानावर प्रत्युत्तर देताना म्हटले की, मी ट्रम्प यांना सांगू इच्छितो की मी कम्युनिस्ट नाही. मी कोण आहे, कसा दिसतो, कुठून आलो आहे यावर ट्रम्प कशाला बोलत आहेत? माझ्यावर मार्टिन ल्यूथर किंग ज्युनिअर यांचा प्रभाव आहे. त्यांनी म्हटले होते लोकशाहीत लोकशाहीयुक्त समाजवाद असला पाहिजे.
-
नुकतेच डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले की, ममदानी न्यूयॉर्कच्या महापौरपदी निवडून आल्यास या शहराला मिळणारा निधी मी देणार नाही. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, ममदानी हे न्यूयॉर्क शहरातील स्वयंघोषित कम्युनिस्ट आहेत. ते जर महापौरपदाची निवडणूक जिंकले तर त्यांना वॉशिंग्टनकडून विरोधाचा सामना करावा लागेल.
-
न्यूयॉर्क सारख्या महान शहराच्या महापौराने इतिहासात कधीही वॉशिंग्टनशी वैर घेतले नव्हते. मात्र ममदानी यांच्यामुळे अनेक प्रश्न निर्माण होतील. लक्षात ठेवा, महापौर म्हणून निवडून आल्यावर त्यांना त्यांच्या कम्युनिस्ट आश्वासनांची पूर्तता करण्यासाठी माझ्याकडूनच निधीची गरज भासेल. त्यांना अजिबात निधी दिला जाणार नाही. मग त्यांना मतदान करण्यात काय अर्थ आहे?, असे डोनाल्ड ट्रम्प म्हणाले.

“…म्हणून मुंबई हल्ल्यानंतर पाकिस्तानवर कारवाई केली नाही”, अमेरिकेचं नाव घेत चिदंबरम यांचा मोठा दावा