-
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेली फूट सध्या राज्यात चर्चेचा विषय ठरली आहे. आज त्याचे पडसाद राज्याच्या राजकारणात उमटताना पाहायला मिळाले. एका दिवशी एकीकडे अजित पवार गट तर दुसरीकडे शरद पवार गट या दोघांची एकाच वेळी बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीत बोलताना अजित पवारांनी त्यांची सविस्तर भूमिका स्पष्ट केली. यावेळी त्यांनी शरद पवारांवर टीकाही केली.
-
“२०१४मध्ये प्रफुल्लभाईंचं शरद पवारांशी बोलणं झालं. नंतर प्रफुल्लभाईंनी जाहीर केलं की आम्ही बाहेरून भाजपाला पाठिंबा देतो. आम्ही गप्प बसलो. का? तर नेत्यांचा निर्णय आहे. पण देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले. “
-
“आम्हाला सांगितलं की सगळ्यांनी वानखेडेला शपथविधीला जा. नरेंद्र मोदी मला ओळखतात. ते आमच्याशी बोलले. तेव्हा त्यांच्याबरोबर जायचं नव्हतं तर आम्हाला तिथे का पाठवलं? मंत्रिमंडळाच्या शपथविधीला का पाठवलं?” असा सवाल अजित पवारांनी शरद पवारांच्या निर्णयावर उपस्थित केला.
-
“२०१७ ला वर्षा बंगल्यावर चर्चा झाली. मी, सुनील तटकरे, जयंत पाटील आणि अजून एक असे चार जण होतो. समोर सुधीर मुनगंटीवार, देवेंद्र फडणवीस, विनोद तावडे, चंद्रकांत पाटील हे चौघं होते. कुठली खाती, कुठले पालकमंत्रीपदं हे सगळं ठरलं होतं. मी खोटं बोलत नाही. खोटं बोललो तर पवाराची औलाद सांगणार नाही. “
-
“आम्हाला निरोप आला. सुनील तटकरेंना दिल्लीला बोलवलं. त्यांच्या वरिष्ठांनी सांगितलं २५ वर्षांचा आमचा मित्रपक्ष असणाऱ्या शिवसेनेला आम्ही सोडणार नाही. ते म्हणाले शिवसेनाही आघाडीत राहील. आपल्या वरिष्ठांना ते मान्य नव्हतं. ते म्हणाले ‘शिवसेना आम्हाला चालणार नाही. शिवसेना जातीवादी आहे”, अशा शब्दांत अजित पवारांनी त्यावेळच्या घटना सांगितल्या.
-
“”२०१९ला निकाल लागले, मोठ्या उद्योगपतीच्या घरी आपले वरिष्ठ नेते, प्रफुल्ल पटेल, ते उद्योगपती, भाजपाचे वरिष्ठ नेते, मी, देवेंद्र फडणवीस सगळी चर्चा झाली. पाच बैठका झाल्या. मला आणि देवेंद्रला आपल्या नेत्यांनी सांगितलं की कुठे बोलायचं नाही. मग मी का बोलेन कुठे? नंतर अचानक बदल झाला आणि सांगितलं की आपण शिवसेनेबरोबर जायचंय.”
-
“मला सांगा, २०१७ला शिवसेना जातीवादी असल्याचं सांगत त्यांच्याबरोबर जायचं नाही असं म्हटलं. मग असा काय चमत्कार झाला की दोन वर्षांनी शिवसेना मित्रपक्ष झाला? ज्या भाजपाबरोबर जायच होतं तो जातीवादी कसा झाला?” असा सवाल अजित पवारांनी उपस्थित केला.
-
“मला लोकांच्या समोर व्हिलन का केलं जातं कळत नाही? काय माझी चूक आहे? या सगळ्या गोष्टी होत आहेत पण शरद पवार हे माझं दैवत आहेत. पण तुम्हीच मला सांगा एखादा माणूस महाराष्ट्र सरकारमध्ये नोकरीमध्ये लागला तर ५८ व्या वर्षी रिटायर्ड होतो. IAS, IPS असेल तर ६० व्या वर्षी रिटायर्ड होतात. राजकारणात असेल तर भाजपात ७५ व्या वर्षी रिटायर्ड केलं जातं. मुरली मनोहर जोशी आणि लालकृष्ण आडवाणी ही उदाहरणं आहेत असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.
-
“नंतरच्या काळात आता नवी पिढी पुढे येते आहे. तुम्ही आशीर्वाद द्या ना.. चुकलं तर सांगा की अजित तुझं हे चुकलं. चूक मान्य करुन दुरुस्त करुन पुढे जाऊ. पण हे कुणासाठी चाललं आहे? आम्ही कुणाच्या पोटी जन्माला आलो नाही ही आमची चूक आहे का?”
-
“मित्रांनो आज आपले वरिष्ठ नेते यशवंत राव चव्हाण यांच्या समाधीचं दर्शन घ्यायला गेले होते. यशवंतराव हे आपलं दैवतच आहेत. माझ्याकडूनही चूक झाली होती तेव्हा मी एक दिवस आत्मक्लेश केला होता. मला माझंच वागणं मनाला लागलं होतं. आता जर वय जास्त झालं ८२ झालं, ८३ झालं तर तुम्ही कधी थांबणार आहात का? वयाच्या बाबतीत तर आम्हाला वाटतं की तुम्ही शतायुषी व्हावं.”
-
“मला हे सांगण्यात आलं की मी राजीनामा देतो, संस्था बघतो. त्यानंतर एक कमिटी करतो, त्या कमिटीत तुम्ही सगळे प्रमुख बसा. ते बसून सुप्रियाला राष्ट्रीय अध्यक्ष करा सांगितलं त्यालाही आम्ही तयार झालो. त्यानंतर दोन दिवसांत काय घडलं कुणास ठाऊक? त्यानंतर त्यांनी राजीनामा मागे घेतला. राजीनामा मागे घ्यायचा होता तर दिला कशाला? “
-
“मला महाराष्ट्राने सांगावं की आमच्यात धमक आहे की नाही? जे प्रमुख नेते म्हणून पाहिले जातात त्यात माझं नाव शेवटी का होईना येतं ना? मग मला का आशीर्वाद का दिला जात नाही. शेतकरीही ६० वर्षांचा झाला की २५ वर्षांच्या मुलाला सांगितलं जातं आता शेती तू बघायची आणि आम्ही तुला सल्ला देऊ.”
-
“मी सुप्रियाशीही बोललो, सुप्रिया आपण एका घरातले, एका कुटुंबातले आहोत त्यांना काहीतरी सांग. त्यावर सुप्रिया म्हणाली ते हट्टी आहेत. हा नेमका कसला हट्ट आहे? शरद पवारांविषयी आम्हाला खूप आदर आहे. आत्ता सांगितलं की काही काही आमदारांना बोलवलं जातं. ते भेटले नाही तर त्यांच्या पत्नींना फोन केला जातो भावनिक केलं जातं. मी नाव घेत नाही वरिष्ठ नेत्याने एका आमदाराला सांगितलं की का तिकडे जातो. त्याने हात जोडून सांगितलं आम्ही दादांना शब्द दिला आहे.”
-
“३० वर्षांच्या राजकीय जीवनात अनेकदा माघार घेतली. अनेकदा आमच्यावर गुगली टाकली. तरी सहन केली. अनेकदा आम्हाला सांगितलं एक आणि निर्णय झाला एक. मी रोखठोक बोलणारा कार्यकर्ता आहे”, असंही अजित पवार म्हणाले.

CM Devendra Fadnavis: “उद्धव ठाकरे तुम्हाला इकडे यायचे असल्यास…”, मुख्यमंत्री फडणवीसांची सभागृहातच ऑफर, नेमके काय म्हणाले?