पुणे : शहराच्या दीर्घकालीन हितासाठी गतिमान वाहतूक आराखड्याचा ‘संकल्प’ सोडलेले पुणे लोकसभा मतदारसंघाचे ‘महायुती’चे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांना गुरुवारी स्वत:ला वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला. परिणामी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बाणेर येथील सायंकाळच्या सभेस ते पोहोचूच शकले नाहीत, तर पर्वती विधानसभा मतदारसंघातील सभेस ते उशिराने पोहोचले.

शहरातील वाहतुकीच्या समस्येने उग्र रूप धारण केले असून, पुणेकरांची यामुळे रोज कोंडी होत आहे. विशेषत: बाणेर भागात तर सायंकाळी वाहनांच्या मोठमोठ्या रांगा बराच काळ पुढेच सरकत नाहीत. वाहतूक कोंडीची ही समस्या सोडविण्यासाठी उपाययोजना करण्याच्या आश्वासनाचा समावेश मोहोळ यांच्या नुकत्याच प्रकाशित झालेल्या ‘संकल्पपत्रा’तही आहे. त्यांना गुरुवारी याच वाहतूक कोंडीचा फटका बसला. मोहोळ यांनी अखेर दिलगिरी व्यक्त करणारा संदेश बाणेर येथील सभास्थानी पाठवला, जो निवेदकाने वाचून दाखवला.

हेही वाचा : मुदतपूर्व जन्म, सहाशे ग्रॅम वजन अन् शंभर दिवस रुग्णालयात…कसा यशस्वी झाला चिमुकल्याचा जगण्याचा संघर्ष?

बाणेर येथील सभेनंतर पर्वती विधानसभा मतदारसंघात सभा होती. मात्र, वाहतूक कोंडीतून वाट काढून तेथे पोहोचायलाही मोहोळ यांना उशीर झाला. त्यामुळे तेथेही उमेदवाराच्या भाषणाआधी बोलण्याची वेळ देवेंद्र फडणवीस यांच्यावर आली. ‘आपले उमेदवार मुरलीधर मोहोळ यांचा मला दूरध्वनी आला. मी पोहोचतो आहे; तुम्ही दहा मिनिटांनी बोलायला उभे राहा, असे ते म्हणाले. त्यावर मी त्यांना म्हणालो, की लोक येथे सभेसाठी दोन तासांपासून थांबले आहेत. आधी मी बोलतो. तुम्ही माझ्या भाषणानंतर बोला. लोक तुमचे म्हणणे ऐकतील,’ अशा शब्दांत फडणवीस यांनी मोहोळ यांची बाजू सांभाळून घेतली. अखेर, फडणवीस यांचे भाषण सुरू असतानाच मोहोळ यांचे व्यासपीठावर आगमन झाले.

हेही वाचा : पुण्यात दररोज एक जण गमावतोय जीव! शहरातील रस्त्यांवर रोज किती अपघात?

‘शरद पवार यांचे अंत:करण उदार’

‘लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला राज्यात ३० ते ३५ जागा मिळतील, तर महायुतीला १० ते १२ जागा मिळतील, हा शरद पवार यांचा दावा म्हणजे उदार अंत:करणाचे उदाहरण आहे,’ अशी उपरोधिक टीका देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यात आल्यावर विमानतळावर पत्रकारांशी संवाद साधताना केली. ‘पुण्यात भाजपला अनुकूल वातावरण आहे. कोणाला निवडून द्यायचे हे जनतेने निश्चित केले आहे. त्यामुळे विरोधक बावचळले आहेत. वेगवेगळी विधाने, षङ्यंत्र त्यांच्याकडून रचली जात आहेत. पुण्यातील उमेदवाराच्या प्रचारासाठी विदर्भातील काही आमदार पुण्यात तळ ठोकून आहेत. काँग्रेसने साम, दाम, दंड आणि भेद अशी रणनीती स्वीकारल्याचे यातून दिसत आहे. मात्र, विरोधकांनी काहीही केले, तरी भाजप महायुतीचा विजय होईल,’ असे फडणवीस यांनी सांगितले. दरम्यान, शहरात झालेल्या सभांत त्यांनी ‘इंडिया’ आघाडीवर सडकून टीका केली. ते म्हणाले, की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आव्हान देणारा एकही नेता इंडिया आघाडीत दिसत नाही. ते एकेक वर्ष पंतप्रधानपद घेऊ, असे सांगतात. पंतप्रधानपदाची प्रतिष्ठा असते. ती कोणाची वैयक्तिक वा खासगी मालमत्ता किंवा कारखानदारी नाही.