पुणे : पुण्यातील रस्ते अपघातांची गंभीर समस्या पुन्हा एकदा प्रकर्षाने समोर आली आहे. यंदा जानेवारी ते मार्च महिन्यात शहरात ३८२ अपघात घडले असून, त्यात ९२ जणांचा मृत्यू झाला आहे. शहरात रोज एका व्यक्तीला रस्ते अपघातात जीव गमावावा लागत असून, रोज चार अपघात घडत आहेत. दरम्यान, ब्लॅकस्पॉटच्या ठिकाणी केलेल्या उपाययोजनांमुळे अपघाती मृत्यू कमी झाल्याचा दावा शासकीय यंत्रणांकडून केला जात आहे.
महामार्ग पोलिसांनी अपघातांची आकडेवारी जाहीर केली आहे. यंदा जानेवारी ते मार्च या कालावधीत पुणे शहरात ३८२ अपघात घडले आणि त्यात ९२ जणांचा मृत्यू झाला. गेल्या वर्षातील याच कालावधीच्या तुलनेत अपघातांची संख्या ७७ ने वाढली असून, मृत्यू १३ ने घटले आहेत. पुण्यातील ग्रामीण भागात यंदा जानेवारी ते मार्चदरम्यान ५०७ अपघात झाले असून, २२१ जणांचा मृत्यू झाला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत अपघातांमध्ये ८४ ने वाढ झाली असून, मृत्यू १४ ने घटले आहेत. यंदा जानेवारी ते मार्च या कालावधी अपघाती मृत्यू कमी झाले असले तरी शहरात दररोज एकाचा आणि ग्रामीण भागात दररोज दोन ते तीन जणांचा अपघाती मृत्यू होत आहे. त्यामुळे अपघात आणि अपघाती मृत्यू रोखण्यासाठी दीर्घकालीन उपाययोजना करण्याची मागणी केली जात आहे.
हेही वाचा : आपत्कालीन वैद्यकीय कक्षामुळे प्रवाशांना जीवदान! पुणे रेल्वे स्थानकाच्या आवारातच उपचार
या पार्श्वभूमीवर बोलताना प्रभारी प्रादेशिक परिवहन अधिकारी संजीव भोर म्हणाले की, मागील काही महिन्यांत शहर आणि ग्रामीण भागातील ब्लॅकस्पॉटच्या ठिकाणी उपाययोजनांसाठी रस्ता सुरक्षा समितीच्या माध्यमातून पावले उचलण्यात आली आहेत. याअंतर्गत पुणे-सोलापूर, पुणे-नगर, पुणे-कोल्हापूर, पुणे-मुंबई या रस्त्यांची पाहणी प्रादेशिक परिवहन कार्यालय, सार्वजनिक बांधकाम विभाग, भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी केली. या पाहणीतून ब्लॅकस्पॉटच्या ठिकाणी असलेल्या समस्या शोधण्यात आल्या. त्यानंतर त्यावर तातडीने करावयाच्या उपाययोजनांचा आराखडा तयार करण्यात आला. या आराखड्यानुसार प्रमुख रस्त्यांवर तातडीच्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत.
हेही वाचा : राज ठाकरे यांच्या सभेनिमित्त सारसबाग परिसरात वाहतूकबदल…काय आहे व्यवस्था ?
पुण्यातील अपघात
कालावधी – भाग – अपघात – मृत्यू
जानेवारी ते मार्च २०२३ : शहर : ३०५ : १०५
जानेवारी ते मार्च २०२४ : शहर : ३८२ : ९२
जानेवारी ते मार्च २०२३ : ग्रामीण : ४२३ : २३५
जानेवारी ते मार्च २०२४ : ग्रामीण : ५०७ : २२१
हेही वाचा: अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर श्रीमंत दगडूशेठ गणपतीला ११ हजार आंब्यांचा महानैवेद्य
अनेक ब्लॅकस्पॉटच्या ठिकाणी रस्ते अभियांत्रिकीच्या दृष्टिकोनातून असलेले दोष दूर करण्यात आले. याचबरोबर अनेक प्रमुख रस्त्यांवरील अतिक्रमणे हटविण्यात आली. नवले पुलावर सातत्याने अपघात घडत असल्याने तेथे वेग मर्यादा कमी करण्यात आली. या सर्व उपाययोजनांमुळे अपघाती मृत्यू कमी झाले आहेत.
संजीव भोर, प्रभारी प्रादेशिक परिवहन अधिकारी