नागपूरमध्ये नितीन गडकरी यांचा पराभव व्हावा म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मिळून प्रयत्न केले, असा गंभीर दावा ठाकरे गटाकडून करण्यात आला आहे. ठाकरे गटाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी ‘सामना’मध्ये लिहिलेल्या रोखठोक या सदरात केंद्रीय राजकारणाबाबत काही मोठे दावे केले आहेत. त्याशिवाय, उत्तर प्रदेशमधील निकालांबाबतही राऊतांनी या लेखाच्या माध्यमातून भाकित वर्तवलं आहे. अमित शाह योगी आदित्यनाथ यांना घरी पाठवतील, असं संजय राऊत म्हणाले आहेत.

“योगी को बचाना है, तो मोदी को जाना है”

उत्तर प्रदेशमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विरोधात योगी समर्थकांनी हाक दिल्याचा दावा संजय राऊतांनी केला आहे. “अमित शहांच्या हाती पुन्हा सत्ता आली तर ते उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना घरी पाठवतील. त्यामुळे ‘योगी को बचाना है, तो मोदी को जाना है’ हा संदेश योगी समर्थकांनी फिरवला. उत्तर प्रदेशात भाजपला ३० जागांचा फटका त्यामुळे सहज पडेल. आधी मोदी-शहांना घालवा असे उत्तरेतील योगी व त्यांच्या लोकांनी ठरवले. त्याचा परिणाम ४ जूनला दिसेल”, असं संजय राऊतांनी या लेखात नमूद केलं आहे.

“एकनाथ शिंदेंनी प्रत्येक मतदारसंघात २५-३० कोटी वाटले”

दरम्यान, संजय राऊतांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर पैसे वाटल्याचा आरोप केला आहे. “दिल्लीने महाराष्ट्रातील काही बेडूक फुगवले व त्यांना नेते बनवले. ते सर्व नेते राजकीय पटलावरून नष्ट होतील. एकनाथ शिंदे यांनी पैशांचा अफाट वापर या निवडणुकीत केला. प्रत्येक मतदारसंघात त्यांनी किमान २५-३० कोटी रुपये वाटले. पुन्हा अनेक उमेदवार पाडण्यासाठी वेगळे बजेट. अजित पवार यांचा एकही उमेदवार निवडून येऊ नये यासाठी शिंदे व त्यांच्या यंत्रणेने खास प्रयत्न केले”, असा गंभीर दावा संजय राऊतांनी केला आहे.

“फडणवीस नाईलाजाने प्रचारात उतरले”

याशिवाय देवेंद्र फडणवीसांवरही संजय राऊतांनी आरोप केला आहे. “४ जूननंतर भाजपात मोदी-शाहांना पाठिंबा राहणार नाही. गडकरी यांचा नागपुरात पराभव व्हावा यासाठी मोदी-शाह-फडणवीसांनी एकत्र प्रयत्न केले. गडकरींचा पराभव होत नाही याची खात्री पटल्यावर फडणवीस हे नाइलाजाने नागपुरात प्रचारात उतरले. गडकरींच्या पराभवासाठी सर्व प्रकारची रसद फडणवीस यांनीच पुरवली हे संघाचेच लोक नागपुरात उघडपणे बोलताना दिसतात”, असं संजय राऊतांनी या लेखात म्हटलं आहे.

“…म्हणून एकनाथ शिंदे वर्षा बंगल्यावर बसून पहारा देतायत”, सुनील राऊतांचा टोला

स्टॅलिनची ‘ती’ गोष्ट!

दरम्यान, संजय राऊतांनी लेखात रशियाच्या स्टॅलिनचा एक प्रसंग सांगितला आहे. “मोदी यांनी देशावर रशियाच्या पुतीनप्रमाणे राज्य केले. त्यांनी देशाला गुलाम केले व दहा वर्षांत गुलाम जन्माला घातले. तरीही गुलाम बंड करतोच. रशिया ज्याने शक्तिमान केला तो जोसेफ स्टॅलिन. स्टॅलिनच्या मृत्यूपूर्वी काही दिवस आधी भारताचे हायकमिश्नर के.पी.एस. मेनन यांना स्टॅलिनची भेट मिळाली होती. स्टॅलिन त्यांना म्हणाला, “आमचा शेतकरी साधा माणूस आहे. लांडगा अंगावर आला तर तो त्याला उपदेश करीत नाही, सरळ ठार करतो! लांडग्याला हे समजते व तोही त्यामुळे अंगावर येत नाही.” भारताच्या शेतकऱ्याने तेच केले आहे”, अशा शब्दांत संजय राऊतांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना लक्ष्य केलं आहे.