राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार व माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यात सर्व अंदाज फोल ठरवत स्थापन झालेल्या शिंदे-फडणवीस सरकारवरून जोरदार चिमटे काढले. तसेच भाजपा नेत्यांच्या अपेक्षाभंगावरून राजकीय टोलेबाजी केली. “देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी एकनाथ शिंदे घेतील सांगितल्यावर भाजपाचे कितीतरी नेते ढसाढसा रडायला लागले. सगळ्या महाराष्ट्राला तो धक्का होता,” असं अजित पवार म्हणाले. ते रविवारी (३ जुलै) विधानसभेचे नवनिर्वाचित अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या स्वागतपर भाषणात बोलत होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अजित पवार म्हणाले, “अनेक कट्टर काम करणारे मान्यवर थोडेसे नाराज आहेत. देवेंद्र फडणवीस टीव्हीवर बोलत होते आणि त्यांनी मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी एकनाथ शिंदे घेतील सांगितलं तेव्हा ‘पिन ड्रॉप सायलन्स’ झाला. कितीतरी भाजपाचे नेते तर ढसाढसा रडायलाच लागले. कुणाला काही कळेनाच. सगळ्या महाराष्ट्रासाठीच तो धक्का होता.”

“गिरीश महाजनांनी तर फेटा सोडून डोळ्याचं पाणी पुसलं”

“गिरीश महाजन यांचं तर अजूनही रडणं बंद होईना. त्यांना फेटा बांधायला दिला तर त्यांनी फेटा सोडून डोळ्याला आलेलं पाणी पुसण्यासाठी फेट्याचा वापर करत आहेत. त्यांना देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री न झाल्याचं फारच वाईट वाटलं,” असं म्हणत अजित पवारांनी गिरीश महाजन यांना कोपरखळी लगावली.

“मला मूळ भाजपाच्या मान्यवरांविषयी वाईट वाटतं”

अजित पवार पुढे म्हणाले, “मी जेव्हा सभागृहात समोरच्या बाजूला पाहतो तेव्हा मूळचे भाजपाचे मान्यवर कमी आणि आमच्याकडून गेलेलेच जास्त मान्यवर पाहायला मिळतात. आमच्या मान्यवरांना पदावर बसलेलं पाहून मला मूळ भाजपाच्या मान्यवरांविषयी वाईट वाटतं. ते मूळ मान्यवरांना बाजूला सारून तिथं पदावर बसलेत. पहिली रांग पाहिली तरी ते लक्षात येईल.”

“आमच्याकडून गेलेले मान्यवर सत्ताधाऱ्यांच्या पहिल्या ओळीत”

“गणेश नाईक, बबन पाचपुते, राधाकृष्ण विखे पाटील, उदय सामंत हे आमच्याकडून गेलेले मान्यवर पहिल्या ओळीत आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मागे बसलेले दीपक केसरकर तर काय चांगले प्रवक्ते झाले आहेत. म्हणजे त्यावेळी आम्ही शिकवलेलं कुठं वाया गेलं नाही,” असं अजित पवारांनी म्हटलं.

“कुठं बाकडं वाजवताय? तुमचं मंत्रिपदच येईल की नाही सांगता येत नाही”

यावेळी अजित पवारांनी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनाही चिमटे काढले. ते म्हणाले, “कुणी काहीही म्हटलं तरी सगळ्यांच्या मनात धाकधूक धाकधूक आहे. भाजपाचे १०५ आमदारांनी आपल्या सदसदविवेक बुद्धीला स्मरून विचारा की जे घडलंय त्याने आपलं समाधान झालं आहे का? चंद्रकांत पाटील यांनी यावर बाकडं वाजवू नये. तुमचं मंत्रिपदच येईल की नाही सांगता येत नाही. कुठं बाकडं वाजवताय? शिवसेनेतून तिकडे गेलेल्या ३९ लोकांपैकी किती लोकांना मंत्रिपद मिळणार आहे? सगळ्यांना वाटतंय मिळेन. काय होईल काही सांगता येत नाही.”

व्हिडीओ पाहा :

हेही वाचा : “नार्वेकरांना जवळ करा नाही तर तुमचं काही खरं नाही,” अजित पवारांचा एकनाथ शिंदेंना सल्ला देताना मिश्किल टिपण्णी

“एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्री व्हायचंय हे माझ्या कानात सांगितलं असतं, तर मी…”

“एकनाथ शिंदे आणि मी एकत्र काम केलं आहे. कशामुळे घडलं, काय घडलं माहिती नाही. मात्र, एकनाथ शिंदे यांनी माझ्या कानात सांगितलं असतं की अजित उद्धव ठाकरेंना सांग, अडीच वर्षे झालेत, आता अडीच वर्षे मला मुख्यमंत्रीपद द्या. तर मीच उद्धव ठाकरेंना सांगून आम्हीच तुम्हाला मुख्यमंत्रीपदावर बसवलं असतं. काहीच अडचण आली नसती,” असं अजित पवार यांनी सांगितलं. तसेच आदित्य काही अडचण आली नसती ना? असं म्हणत आदित्य ठाकरेंनाही कोपरखळी लगावली.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ajit pawar comment on crying bjp leaders like girish mahajan for devendra fadnavis pbs
First published on: 03-07-2022 at 16:41 IST