Chhagan Bhujbal : अजित पवारांनी महायुतीत किती जागा मागितल्या? छगन भुजबळांनी आकडाच सांगितला; म्हणाले…

अजित पवार यांनी महायुतीमध्ये किती जागा मागितल्या आहेत? याचा खुलासा आता राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते, मंत्री छगन भुजबळ यांनी केला आहे.

Chhagan Bhujbal On Mahayuti
छगन भुजबळ, (फोटो-संग्रहित छायाचित्र)

Chhagan Bhujbal On Mahayuti : विधानसभेची निवडणूक दोन महिन्यांवर आल्यामुळे महाविकास आघाडी आणि महायुतीमधील पक्षांचे नेते कामाला लागले आहेत. निवडणुकीच्या अनुषंगाने अनेक राजकीय नेत्यांनी सभा, मेळावे आणि आढावा बैठका घेण्याचा धडाका लावला आहे. या माध्यमातून मतदारसंघाचा आढावा आणि विधानसभेसाठी उमेदवारांची चाचपणी करण्यात येत आहे. यातच मागील काही दिवसांपासून कोणता पक्ष किती जागा लढवणार? महायुतीचा जागावाटपाचा फॉर्म्युला कसा असणार? यावर वेगवेगळ्या चर्चा सुरु आहेत.

विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या जागावाटपात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला किती जागा मिळणार? तसेच शिवसेना शिंदे गटाला किती जागा मिळणार? याबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. मात्र, आता अजित पवार यांनी महायुतीमध्ये किती जागा मागितल्या आहेत? याचा खुलासा आता राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते, मंत्री छगन भुजबळ यांनी केला आहे. “राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने महायुतीमध्ये ८० ते ९० जागा मागितल्या आहेत”, असं छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे.

हेही वाचा : Sujay Vikhe Patil : सुजय विखेंचं बाळासाहेब थोरातांना आव्हान? विधानसभा लढवण्याबाबत मोठं विधान; म्हणाले, “संगमनेरमधून…”

छगन भुजबळ काय म्हणाले?

“आमचे जे कारभारी आहेत, मग त्यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार प्रफुल पटेल, खासदार सुनील तटकरे हे विधानसभेच्या जागा वाटपासंदर्भात चर्चा करत असतात. त्यामुळे विधानसभेच्या जागावाटपासंदर्भातील चर्चा कुठपर्यंत आली हे त्यांना माहिती असतं. मी त्या चर्चांमध्ये जास्त लक्ष घालत नाही. त्यांनीही मला जास्त काही सांगितलं नाही. पण मला वाटतं की राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने महायुतीमध्ये ८० ते ९० जागा मागितल्या आहेत. त्यावर किती निकाल येतो? याची मला कल्पना नाही”, असं छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे.

चंद्रशेखर बावनकुळेंनी सांगितला जागावाटपाचा फॉर्म्युला?

भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज सकाळी माध्यमांशी बोलताना महायुतीच्या जागावाटपाचा फॉर्म्युला कसा असणार? याबाबत भाष्य केलं. ते म्हणाले, “मला महायुतीमधील तिन्ही नेत्यांचं कौतुक करायचं आहे. काही दिवसांपासून चर्चा आहेत की हा पक्ष १८० जागा लढवणार, तो पक्ष ८० जागा लढवणार, पण आता असं ठरलं आहे की, अशा प्रकारच्या कोणत्याही आकड्यावर जायचं नाही. आता असं ठरलं आहे की, फक्त जिंकण्यासाठी लढायचं आहे. ज्या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट जिंकेल, त्या ठिकाणी त्यांचा आग्रह आम्ही मान्य करणार, तसेच ज्या जागांवर शिवसेना शिंदे गट जिंकेल त्या जागांवर आम्ही त्यांचा आग्रह मान्य करणार, तसेच ज्या मतदारसंघात भारतीय जनता पार्टी जिंकेल, त्या ठिकाणी आमचा आग्रह शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट मान्य करतील. हाच महायुतीचा फॉर्म्युला असणार आहे”, असं बावनकुळे यांनी म्हटलं होतं.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Ncp leader chhagan bhujbal on maharashtra assembly election 2024 mahayuti ncp ajit pawar group how many seats gkt

First published on: 16-09-2024 at 16:16 IST

आजचा ई-पेपर : महाराष्ट्र

वाचा
Show comments