-
तुम्हाला माहीत आहे का की, यशस्वी लोकांची दिनचर्या आणि एकंदरीत त्यांच्या सवयी या इतरांपेक्षा वेगळ्या असतात. यशस्वी लोकांच्या प्रत्येक कामात सातत्य असते आणि त्यामुळेच ते यशाचे शिखर गाठू शकतात.जर आपण एखादी गोष्ट सातत्यानं केली, तर ती तुमच्या सवयीचा भाग होते आणि मग या चांगल्या सवयी जर तुम्ही तुमच्या दिनचर्येत आणल्या, तर खूप कमी काळातच तुम्हाला याचे फायदे दिसून येतील. (Photo : Freepik)
-
एखाद्या गोष्टीची सवय व्हायला २१ ते ६६ दिवस लागू शकतात. प्रयत्न करून बघा, तुम्ही नक्की यशस्वी व्हाल. manofmany या वेबसाइटनं एका वृत्तात पुराव्यांवर आधारित यशस्वी लोकांच्या १० सामान्य सवयी सांगितल्या आहेत. या चांगल्या सवयींच्या मदतीनं तुम्ही आयुष्यात खूप प्रगती करू शकता. (Photo : Freepik)
-
जर तुम्ही सकाळी ६ वाजता उठत असाल, तर तुम्ही प्रत्येक दिवशी काहीतरी चांगलं करण्याचा प्रयत्न करीत आहात, असं समजावं आणि त्यात जर गजर न लावता तुम्ही सकाळी उठत असाल, तर ते अधिक चांगलं आहे. कारण- सकाळी गजर वाजल्यामुळे आपल्याला अधिक अस्वस्थता जाणवते आणि अनेकदा आपण अलार्म वाजल्यानंतरही उठलो नाही, तर निराश होतो. तुम्हाला हे कदाचित हास्यास्पद वाटेल; पण यशस्वी होण्यासाठी अलार्म न लावता, सकाळी लवकर उठण्याची सवय लावून घ्या. (Photo : Freepik)
-
असे म्हणतात, “वाचाल, तर वाचाल.” हे अगदी खरंय. वाचनामुळे आपला मेंदू प्रगल्भ होतो. दुपारचा वेळ घालविण्यासाठी पुस्तक वाचणं हा एक प्रभावी मार्ग आहे. पुस्तक वाचण्याची आवड निर्माण झाली, तर त्याचे अनेक फायदे दिसून येतात. (Photo : Freepik)
-
दररोजच्या धावपळीच्या आयुष्यात आपण आरोग्याकडे लक्ष देत नाही आणि त्यामुळे आरोग्याच्या अनेक समस्या जाणवतात; पण नियमित व्यायाम करणं हा दैनंदिन जीवनाचा एक महत्त्वाचा भाग आहे. “आता वेळ नाही. नंतर जिमला जाऊन वर्कआउट करेन,” असं आपण सहजपणे म्हणतो. पण, जर शरीरासाठी तुम्ही एखादी विशिष्ट वेळ ठरवत नसाल, तर तुम्हाला त्याचा फायदा दिसून येणार नाही. ज्यांना आयुष्यात यशस्वी व्हायचं आहे, त्यांच्यासाठी वेळेचं नियोजन खूप महत्त्वाचं आहे आणि ते व्यायामासाठी आवर्जून वेळ काढतात. (Photo : Freepik)
-
दररोजच्या आयुष्यात आपण स्वत:साठी कधीच वेळ काढत नाही; ज्यामुळे आपल्याला काय पाहिजे, याविषयी आपण नेहमी गोंधळलेले असतो आणि वेळ आली, तर योग्य तो निर्णय घेऊ शकत नाही. आपण ज्या अतिधावपळीच्या जगामध्ये वावरतो, त्यापासून थोडा ब्रेक घेऊन १५ ते २० मिनिटे स्वत:ला वेळ देणं गरजेचं आहे. यशस्वी व्यक्तीची ती एक चांगली सवय आहे. स्वत:साठी वेळ काढणं आणि स्वत:बद्दल विचार करणं गरजेचं असतं. त्यामुळे तुम्ही तुमच्या जीवनात आवश्यक असे बदल करून चांगला मोबदला मिळवू शकता. (Photo : Freepik)
-
असं म्हणतात की, कोणतंही काम यशस्वीपणे करायचं असेल, तर त्यासाठी एक चांगली योजना आखावी लागते. जर तुम्हाला सतत एखादी समस्या येत असेल, तर त्याबाबत विचार करून विशिष्ट योजनेद्वारे ती समस्या सोडविण्याचा प्रयत्न केला, तर तुम्हाला यश मिळू शकतं. जेव्हा तुमच्या वाटेत एखादा अडथळा येतो तेव्हा शांत बसा, विचार करा आणि समस्या सोडविण्यासाठी वेळ काढा. यश मिळवायचं असेल, तर नियोजन हा सर्वांत महत्त्वाचा पैलू ठरतो. ही सवय अंगीकारणं हा यशाकडे जाणारा एक उत्तम मार्ग आहे (Photo : Freepik)
-
रोमन तत्त्वज्ञानी सेनेका सांगतात, “जेव्हा आपल्याला चांगली संधी मिळते, ते आपलं भाग्य असू शकतं; पण प्रेरणादायी लोकांच्या सहवासात राहाल, तर आपल्यासाठी संधीचं दार उघडू शकतं.” त्यामुळे आपल्या सहवासात राहणाऱ्या लोकांची निवड आपण विवेकपूर्वक केली पाहिजे. (Photo : Freepik)
-
एखादी गोष्ट करायची म्हणून ठरवणं आणि त्यानंतर त्यासाठी जोपर्यंत यश मिळत नाही तोपर्यंत मेहनत घेणं यात एक अतुलनीय आनंद असतो. ध्येयाचा पाठलाग करण्यापूर्वी तुम्हाला ध्येयाकडे नेणारा मार्ग शोधावा लागेल. अनेकदा तुमच्या पदरी अपयश येईल; पण खचून जाऊ नका. पडल्यानंतर पुन्हा उठा आणि ध्येयाचा पाठलाग करा. तुम्हाला काय साध्य करायचं आहे ते कागदावर किंवा नोटबुकवर किंवा बोर्डवर लिहून ठेवा. त्यामुळे तुमच्यामध्ये एक विशिष्ट प्रकारची ऊर्जा निर्माण होते, जी तुम्हाला ध्येयावर लक्ष केंद्रित करण्यास प्रोत्साहन देते. (Photo : Freepik)
-
तुम्ही अनेकदा बातम्यांमध्ये ‘गिग इकॉनॉमी’विषयी ऐकलं असेल. गिग इकॉनॉमी म्हणजेच कंपन्या स्वतंत्र किंवा अल्प-मुदतीच्या कामगारांना नियुक्त करतात; ज्यामुळे त्यांना नोकरीवरून केव्हाही काढलं जाऊ शकतं. अशा वेळी एकाच उत्पन्नावर अवलंबून राहणं कठीण जातं. अशा वेळी उत्पन्नाचे अनेक स्रोत निर्माण करणं यशस्वी माणसाचं लक्षण आहे. हे आर्थिक सुरक्षिततेसाठी महत्त्वाचं पाऊल आहे. (Photo : Freepik)
-
काटकसर करणारे लोक यशस्वी होतात. ते पैशांच्या व्यवहारात हुशार असतात. त्यांना पैशांचं नियोजन करता येतं आणि पैशांची बचतसुद्धा करता येते. त्यासाठी आर्थिक नियोजन करणं हे एक उत्कृष्ट पाऊल आहे; ज्यामुळे आर्थिकदृष्ट्या तुम्ही स्वतंत्र राहू शकता. पैसे खर्च करण्यास घाबरू नका. जगण्यासाठी पैसा हा खूप महत्त्वाचा पैलू आहे; पण तुमच्याकडे पैसा नसेल, तर खर्च करू नका. (Photo : Freepik)
-
नेहमी लक्षात ठेवा, आपण सर्व एक आहोत. तुम्ही कितीही यशस्वी झालात तरी तुमचं ज्ञान जगासमोर मांडायला कचरू नका. तुम्ही करीत असलेल्या कामामुळे इतरांना प्रेरणा मिळेल. ज्ञान ही अशी एकमेव गोष्ट आहे की, ती दुसऱ्यांना दिल्यावर वाढत जाते. (Photo : Freepik)

Video : फ्लाइट कॅप्टन भाचीकडून विमानात खास उद्घोषणा! पद्मश्री अशोक सराफ यांचं केलं अभिनंदन; म्हणाली, “माझे काका…”