-
मी फोटोग्राफी करायचो, व्यंगचित्र काढत होतो. पण, मुख्यमंत्री होईल, असं कधीच वाटलं नव्हतं. मी मुख्यमंत्री होण्यास शरद पवार जबाबदार आहेत. मुख्यमंत्री असताना जमेल ते काम केलं, असं विधान शिवसेना ( ठाकरे गट ) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. पत्रकार राहुल गडपाले यांच्या ‘अवतरणार्थ’ पुस्तक प्रकाशन सोहळ्यात ते बोलत होते.
-
उद्धव ठाकरेंनी भाजपावर टीका केली आहे. ( संग्रहित छायाचित्र )
-
“मात्र, मुख्यमंत्री असताना जमेल ते काम मी केलं आणि महाराष्ट्रातील जनतेनं मला स्वीकारलं. मला महाराष्ट्राच्या कुटुंबातील एक सदस्य म्हणून मान मिळाला आहे. तीच माझ्या आयुष्यातील कमाई आहे,” असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं.
-
“मला या कार्यक्रमात अमरावतीकर दिसत आहेत. मी जर असं म्हणलो की, ‘भाई और बहनो, मेरा अमरावतीसे बोहोत पुराना रिश्ता है.’ कारण, माझी आजी ही अमरावतीतील परतवाड्याची आहे. मी फेकाफेकी करणारा नाही. उगाचच सगळीकडे ‘करीबी रिश्ता है’ सांगत नाही. जे रिश्ते आहेत ते आहेत. जे नाहीत ते नाही,” असा टोला उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अप्रत्यक्षपणे लगावला आहे.
-
“‘महादेव’ बेटिंग अॅप प्रकरणावरून भूपेश बघेल भाजपात जाणार नाहीत. पण, बघेल भाजपात गेले, तर ‘महादेव’ बेटिंग अॅपचे ‘हर हर महादेव’ अॅप होईल. एवढं निर्लज्जपणाने चाललं असताना आपण गप्प कसं काय बसू शकतो?” असा संतप्त सवाल उद्धव ठाकरेंनी उपस्थित केला.
-
“लोकशाहीचा चौथा स्तंभ सत्ताधाऱ्यांच्या वाळवीनं पोखरून टाकला आहे. अक्षरश: चौथ्या स्तंभाला वाळवी लागली आहे. आजपर्यंत ‘हिडी’स कारभार चालला आहे, असं म्हटलं जायचं. आता ‘ईडी’स कारभार चालला आहे. सरकारनं सर्वांशी समान वागावे. पण, हे क्लिनचिट देणारं सरकार आहे,” असा टीकास्र उद्धव ठाकरेंनी डागलं आहे.
-
“प्रबोधनकार ठाकरे यांनी प्रवाहाबरोबर जाणं पसंत केलं नाही. त्यांनी सत्तेला प्रश्न विचारले. प्रबोधनकार परवडण्याजोगे करायचे असेल, तर त्यांच्यासारखं निस्वार्थी, निस्पृह आणि निर्भिड व्हावे लागेल. नाहीतर निर्ल्लज्याला निस्पृह होता येत नाही. काहीजण शिवसेनाप्रमुखांचे फोटो चोरून आपले पक्ष चालवत आहेत. ना विचार, ना नेता,” अशी टीका उद्धव ठाकरेंनी शिंदे गटावर केली आहे.
-
“घरी बसणाऱ्यांना जनतेनं घरी बसवले,” अशी टीका मुख्यमंत्री शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर केली होती. याला उद्धव ठाकरेंनी सडेतोड प्रत्त्युत्तर दिलं आहे. “खाल्ल्या घरचे वासे मोजणाऱ्यांनी आम्हाला शिकवू नये,” अशा शब्दांत उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांना सुनावलं आहे. पत्रकार राहुल गडपाले यांच्या ‘अवतरणार्थ’ पुस्तक प्रकाशन सोहळ्यात उद्धव ठाकरे बोलत होते.
-
उद्धव ठाकरे म्हणाले, “शिवसेना काँग्रेसबरोबर गेली म्हणजे ‘शिवसेनेची काँग्रेस’ झाली म्हणतात. गेली ३० वर्ष आम्ही भाजपाबरोबर होतो. मात्र, आमचा कधी भाजपा झाला नाही. मग, काँग्रेस कसा होईल? शिवसेनेनं भाजपाला सोडलंय, हिंदूत्वाला नाही. भाजपाने हिंदूत्वाची मालकी घेतली नाही. मला भाजपाचं हिंदूत्व मान्य नाही,” अशी टीकाही उद्धव ठाकरेंनी केली आहे.

बाई…कसली नाचली! ‘एक नंबर तुझी कंबर’ गाण्यावर तरूणीने धरला ठेका; VIDEO पाहून कराल कौतुक