-
सर्वोच्च न्यायालयात काल (सोमवारी) एका वकिलाने सरन्यायाधीश बी. आर. गवई यांच्यावर बूट फेकण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर देशभरातून या विरोधात संतापजनक प्रतिक्रिया येत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापासून माजी केद्रीय मंत्री शरद पवार यांच्यापर्यंत विविध नेत्यांनी या घटननेचा निषेध नोंदवला आहे.
-
“भारताचे सरन्यायाधीश बी.आर. गवई यांच्याशी बोललो. सर्वोच्च न्यायालयाच्या आवारात त्यांच्यावर झालेल्या हल्ल्याने प्रत्येक भारतीय संतापला आहे. आपल्या समाजात अशा निंदनीय कृत्यांना स्थान नाही. ते पूर्णपणे निषेधार्ह आहे. अशा परिस्थितीला तोंड देताना न्यायमूर्ती गवई यांनी दाखवलेल्या संयमाचे मी कौतुक करतो. ते न्यायमूर्तींच्या मूल्यांप्रती आणि आपल्या संविधानाच्या आत्म्याला बळकटी देण्याप्रती त्यांची वचनबद्धता अधोरेखित करते”, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
-
शरद पवार म्हणाले की, “लोकशाही आणि संविधानाच्या मूल्यांना आधार मानून वाद-प्रतिवादातून न्याय्य भूमिकेकडे जाण्यासाठी न्यायव्यवस्था असते. त्याच न्यायव्यवस्थेच्या सर्वोच्च संस्थेत मुख्य न्यायमूर्तींवरच अशा प्रकारे हल्ल्याचा प्रयत्न होणs हा केवळ न्यायव्यवस्थेचाच नव्हे तर लोकशाहीचा, संविधानाचा आणि देशाचा घोर अवमान आहे. आपल्या देशात पेरलं जाणारं विष आता संविधानाच्या सर्वोच्च संस्थांनाही जुमानत नाही, ही देशासाठी धोक्याची घंटा आहे. ह्या घटनेचा मी निषेध करतो व कोणत्याही परिस्थितीत भारतीय लोकशाहीचे स्तंभ कमकुवत होणार नाहीत, ह्यासाठी कायम प्रयत्नशील राहण्याची ग्वाही देतो.”
-
“सर्वोच्च न्यायालय हे देशाच्या न्यायव्यवस्थेचे सर्वोच्च मंदिर आहे. या न्यायालयातील कार्यवाहीदरम्यान महाराष्ट्राचा अभिमान, देशाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या प्रयत्नाचा मी तीव्र शब्दांत निषेध करतो. न्यायसंस्थेवर किंवा न्यायमूर्तींवर हल्ला करणे म्हणजे लोकशाहीच्या मूलभूत तत्त्वांवर आघात आहे. अशा प्रकारच्या घटनांना आपल्या लोकशाहीत कोणतीही जागा नाही. न्यायसंस्थेची प्रतिष्ठा अबाधित राखणे ही प्रत्येक भारतीयाची नैतिक जबाबदारी आहे. या घटनेस जबाबदार संबंधितांवर कठोर कारवाई होणे अत्यावश्यक आहे”, अशी पोस्ट उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आहे.
-
एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत म्हणाले की, “हा सरन्यायाधीश बी. आर. गवई यांच्यावर नव्हे, तर तो भारतीय संविधानावर बूट फेकण्याचा प्रयत्न होता. सत्तेत असलेले लोक भारतीय संविधानाचे पालन करण्यास तयार नाहीत आणि त्यांचे अनुयायी अशा प्रकारच्या गोष्टी करत आहेत.”
-
सरन्यायाधीश बी. आर. गवई यांच्यावरील हल्ल्याबाबत केलेल्या एक्स पोस्टमध्ये रोहित पवार म्हणाले की, “सरन्यायाधीशांवर हल्ल्याचा प्रयत्न म्हणजे संविधान आणि लोकशाहीवर हल्ल्याचा प्रयत्न आहे. ही घटना अत्यंत निषेधार्ह आहे. थातूरमातूर गोष्टींवर क्षणार्धात पोस्ट करणाऱ्या भाजपा नेत्यांनी कालच्या घटनेवर, जेव्हा जनतेतून संतापाची भावना उमटू लागली, तेव्हा ७–८ तासांनी प्रतिक्रिया दिली. याला काय म्हणावे?”
-
सरन्यायाधीश बी. आर. गवई यांच्यावर बूट फेकण्याचा प्रयत्न करणारे ७१ वर्षीय वकील राकेश किशोर यांनी म्हटले आहे की, त्यांना या कृत्याचा कोणताही पश्चात्ताप नाही. याचबरोबर, “आपण तुरुंगवास भोगण्यास तयार आहोत” आणि “दैवी शक्तीमुळे” हे कृत्य केल्याचा दावा त्यांनी केला आहे.
-
एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना राकेश कुमार म्हणाले की, “न्यायाधीशांनी संवेदनशीलतेने काम करावे. लाखो खटले प्रलंबित आहेत. मी माफी मागणार नाही आणि मला पश्चात्तापही नाही. मी काहीही केलेले नाही. दैवी शक्तीने मला हे करण्यास भाग पाडले.” (सर्व फोटो: पीटीआय)

Rakesh Kishore Reaction: CJI B. R. Gavai यांच्यावर बूट फेकणारे वकील राकेश किशोर यांची प्रतिक्रिया चर्चेत; म्हणाले, “दैवी शक्तीमुळे हे कृत्य केले”