-
दहावी आणि बारावीच्या बोर्डाच्या ऑफलाइन परीक्षा रद्द करुन ऑनलाइन पद्दतीने घ्याव्यात यासाठी विद्यार्थी आक्रमक झाले आहेत. धारावीसह नागपूर, औरंगाबाद आणि उस्मानाबाद येथे विद्यार्थी रस्त्यावर उतरले असून काही ठिकाणी तोडफोडदेखील करण्यात आली. दरम्यान सोशल मीडिया स्टार ‘हिंदुस्थानी भाऊ’ म्हणजेच विकास पाठकने आवाहन केल्यानंतर आपण रस्त्यावर उतरलो असल्याचं धारावीत आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांनी सांगितलं आहे.
-
हिंदुस्थानी भाऊचाही सरकारला इशारा देतानाचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. पोलिसांना त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला असून अटकेची कारवाई होण्याची शक्यता आहे.
-
धारावीत मोठ्या संख्येने विद्यार्थी जमलेले आहेत. यंदा परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घ्यावी अशी त्यांची मागणी आहे. रविवारी शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी परीक्षा ऑफलाईन आणि वेळापत्रकानुसारच होणार असल्याचं सांगितलं होतं.
-
मात्र हा निर्णय विद्यार्थ्यांना मान्य नाही. शिक्षणमंत्र्यांनी परीक्षा ऑफलाईन घेण्याचं जाहीर केल्यानंतर सोशल मीडियावर देखील विद्यार्थ्यांकडून या विरोधात प्रतिक्रिया उमटल्या होत्या.
-
हिंदुस्थानी भाऊने सोशल मीडियावर ऑनलाइन परीक्षा घेण्याचा मागणीला पाठिंबा दर्शवणारी पोस्ट शेअर केली होती. तसंच शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या भेटीसाठी पोहोचला होता.
-
यावेळी धारावीत मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांनी गर्दी केली आणि वर्षा गायकवाड यांच्या घऱासमोर आंदोलन केलं. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याने पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला.
-
दरम्यान सोशल मीडियावर हिंदुस्थानी भाऊचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यावेळी तो गाडीत बसला असून बाहेर आंदोलन करणारे विद्यार्थी दिसत आहेत. यावेळी तो सांगत आहे की, “ही या विद्यार्थ्यांची ताकद आहे. वर्षा गायकवाड यांना लवकरात लवकर परीक्षा रद्द करावी, मुलांची शिक्षा माफ करावी यासाठी निवेदन दिलं आहे.”
-
याच व्हिडीओमध्ये तो पुढे, “पोलीस अधिकाऱ्यांनी निवदेन वर्षा गायकवाड यांच्याकडे देऊ असं आश्वासन दिलं आहे. जर इतकं केल्यानंतरही सरकारने ऐकलं नाही तर याच ताकदीने पुन्हा उतरु. हे विद्यार्थी आपल्या हक्काची लढाई लढत आहेत. यांना न्याय मिळाला पाहिजे”, असंही सांगताना दिसतो.
-
मात्र शिव्या देणाऱ्या व्हिडीओंपासून आज ज्याच्या एका हाकेवर शेकडो विद्यार्थी शिक्षण मंत्र्यांच्या घरसमोर गोळा झाले हा हिंदुस्तानी भाऊ सोशल मीडियावर लोकप्रिय असला तरी अनेकांना त्याच्याबद्दलच्या काही गोष्टी माहिती नाहीय. याच गोष्टींवर या गॅलरीमधून प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केलाय.
-
हिंदुस्तानी भाऊ हे नाव सोशल मीडियावर फारचं चर्चेत असतं. अनेकदा तो वेगवेगळ्या मुद्द्यांसाठी पोलिसांना निवेदनं देणं, आंदोलनं करणं यासारख्या गोष्टी करताना दिसतो.
-
मागील काही काळापासून सामाजिक आणि चर्चेतील विषयांवर व्यक्त होण्याचं हिंदुस्तानी भाऊचं प्रमाण वाढलं असून त्यामुळे त्याला पाठिंबा देणाऱ्यांची संख्याही वाढलीय.
-
बिग बॉसच्या १३ व्या सिजनपासून हिदुस्तानी भाऊनं लोकप्रियतेचं शिखर गाठलं.
-
आज तो युट्यूब आणि आपल्या व्हिडीओद्वारे सर्वांच्याच परिचयाचा असला तरी सोशल मीडिया स्टार होण्याचा त्याचा हा प्रवास त्याच्या व्हिडीओ आणि व्यक्तीमत्वाप्रमाणेच फार व्हायब्रंट आहे.
-
हिंदुस्तानी भाऊचं खरं नाव विकास जयराम पाठक असं आहे.
-
हिंदुस्तानी भाऊ सोशल मीडिया स्टार होण्यापूर्वी अगदीच सामान्य जीवन जगत होता.
-
तो लहान असतानाच त्याच्या वडिलांची नोकरी गेल्यामुळं त्याच्यावर घराची सर्व जबाबदारी आली.
-
इयत्ता सातवी मध्ये असताना त्यानं आपलं शिक्षण सोडण्याचा निर्णय घेतला आणि कुटुंबाची जबाबदारी उचलली.
-
सुरुवातीच्या काळात त्यानं टेनिस कोर्टवर बॉल उचलणाऱ्या बॉल बॉयपासून ते घरोघरी जाऊन अगरबत्ती विकण्यापर्यंतची अनेक कामं केली.
-
काही काळ हिंदुस्तानी भाऊने वेटर म्हणूनही काम केलं.
-
वेगवेगळ्या नोकऱ्या करताना काही काळ त्यांनं एक स्थानिक वृत्तपत्रात पत्रकार म्हणून कामही केलं.
-
या ठिकाणी त्याच्याकडे क्राईम बिट म्हणजेच गुन्ह्यांसंदर्भातील बातम्या सांभाळण्याची जबाबदारी सोपवण्यात आली होती.
-
२०१४ मध्ये त्यानं एक युट्यूब चॅनल सुरू केलं.
-
हिंदुस्तानी भाऊ हा सोशल मीडियावर सध्या चर्चेचा विषय असला तरी पाकिस्तानविरोधातील त्याचे व्हिडीओंनी त्याला लोकप्रियता मिळवून दिली.
-
‘पहली फुर्सत मे निकल’ हा त्याचा डायलॉग चांगलाच गाजला.
-
हिंदुस्तानी भाऊ म्हणजेच विकास पाठकला एक मुलगा आहे. तो आपल्या मुलाच्या नावानं एक एनजीओदेखील चालवतो.
-
आपल्या पहिल्या काही व्हिडीओमध्ये हिंदुस्तानी भाऊने केलेली संजय दत्तची मिमिक्री अनेकांना आवडली होती. तो व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला होता.
-
मागील काही वर्षांमध्ये तो युट्यूबवरील स्टार झाला असून युट्यूबने त्याला सबक्रायबरच्या आधारे सिलव्हर बटण दिलं आहे.
-
तो मिम्सच्या दुनियेतही फार लोकप्रिय आहे.
-
त्याच्या व्हिडीओंमधील संवादांचे अनेक मिम्स व्हायरल झालेत.
-
हिंदुस्तानी भाऊचे युट्यूबवर लाखोंच्या संख्येनं सबस्क्रायबर्स आहेत.
-
मागील काही काळापासून तो समाजकार्यासंदर्भातील आंदोलनांमध्ये सक्रीय झाल्याचं पहायला मिळत आहे.
-
हिंदुस्तानी भाऊचे व्हिडीओ पूर्वी शिव्या आणि अश्लील शब्दांमध्ये केलेल्या टीकेसाठी लोकप्रिय व्हायचे.
-
मात्र हल्ली तो अनेक समाजाशी संबंधित विषयांवर भाष्य करणारे व्हिडीओ बनवतो.
-
अनेक अभिनेते, राजकारणी आणि प्रसिद्ध लोकांची त्याने यापूर्वी भेट घेतली आहे. यामध्ये अगदी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरेंचाही समावेश आहे.
-
आज याच हिंदुस्तानी भाऊच्या एका हाकेवर मुलांनी शिक्षणमंत्र्यांच्या घरासमोर आंदोलन केल्याचं पहायला मिळालं. (सर्व फोटो – युट्यूब, इन्स्टाग्राम)
-
या प्रकरणासंदर्भात हिंदुस्तानी भाऊ उद्या म्हणजेच १ फेब्रुवारी २०२२ रोजी शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची भेट घेणार आहे.

नरेंद्र मोदी पंतप्रधान का बनले? सरन्यायाधीश भूषण गवईंनी थेट लंडनमधून सांगितले…