हर्षद कशाळकर

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अलिबाग : बाळासाहेबांची शिवसेना गटाचे प्रतोद भरत गोगावले यांची जिल्ह्यात कोंडी करण्याचे धोरण राष्ट्रवादी काँग्रेसने स्विकारले आहे. याचाच एक भाग म्हणून सार्वजनिक कार्यक्रमात गोगावले यांच्यावर सडकून टिका टीप्पणी खासदार सुनील तटकरे यांच्याकडून केली जात आहे.

महाविकास आघाडीचे सरकार घालविण्यात शिवसेनेचे महाडचे आमदार भरत गोगावले यांनी महत्वाची भुमिका बजावली होती. अडीच वर्षाच्या कार्यकाळातही गोगावले यांनी तत्त्कालिन पालकमंत्री आदिती तटकरे यांच्या विरोधात उठाव केला होता. पालकमंत्री बदला अशी मागणी ते सातत्याने उध्दव ठाकरे यांच्याकडे करत होते. याची सल राष्ट्रवादी काँग्रेसच्या मनात आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी सध्या गोगावले यांना लक्ष्य करण्याचे धोरण स्विकारले असल्याचे दिसून येत आहे.

हेही वाचा… जालन्यात राष्ट्रवादीच्या वर्चस्वपट्ट्यात भाजपचे लक्ष!

विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी भरत गोगावले यांना एकदाचे मंत्री करा, नाहीतर त्यांनी शिवून घेतलेल्या सुटाला उंदीर लागतील. आणि त्यांच्या मंत्रीपदाच्या शपथविधीला मलाही बोलवा जगात कुठेही असलो तरी मी येईन अशी मिश्कील टिप्पणी विधीमंडळाच्या नागपूर अधिवेशनात केली होती. यानंतर खासदार सुनील तटकरेंनी गोगावले यांच्यावर शाब्दीक वार करण्याचे धोरण स्वीकारले आहे.

हेही वाचा… भारत जोडोनंतर नांदेड जिल्ह्यात काँग्रेसचे ‘हाथ से हाथ जोडो’ अभियान

काही लोक जॅकेटच्या खिशात हात घालून हातचालाखी करतात, त्यांच्यापासून सावध रहा असा तटकरे यांनी नुकताच महाड मध्ये लगावला होता. तर ज्यांच्या स्वताच्या गावत पत नाही, घरची ग्रामपंचायत निवडून आणता येत नाही. ते जिल्ह्याचे प्रतिनिधीत्व करायला निघाल्याचे म्हणत गोगावले यांच्यावर टीका करण्यात आली. ग्रंथालय संघाने नुकतीच गोगावले यांची भेट घेतली, प्रलंबित मागण्याचे निवेदनही दिले. पण गोगावले आणि ग्रंथालयांचा संबध काय असा सवालही तटकरे यांनी उपस्थित केला.

हेही वाचा… Maharashtra News Live : “शिवसेना कोणाची? हा प्रश्न महाराष्ट्रात उपस्थित होत नाही”; निवडणूक आयोगापुढील सुनावणीपूर्वी संजय राऊतांची प्रतिक्रिया

शाब्दीक वार करतांनाच गोगावले यांची मतदारसंघात कोंडी याचे प्रयत्न सुरु झाले आहेत. महाविकास आघाडीच्या माध्यमातून निवडणुकांना सामोरे जाण्याचा धोरण तिनही पक्षांनी स्विकारले आहे. नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणूकीत याची प्रचिती आली. महाड आणि पोलादपूर मध्ये महाविकास आघाडी विरूध्द बाळासाहेबांची शिवसेना थेट लढती पहायला मिळाल्या, महाड पोलादपूर निकालांवर गोगावले यांनी वरचष्मा राखला असला तरी माणगाव मध्ये महाविकास आघाडीने जिंकून दाखविल्या. खासदार सुनील तटकरे, अनिकेत तटकरे, आदिती तटकरे यांचा महाड विधान सभा मतदारसंघातील वावर वाढला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसकडून गोगावले यांच्या विरोधात शाब्दीक बाण सुरु झाले असतांनाच, शिवसेना उध्दव ठाकरे गटाकडून अनंत गिते आणि काँग्रेसचे नाना जगताप गोगावले यांना लक्ष्य करत आहेत. या आक्रमणाला गोगावले पुरून उरतात का हे पाहणे रायगडकरांसाठी औत्सुक्याचे ठरणार आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bharat gogawale dilemma from ncp in raigad district print politics news asj
First published on: 17-01-2023 at 11:47 IST