Supriya Sule On Sachin Waze allegations : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांनी गंभीर आरोप केले आहेत. “अनिल देशमुख हे त्यांच्या पीएमार्फत पैसे घ्यायचे, यासंदर्भात सर्व पुरावे सीबीआयकडे असून आपण देवेंद्र फडणवीसांना पत्र लिहिलं आहे”, असा आरोप सचिन वाझे यांनी केला. तसेच आपण देवेंद्र फडणवीसांना लिहिलेल्या पत्रात जयंत पाटील (Jayant Patil) यांचंही नाव असल्याचं सचिन वाझे (Sachin Waze) यांनी म्हटलं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या आरोपानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “अनिल देशमुख यांच्यावर आताच आरोप का झाले? मग या पत्राचं आणि आरोपांचं टायमिंग बघा. विधानसभेच्या निवडणुका दोन महिन्यांवर आहेत. त्यामुळे हे आरोप केले जात आहेत”, असं सुप्रिया सुळे यांनी एबीपी माझा या वृत्तवाहिनीला दिलेल्या प्रतिक्रियेत म्हटलं आहे.

हेही वाचा : “देवेंद्र फडणवीसांची ही नवी चाल”, सचिन वाझेंच्या आरोपावर अनिल देशमुखांची प्रतिक्रिया

सुप्रिया सुळे काय म्हणाल्या?

“या पत्राचं आणि आरोपांचं टायमिंग बघा. विधानसभेची निवडणूक आता दोन महिन्यांवर आलेली आहे. गेल्या १० वर्षांपासून गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत त्यांची सत्ता आहे. मग या गोष्टी आताच कशा समोर येतात? गेल्या अडीच वर्षांपासून त्यांचं महाराष्ट्रात सरकार आहे. मात्र, बरोबर विधानसभेच्या आधीच हे पत्र आणि अशा प्रकारचे आरोप-प्रत्यारोप करण्यात येत आहेत. अनिल देशमुख यांच्याविरोधात न्यायालयात जे प्रकरण आहे, त्यातील एकही आरोप सिद्ध झालेला नाही. त्यांच्यावरील सर्व आरोप खोटे ठरलेले आहेत. शंभर कोटींचा हिशेब कुठेही नाही. आता बाकीच्या लोकांची नावं या प्रकरणात घेणं हा बालिशपणा आहे. राज्याचं दुर्देव आहे की राजकारण अशा लेव्हलला गेलं आहे. हे सर्व आरोप बालिशपणाचे आहेत”, असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे.

खासदार सुळे पुढे म्हणाल्या, “महाराष्ट्राची आर्थिक परिस्थिती आणि महाराष्ट्रात वाढणारी बेरोजगाराची परिस्थिती यावरही कोणीतरी बोललं पाहिजे. पण त्यावर कोणीही बोलत नाही. भ्रष्ट्राचार झाकण्यासाठी भाजपाचं वाशिंग मशीन आहे. आमचा पक्ष सुसंस्कृत पक्ष आहे. आम्ही यशवंतराव चव्हाण यांच्या विचारावर चालणारे लोक आहेत. आम्ही लोकांची सेवा करण्यासाठी राजकारणात आणि समाजकारणात आलो आहोत. अशा प्रकारे कोणाचा बदला घेण्यासाठी किंवा अशा प्रकारचं गलिच्छ राजकारण आम्ही कधी करत नाहीत आणि पुढेही कधी करणार नाही. अशा प्रकारचे आरोप आम्ही कधीही कोणावरही केले नाहीत. अनिल देशमुख यांच्यावरील आरोप खोटे आहेत”, असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं.

अनिल देशमुखांनी काय प्रतिक्रिया दिली?

“मी चार-पाच दिवसांपूर्वी देवेंद्र फडणवीस यांच्यावर जे आरोप केले होते. जी वस्तुस्थिती मी समोर आणली होती. कशा प्रकारे देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांना तुरुंगात टाकण्यासाठी मी प्रतिज्ञापत्र करुन द्यावं. यासाठी माझ्यासमोर जो प्रस्ताव आणला होता. ही गोष्ट ज्यावेळी मी महाराष्ट्रातील जनतेसमोर आणली. त्यानंतर आता देवेंद्र फडणवीस यांची ही नवीन चाल आहे. सचिन वाझेंनी माझ्यावर जे आरोप केले, ती देवेंद्र फडणवीस यांची नवी चाल आहे”, असा आरोप अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी केला आहे.

सचिन वाझेंनी काय आरोप केले?

“जे काही घडलं आहे त्याचे सर्व पुरावे आहेत. ते (अनिल देशमुख) त्यांच्या पीएच्या माध्यमातून पैसे घ्यायचे. याबाबत ‘सीबीआय’कडेही पुरावे आहेत. मी देखील गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांना (Devendra Fadnavis) एक पत्र लिहिलं आहे. हे सर्व प्रकरण (अनिल देशमुख) त्यांच्या विरोधात गेलं आहे. तसेच मी या प्रकरणात नार्को टेस्ट करायलाही तयार आहे. मी एक पत्र लिहिलं आहे, त्यामध्ये जयंत पाटील यांचंही नाव आहे”, असा आरोप सचिन वाझे यांनी आज एएनआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या प्रतिक्रियेत केला.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Supriya sule on sachin waze anil deshmukh serious allegations devendra fadnavis jayant patil gkt
Show comments