Leap Year : २०२४ हे वर्ष ‘लीप वर्ष’ आहे. चालू वर्षाचा दुसरा महिना म्हणजे फेब्रुवारी या महिन्यात २८ ऐवजी २९ दिवस आहेत. कारण- लीप वर्षामध्ये इतर वर्षांच्या तुलनेत एक दिवस जास्त असतो. पण, असे का होते? लीप वर्ष म्हणजे काय? दर चार वर्षांनी फेब्रुवारी महिन्यात एक दिवस जास्त का जोडला जातो? त्याबद्दल आपण या लेखातून अधिक जाणून घेणार आहोत.

लीप वर्ष म्हणजे काय?

दर चार वर्षांनी कॅलेंडरमध्ये फेब्रुवारी महिन्यात २८ ऐवजी २९ दिवस येतात हे तुम्ही अनेकदा पाहिले असेल. लीप वर्षात फेब्रुवारी महिन्यात एक अतिरिक्त दिवस जोडला जातो. त्यामुळे फेब्रुवारीचा महिना २९ दिवसांचा होतो. साधारणपणे वर्षात ३६५ दिवस असतात; पण लीप वर्ष असल्यामुळे या वर्षी ३६६ दिवस असणार आहेत. तर, आज आपण लीप वर्षाबाबत या लेखातून अधिक जाणून घेणार आहोत.

लीप वर्ष का असते?

पृथ्वीची सूर्याभोवतीची फेरी ३६५ दिवसांमध्ये पूर्ण होते. पण, खरे तर पृथ्वीला सूर्याभोवती फिरण्यासाठी ३६५.२५ दिवसांचा काळ म्हणजेच ३६५ दिवस, पाच तास, ४८ मिनिटे, ४५ सेकंद लागतात. या अतिरिक्त पाच दिवसांची भरपाई करण्यासाठी प्रत्येक चार वर्षांनी फेब्रुवारी महिन्यात आणखी एक दिवस जोडला जातो. त्यामुळे याला लीप वर्ष, असे संबोधले जाते.

ऋतू आणि कॅलेंडर यांमध्ये फरक पडू नये म्हणून दरवर्षी पडणारा पाच तासांचा फरक लीप वर्षामध्ये भरून काढला जातो. हा अतिरिक्त दिवस लीप वर्षात फेब्रुवारी महिन्यात जोडला जातो. म्हणून हा महिना नेहमीच्या २८ दिवसांऐवजी २९ दिवसांचा असतो.

एखादे वर्ष ‘लीप वर्ष’ आहे हे कसे ठरवायचे?

ज्या वर्षाला ४ ने भाग जातो, त्या वर्षाला लीप वर्ष असे म्हटले जाते. २०२० व २०२४ या आकड्यांना ४ किंवा ४०० ने भाग जातो. मात्र १७००, १८०० या शतवर्षांना लीप वर्ष मानले जाऊ नये; ज्या शतवर्षाला ४०० ने भाग जातो, ते लीप वर्ष मानले जावे.

हेही वाचा…Leap Year 2024 : फेब्रुवारी महिन्यात २८ किंवा २९ दिवस का असतात? हे आहे कारण…

प्रत्येक देश लीप वर्ष फॉलो करतो का?

ग्रेगोरियन कॅलेंडर (Gregorian Calender) वापरणारे बहुतेक देश लीप वर्ष पाळतात. पण, जगभरात इतरही कॅलेंडर्स वापरात आहेत आणि त्या सर्वांमध्ये लीप वर्षाचा समावेश कदाचित नसतो.

लीप वर्षाचा वार्षिक कार्यक्रम आणि वाढदिवसांवर कसा परिणाम होतो ?

वार्षिक कार्यक्रम जसे की, सण किंवा ठरावीक तारखेच्या सुट्या लीप वर्षात बदलत नाहीत. पण, २९ फेब्रुवारी किंवा विशेषत: २८ फेब्रुवारी रोजी जन्मलेले लोक नॉन लीप वर्षांमध्ये १ मार्च रोजी त्यांचा वाढदिवस साजरा करतात.

लीप वर्षांमुळे काही समस्या आहेत का?

लीप वर्ष तारीख आणि वेळ निश्चित करणारे संगणकीय आणि सॉफ्टवेअरसाठी समस्या निर्माण करू शकतात.

आतापर्यंतच्या लीप वर्षांची गणना केली जाऊ शकते का ?

होय, तुम्ही तुमच्या जन्माच्या वर्षापासून दर चौथे वर्ष मोजून तुम्ही किती लीप वर्षे पहिली आहेत किंवा जगले आहात याची गणना करू शकता. (पण, शतक वर्षाचा अपवाद लक्षात ठेवून) तर लीप वर्षा बद्दल अनेकांच्या मनात असणारे प्रश्न आणि त्यांची काही उत्तरे आपण या लेखातून पाहिली.