मुंबई : दक्षिण मुंबईच्या एका टोकाला असलेल्या गिरणगावातील शिवडी, भायखळा, लालबाग, परळ परिसरातील कापड गिरण्यांचा प्रश्न अद्यापही पूर्णपणे सुटलेला नाही. काही गिरण्यांचा विकास झाला आणि तेथे बांधलेल्या घरांत गिरणी कामगार राहत आहेत. परंतु अतिधोकादायक इमारतींतील रहिवाशांच्या तात्पुरत्या निवाऱ्यासाठी तेथेच संक्रमण शिबीरे बांधण्यात आल्याने गिरणी कामगार कमालीचे हैराण झाले आहेत.

दरम्यान, काही गिरण्यांचा विकास आजही लालफितीत अडकला आहे, तर काही गिरण्यांचा विकास परवानगीच्या प्रतीक्षेतच आहे. त्याशिवाय जुन्या चाळींचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे. अरुंद रस्ते, वाहतूक कोंडी हे प्रश्न नित्याचेच बनले आहेत.

हेही वाचा…मिठीकाठी राहता येणार नाही, पात्र प्रकल्पग्रस्तांना दिलासा देण्यास उच्च न्यायालयाचा नकार; घर वा भरपाई स्वीकारण्याचा पर्याय

कापड गिरण्या बंद झाल्यानंतर त्यांच्या जमिनीवर गिरणी कामगारांसाठी घर बांधावे अशी मागणी जोर धरू लागली. शासन पातळीवरही या मागणीचा विचार झाला आणि अखेर गिरण्यांच्या जागेचा विकास करताना तेथे गिरणी कामगारांसाठी घरे बांधण्यास मंजुरी मिळाली. बहुतांश खासगी गिरण्यांच्या जागेचा विकास झाला. तेथे गिरणी कामगारांना घरेही मिळाली. राष्ट्रीय वस्त्रोद्याोग महामंडळाच्या २५ कापड गिरण्या मुंबईत असून एकूण २३१ एकर जागेवर त्या उभ्या आहेत. यापैकी हाताच्या बोटावर मोजता येईल इतक्याच गिरण्याचा विकास झाला. मात्र जाचक नियमांमुळे काही गिरण्यांचा विकास रखडला असून जागा गिरणी कामगारांच्या घरांसाठी मिळू शकलेली नाही.

शिवडी परिसरातील चायना, स्वान, ज्युबिली या गिरणी कामगारांच्या जमिनीवर गिरणी कामगारांसाठी घरे बांधण्यात आली आणि कामगार तेथे वास्तव्यास गेले. भायखळ्यातील खटाव, सिम्लेक्स, ब्रॅडबरी या गिरण्यांची धडधडही बंद झाली. नियमानुसार या गिरण्यांच्या जागेवरही गिरणी कामगारांना घर मिळणे क्रमप्राप्त होते. केवळ सिम्प्लेक्स गिरणीच्या जागेवर गिरणी कामगारांना घरे मिळाली. तर भायखळ्यातील गिरणीच्या जागेवर गिरणी कामगारांची घरे बांधण्यासाठी आवश्यक भूखंडच उपलब्ध झाला नाही. ब्रॅडबेरी गिरणी १९८२ पूर्वीच बंद पडली होती. त्यामुळे घरांसाठी या गिरणीतील जागा मिळू शकलेली नाही.

हेही वाचा…मविआ-वंचित चर्चेची दारे बंद? तीन जागा स्वीकारण्यास आंबेडकर यांचा नकार

● काही गिरण्यांच्या जागेचा विकास करण्यात आला. तेथे गिरणी कामगारांसाठी घरेही बांधण्यात आली. गिरणी कामगार तेथे वास्तव्यासही गेले. परंतु मुंबईमधील अतिधोकादायक इमारतींमधील रहिवाशांसाठी तेथेच संक्रमण शिबिरेही बांधण्यात आली.

● या संक्रमण शिबिरांमुळे गिरणी कामगार हवालदिल झाले आहेत. संक्रमण शिबिरांमध्ये नागरी सुविधांवर ताण येत असल्याची खंत गिरणी कामगार व्यक्त करू लागले आहेत.

● कापड गिरण्यांच्या आसपास अनेक चाळी उभ्या राहिल्या होत्या. या चाळींमध्ये गिरणी कामगार वास्तव्याला होते. आता या चाळी जर्जर झाल्या असून त्याचाही विकास ऐरणीवर आला आहे.

हेही वाचा…जागावाटपात शिवसेना, राष्ट्रवादीकडून काँग्रेसची कोंडी; महाविकास आघाडीत पाच जागांवरून तणाव

● बहुसंख्य चाळी धोकादायक बनल्या आहेत. मात्र पुनर्विकासात नवी इमारत कधी उभी राहील याची शाश्वती नसल्याने अनेक रहिवासी घर रिकामे करण्यास तयार नाहीत. काळाचौकी परिसरातील अभ्युदय नगर या मोठ्या वसाहतीचाही पुनर्विकास रखडला आहे.