म्हात्रे पूल ते भिडे पूल या दरम्यानच्या नदीकाठचा रस्ता रोज हजारो दुचाकी चालक वापरत असले, तरी रजपूत झोपडपट्टी येथे या रस्त्याचे काम महापालिका प्रशासनानेच अडवल्याचे उघड झाले आहे. रजपूत झोपडपट्टी येथील रस्ता रुंद झाला, तर हजारो दुचाकी चालकांना मोठा दिलासा मिळणार असला, तरी या रस्तारुंदीकरणाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे.
कर्वे रस्ता, तसेच अन्य अनेक रस्त्यांना पर्याय ठरत असलेला नदीकाठचा रस्त्याचा दिवसभर मोठय़ा प्रमाणावर वापर होतो. मात्र, या रस्त्याचा सहाशे मीटरचा जोडरस्ता गेली अनेक वर्षे रखडला आहे. हा रस्ता १९८७ च्या विकास आराखडय़ात आखण्यात आला होता. मात्र रजपूत झोपडपट्टीजवळ रस्ता रुंद होत नसल्यामुळे वाहनचालकांना रोज मोठा त्रास सहन करावा लागतो. या जागेवर रस्तारुंदीकरण करावे व जागामालकांना त्यांच्या जागेचा रोख स्वरूपात मोबदला द्यावा, असाही निर्णय दोन वर्षांपूर्वी झाला आहे. संबंधित जागांचे बाजारभावानुसार मूल्यांकन करावे व नुकसानभरपाई द्यावी, असा निर्णय महापालिकेने घेतला आहे.
हा रस्ता आवश्यक असला, तरी संबंधित अधिकारी जबाबदारी एकमेकांवर ढकलत होते. तत्कालीन आयुक्त महेश पाठक आणि त्यानंतरचे आयुक्त विकास देशमुख यांनी तीन वेळा जागेची पाहणी केली होती. तरीही काम मार्गी लागत नव्हते. त्यामुळे अखेर मी आंदोलनाचा मार्ग स्वीकारला. मात्र, काम सुरू होण्याबाबत आयुक्त विकास देशमुख यांनी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेतले. हा निर्णय झाल्यानंतरही रस्त्याचे काम झाले नाही. संबंधित मालकांना नुकसानभरपाई देण्यासाठी महापालिकेकडे पुरेशी तरतूद उपलब्ध नाही, असे कारण सांगितले जात होते. म्हणून पुन्हा आयुक्त कुणाल कुमार यांच्याकडे पाठपुरावा केला. त्यांनी कामासाठी लागणारी तरतूद उपलब्ध करून देण्याचे आदेशही अधिकाऱ्यांना दिले. मात्र, एक महिना होऊनही अद्याप हा विषय मार्गी लागलेला नाही, अशी माहिती स्थानिक नगरसेवक अनिल राणे यांनी बुधवारी महापालिकेत पत्रकार परिषदेत दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pmc widening riverside road
Show comments