डॉ. दामोदर विष्णु नेने या नावाऐवजी ‘दादुमिया’ या टोपणनावानेच लेखन त्यांनी केले; त्यामुळे पु. ग. सहस्राबुद्धे, स. ह. देशपांडे या उजव्या विचारांच्या परंतु दुसऱ्या बाजूचा अवमान न करता वाचनीय लिहिणाऱ्या लेखकांच्या पंक्तीत ‘दादुमिया’ हेच नाव घ्यावे लागते. त्यांच्या निधनाने ती पिढीच संपली. बडोदे येथे फॅमिली डॉक्टर म्हणून दशकानुदशके कार्यरत राहिलेल्या डॉ. नेने ऊर्फ दादुमिया यांनी अलीकडे ‘एन्सायक्लोपीडिया हिन्दुस्थानिका’ या अनेकखंडी ग्रंथाचे काम हाती घेतले होते म्हणतात. पण मुळात हे कोणताही ‘कोश’ न मानवणारे लेखक! म्हणून तर रा. स्व. संघाच्या कार्यात राहूनसुद्धा इंदिरा गांधी, यशवंतराव चव्हाण, समाजवादी ना. ग. गोरे आणि एस. एम. जोशी अशा लोकांत त्यांची ऊठबस. ना. ग. गोरे हे आणीबाणीत भूमिगत असताना बडोद्यास डॉ. नेने यांच्याकडे होते. नेने यांचे वैद्याकीय शिक्षण पुण्यात झाले असले तरी, बडोदे संस्थानची दिवाणकी त्यांच्या घराण्यात असल्याने ते बडोदेकरच राहिले. आयुष्याच्या अखेरीस महाराजा सयाजीराव गायकवाडांवर पुस्तक लिहून ‘शत्रूचा शत्रू तो आपला सहकारी या न्यायाने जर्मनीच्या हिटलरशी सयाजीरावांनी गोपनीय करार केला होता, त्याला अन्य संस्थानिकांचीही मान्यता मिळेल अशी आशा महाराजांना होती आणि त्या प्रतीक्षेत ते होते… बर्लिनमधील १९३६ च्या ऑलिम्पिकसाठी भारतीय खेळाडू जावेत, यासाठी सयाजीराव प्रयत्नशील होतेच पण जर्मनीच्या औद्याोगिक प्रगतीचा कित्ता बडोद्याने गिरवावा हा या सहकार्यातला तातडीचा कार्यक्रम होता… त्या गोपनीय करारासाठी विष्णु नेने हे जर्मनीला गेले होते. अर्थात, १९३९ मध्येच सयाजीराव निवर्तल्याने या कराराचे पुढे काही झाले नाही’ असा तपशील देऊन दादुमियांनी खळबळ उडवून दिली, पण हे फार नंतरचे (२०१० सालचे) पुस्तक. त्याआधी ‘दलितस्थान झालेच पाहिजे!’, ‘दलितांचे राजकारण’, ‘धास्तावलेले मुसलमान’ ही त्यांची पुस्तके गाजली. ‘दलितस्थान…’ नामांतराच्या लढ्याला धार आली असतानाचे पुस्तक. ‘गुजराथला जेव्हा जाग येते…’ २००२ च्या नंतरचे!

ही पुस्तके कडव्याच विचारांचा पुरस्कार करणारी असली तरी, वाचकाच्या गळी आपली मते उतरवण्याचे दादुमियांचे कसब त्यातून दिसते. ‘माणूस’, ‘सोबत’ या साप्ताहिकांतील सदरांतूनही लिखाणातली रोचकता त्यांनी जपली. लोकांना काय माहीत असेल, काय वाटत असेल याचा अचूक अंदाज त्यांना असल्याने हे लिखाण नेमके होते. लोकसंग्रहही मोठा. तोही चतुरपणे, मानवी प्रतिष्ठेला धक्का बसणार नाही, याची काळजी घेण्याच्या औदार्याने राखलेला. दादुमियांशी झालेली चर्चा लक्षात राही- मग तो एखादा डावा कार्यकर्ता का असेना! हे गुण मोदींच्या कार्यकर्त्यांतही असावेत, अशी तीव्र इच्छा ‘मोदींचे सल्लागार’ अशीही ख्याती असलेल्या दादुमियांना होती.

मराठीतील सर्व स्तंभ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loksatta vyaktivedh dr damodar vishnu nene baroda encyclopaedia hindusthanika the book amy
First published on: 22-05-2024 at 05:42 IST