एके दिवशी शाळेच्या बसमधून उतरताना जेसिका खाली पडली आणि तिच्या हाताला लागले. दुखरा हात घेऊन रडत घरी आलेल्या जेसिकाला तिची आई डॉक्टरांकडे घेऊन गेली. डॉक्टरांनी तिच्या हाताला प्लॅस्टर घातले.
डॉक्टरांकडून घरी येताना आई तिला खेळण्यांच्या दुकानात घेऊन गेली. काचेच्या कपाटात पांढरा ससा, टेडी बेअर, उंट, बाहुल्या अशी वेगवेगळी स्टफ टॉइज मांडून ठेवली होती. शेवटच्या कप्प्यात मात्र एकच बाहुली होती. त्या बाहुलीचे नाव बीबा. बीबाला वाटत होते की, आपल्यालाही  कोणीतरी खेळायला घेऊन जावे. पण काय करणार? बिचारीचा एक हात निखळला होता. केसांवर धूळ बसली होती आणि फ्रॉकही मळला होता. त्यामुळे तिला कोणीच घेत नव्हते.
दुकानात खेळणी बघत िहडता िहडता जेसिकाचे लक्ष कपाटातील ती बाहुली- बीबाकडे गेले. तिला ती निळ्या डोळ्यांची, सोनेरी केसांची बीबा खूप आवडली. तिने पटकन बाहुलीला उचलून घेतले; पण दुकानदार तिला म्हणाला, ‘‘या बाहुलीचा हात मोडला आहे. तिचे कपडे मळले आहेत, त्यामुळे आम्ही आता ती टाकून देणार आहोत. तू दुसरा काहीतरी खेळ घे.’’
जेसिका म्हणाली, ‘‘माझा जसा खेळताना हात मोडला आहे तसाच या बाहुलीचाही हात मोडला आहे, म्हणून काही तिला टाकून द्यायची जरूर नाही. आई आता माझी जशी काळजी घेत आहे तशीच मीसुद्धा या बाहुलीची काळजी घेईन. जेसिकाचा हट्ट बघून आईने तिच्यासाठी ती बाहुली घेतली आणि दुकानदाराला पसे द्यायला लागली.
जेसिका आपल्या एका हाताने बीबाला घट्ट धरून उभी होती. तिच्या चेहऱ्यावरचे निरागस हसू आणि आनंद बघून दुकानदार म्हणाला, ‘‘मी या बाहुलीचे पसे घेणार नाही. तुमच्या मुलीच्या चेहऱ्यावरचे हसू म्हणजेच बाहुलीची किंमत आहे. कारण सगळी खेळणी ही लहान मुलांना आनंद देण्यासाठीच असतात.’’ जेसिका व तिची आई दुकानदाराचे आभार मानून दुकानातून बाहेर पडल्या. घरी आल्यावर आईने सुई-दोरा घेऊन बीबा बाहुलीचा निखळलेला हात शिवून टाकला आणि तिचा फ्रॉकही धुतला. जेसिकाने तिचे केस ओल्या कापडाने पुसून स्वच्छ केले आणि त्यांची वेणी घालून त्यावर छानशी रिबिन बांधली. सारा दिवस ती बीबा बाहुलीशीच खेळत होती.
स्वच्छ फ्रॉक आणि डोक्यावरच्या रिबिनीमुळे निळ्या डोळ्यांची बीबा आणखीनच सुंदर दिसायला लागली होती. जेसिकाने पटकन उचलून तिचा पापा घेतला. बीबाला खूप आनंद झाला. रडवेल्या चेहऱ्याने एका कप्प्यात पडलेल्या बीबाला जेसिकामुळे नवीन जीवन मिळाले होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व बालमैफल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: A story of jessicas doll
Show comments