डॉ. गीतांजली घाटे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

एक होता ससा! आणि तो भित्रा मात्र मुळीच नव्हता, उलट खूप खूप धीट होता. इतका धीट की इतरांना घाबरवणं हा त्याचा छंदच होता. झोपलेल्या सिंहाच्या आयाळीत टुणकन् उडी मारायचा आणि सिंह उठला की खो खो हसत बिळात पळून जायचा. जंगलचा राजा असूनही सिंह काहीच करू शकायचा नाही. ससुल्याच्या एवढुश्या बिळात त्याला हातच घालता यायचा नाही. हत्ती पाणी पिताना दिसला की ससुल्या हत्तीच्या पायाचा चावा घ्यायचा आणि बिळात धूम ठोकायचा. झाडावर बसलेल्या माकडाची लोंबकळणारी शेपटी इतकी जोरात खेचायचा की, दुखण्यानं माकड रडकुंडीला यायचं. सगळय़ाच प्राण्यांची काही ना काही खोडी काढून ससा त्यांना त्रास द्यायचा. सशाच्या या वागण्याला सगळे प्राणी खूप वैतागले होते. त्यांना सशाला अद्दल घडवायची होती, पण ते काहीच करू शकत नव्हते. कारण ससा जसा खोडकर होता ना, तसाच तो खूप हुशारही होता. तो कोणाच्या हातात येतच नसे मुळी. कोणी त्याला पकडायच्या आत धूम ठोकायचा आणि बिळात जाऊन हसत राहायचा. बिळ तर इतकं खो २२२ ल होतं ना त्याचं की कोणीच आत जाऊ शकत नसे; किंवा कोणाचा हातही त्याच्यापर्यंत पोचू शकत नसे. हळूहळू सशाला मस्तीच चढली. आपण काहीही केलं तरी आपल्याला कोणी काही करू शकणार नाही, असं त्याला वाटायला लागलं. लहान-मोठे, अशक्त-दुबळे या सगळय़ाचा त्याला विसर पडला. चिमणी, कावळा यांच्या छोटय़ा छोटय़ा पिल्लांनाही तो त्रास देऊ लागला. त्यामुळे त्यांना जमिनीवर येऊन अन्न शोधता येईना की जमिनीवरून उडायला शिकता येईना, बिचारी त्यांच्या घरटय़ातून बाहेरच येईनात.

एके दिवशी तर कहरच केला सशाने! सापाची इवली इवली पिल्लं जमिनीवर सरपटायला शिकत होती. त्यांची आई नव्हती त्यांच्यासोबत. मग काय ससोबांना एक कल्पना सुचली. त्यांनी काय केलं, आपल्या लांब लांब कानांनी त्या पिल्लांना फटके द्यायला सुरुवात केली. बिचारी पिल्लं घाबरून गेली. काय करावं तेच त्यांना कळेना. ती भीतीनं थरथरत होती आणि ससा हसत होता. भरभर सरपटून निघून जाणंही त्यांना जमेना आणि ससाही फटके द्यायचं थांबवेना. हे सगळं दुरून जाणाऱ्या कोल्ह्यनं पाहिलं आणि तो सशाला ओरडून म्हणाला, ‘‘नको रे छळूस त्यांना किती छोटी आहेत ती, मरेल ना एखादं!’’

ससा तितक्याच जोरात ओरडून म्हणाला, ‘‘एवढीच भीती वाटतेय तर बसायचं की घरात, कशाला आलीयेत रस्त्यावर. आणि कोल्हेबुवा, तुम्हाला काय करायच्यात नसत्या चौकश्या?’’

रस्त्यावरचा दंगा ऐकून सापांची आई बाहेर आली. तिला बघून सशानं धूम ठोकली बिळात आणि यावेळी दगडांनी बीळ झाकूनही टाकलं.

आपल्या पिल्लांची अवस्था बघून ती फुत्कारून रडायला लागली. तिचा आवाज ऐकून जंगलातले प्राणी तिच्याभोवती गोळा झाले. कोल्ह्यनं सगळय़ांना हकीकत सांगितली. मेलेलं पिल्लूही दाखवलं. ते पाहून सगळय़ा प्राण्यांना खूप वाईट वाटलं. त्यांना सशाचा प्रचंड राग आला आणि आता मात्र सशाला अद्दल घडवलीच पाहिजे, असं ठरवून सगळे प्राणी देवबाप्पाकडे गेले. त्यांनी सशाचं सगळं वागणं देवबाप्पाच्या कानावर घातलं. ते ऐकून देवबाप्पालाही खूप संताप आला. तो शिपायांना म्हणाला, ‘‘आणा रे त्या उर्मट सशाला पकडून.’’ शिपाईही लगेच सशाच्या बिळाकडे गेले, त्यांनी त्याला देवबाप्पाचा हुकूम सांगितला. पण सशाला माहीत होतं की, हे शिपाईसुद्धा आपल्याला बिळाच्या बाहेर काढूच शकणार नाहीत. शिपाईच काय, तर खुद्द देवबाप्पाही आपलं काही बिघडवू शकणार नाही. त्यामुळे तो जोरात ओरडूनच म्हणाला, ‘‘येत नाही जा, मी नाही घाबरत कोणाला, अगदी देवबाप्पालाही!’’

 शिपाई रिकाम्या हातीच परतले आणि त्यांनी सशाचं बोलणं जसंच्या तसं देवबाप्पाला सांगितलं. आता मात्र देवबाप्पा खूपच संतापला. त्यानं सगळय़ा प्राण्यांना एकेक लांबच लांब अग्नीबाण दिला, ज्याच्या एका टोकाला पेटता निखारा होता. तो प्राण्यांना म्हणाला, ‘‘जा, चांगली अद्दल घडवा त्या सशाला, म्हणजे परत असं काही करणार नाही तो.’’

सगळे प्राणी सशाच्या बिळाकडे गेले. हत्तीनं त्याच्या बिळावरचा दगड सहज बाजूला केला आणि प्राण्यांनी एकदम आठ-दहा अग्नीबाण बिळात सोडले. बिळात आरामात बसलेला ससा मात्र पुरता घाबरला, ‘‘हे काये?’’ म्हणून ओरडायला लागला. बाहेरून प्राणी त्याला म्हणाले, ‘‘येतोस का मुकाटय़ानं बाहेर, का घुसवू बाण अजून आत, घुसवू का,’ म्हणत त्यांनी आणखी बाण आत सोडले. सशाला चटके बसायला लागले. ‘‘ओय ओय मला भाजतंय, नका, नका आत नका सोडू बाण, मी येतो बाहेर, लगेच येतो.’’ असं म्हणायला लागला. ससा बाहेर आला. तो भीतीनं थरथरत होता. त्यानं चक्कं प्राण्यांच्या पायावर लोटांगणच घातलं. ससा इतका घाबरला होता की, ‘माफ करा, माफ करा मला’ इतकंच म्हणत होता. चटक्यांनी त्याच्या अंगाची आग होत होती, तो गडाबडा लोळत होता, रडत होता.

‘‘आता जर परत कोणाला त्रास देशील, तर असेच अग्नीबाण येतील तुझ्या बिळात समजलं का?’’ सिंह महाराजांनी दरडावत विचारलं.

‘‘नाही नाही, असा वेडेपणा मी कध्धी कध्धीच करणार नाही,’’ असं म्हणत त्यानं तिथून धूमच ठोकली आणि सगळे प्राणी निर्धास्त झाले.

तेव्हापासून ससा सगळीकडे घाबरूनच फिरतो. पान जरी पडलं ना झाडाचं, तरी त्याला वाटतं की अग्नीबाणच आलाय त्याला जाळायला आणि तो थरथर कापायला लागतो. अगदी भित्रा झालाय आता ससा!

git28anjali@gmail.com

मराठीतील सर्व बालमैफल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Interesting story for kids amazing story for kids funny story for kids zws
Show comments