गेलं वर्ष संपता संपता मुंबई आयआयटीच्या टेकफेस्टमध्ये खास पाहुणी होती सोफिया. नोव्हेंबर २०१७ पासून देशोदेशी अनेक कार्यक्रमांत प्रेक्षकांच्या प्रश्नांना छानशी उत्तरं देणारी सोफिया आहे हाँगकाँगमध्ये तयार झालेली एक मनॉइड.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कृत्रिम बुद्धिमत्ता असणारा, बराचसा माणसासारखा दिसणारा रोबोट म्हणजे मनॉइड. असे मनॉइड्स चेहऱ्यावरून माणसं ओळखू शकतात. आपल्याशी आपल्या भाषेत बोलू शकतात. न थकता, न कंटाळता ते कारखाने, ऑफिस, दुकाने अशा ठिकाणी काम करू शकतात.

सौदी अरेबिया या देशाने सोफियाला आपल्या देशाची नागरिक म्हणून घोषित केले आहे. एखाद्या देशाची नागरिक असणारी ही पहिलीच मनॉइड.

सोफिया विचारलेल्या प्रश्नांना अगदी व्यवस्थित उत्तरं देते. ती कशी देते? ही उत्तरं तिला कोणी पढवलेली नाहीत, तर अवतीभवती जे काही घडतं, ते समजून घेऊन ती त्यातून शिकत असते. आजूबाजूच्या गोष्टी पाहून त्यांचे अर्थ लावणारे प्रोग्राम तिच्यात आहेत. ती ऑनलाइन जाते आणि तिथे कशावर चर्चा होते, कोणत्या बातम्या येतात, हेही बघत असते.

आपण वेगवेगळ्या माध्यमांमधून माहिती मिळवून आपलं मत बनवतो. सोफियाही आपली उत्तरं तशीच तयार करते. आहे की नाही कृत्रिम बुद्धिमत्तेची कमाल?

पण कधी कधी अवघड प्रश्न आले की आपण गोंधळतो की नाही? तसंच सोफियाचं झालं. टेकफेस्टमध्ये सुंदर साडीत आलेली ही मनॉइड एका प्रश्नावर अडखळली. जगात कितीतरी मोठय़ा समस्या आहेत. अशा वेळी रोबोट्स संशोधनात इतके पैसे खर्च करणे योग्य आहे का, हा प्रश्न ऐकताच सोफिया एकदम गप्प झाली! आयोजकांनी काहीतरी कारणं देत पुढचा प्रश्न घेतला. तेव्हा मात्र सोफियाने नीट उत्तर दिलं.

का गप्प झाली असेल सोफिया? तिला प्रश्न कळला नाही की आवडला नाही? अर्थात मनॉइड आपल्याला नवे असल्याने याचं उत्तर मिळवायला आपल्याला आणखी वाट पाहायला लागेल!

मेघश्री दळवी

meghashri@gmail.com

मराठीतील सर्व बालमैफल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Worlds first robot citizen sophia to visit iit bombay
Show comments