भारतीय अर्थव्यवस्था आणि भांडवली बाजाराबाबत आशादायक दृष्टीकोन जेफरीज या जागतिक गुंतवणूक सल्लागार संस्थेने गुरुवारी प्रसिद्ध केलेल्या टिपणांतून वर्तवला असून, २०२७ पर्यंत भारत ही जगातील तिसरी मोठी अर्थव्यवस्था बनेल तर २०३० पर्यंत देशाच्या भांडवली बाजाराचे एकूण बाजार भांडवल हे सध्याच्या तुलनेत दुपटीहून अधिक वाढून १० लाख कोटी डॉलरची पातळी गाठेल, असा या टिपणाचा अंदाज आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शाश्वत आर्थिक विकासाच्या प्रक्रियेत, २०३० पर्यंत भारतीय भांडवली बाजार १० ट्रिलियन (लाख कोटी) अमेरिकी डॉलरच्या बाजार मूल्यापर्यंत पोहोचेल, असा जेफरीजचा अंदाज आहे. अहवालात असे निरीक्षण नोंदवण्यात आले आहे की, भारताचे बाजार भांडवल सध्या ४.३ ट्रिलियन डॉलर असून, ते अमेरिका (४४.७ ट्रिलियन डॉलर), चीन (९.८ ट्रिलियन डॉलर), जपान (६ ट्रिलियन डॉलर) आणि हाँगकाँग (४.८ ट्रिलियन डॉलर) यांच्यानंतर जगात पाचव्या स्थानावर आहे. भारतीय भांडवली बाजार गेल्या १० आणि २० वर्षांच्या कालावधीत डॉलरच्या हिशेबाने सातत्याने १० त १२ टक्के वार्षिक सरासरी दराने परतावा मिळवत आला असून, उदयोन्मुख बाजारपेठांच्या श्रेणीत इतर कोणत्याही देशाच्या तुलनेत ही कामगिरी समाधानकारक आहे.

हेही वाचा >>> ‘डीएचएफएल’च्या वाधवान बंधूंच्या बँक, डीमॅट खात्यांवर टाच 

गेल्या दहा वर्षांत, भारतामध्ये मूलभूत संरचनात्मक सुधारणा झाल्या असून, त्याने देशाला त्यांच्या क्षमतांचा पूर्णपणे वापर करण्यासाठी ठोस चौकट आखून देणारी पायभरणी केली आहे. या सुधारणांच्या परिणामी जगातील सर्वाधिक वेगाने वाढ साधलेली विशाल अर्थव्यवस्था म्हणून भारताला स्थान कायम राखता आले असल्याचे न्यूयॉर्क येथे मुख्यालय असलेल्या या संस्थेने म्हटले आहे. वस्तू आणि सेवा कराची (जीएसटी) अंमलबजावणी, रेरा, रस्ते, विमानतळ, रेल्वे या पायाभूत सुविधांच्या विकासावरील भर, यूपीआय, डीबीटी, आधार या माध्यमातून डिजिटल पायाभूत रचनेचा वाढता विस्तार अशा मोदी सरकारच्या काळात झालेल्या सुधारणांचा टिपणांत उल्लेख आहे.

हेही वाचा >>> जीपी पारसिक सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी विक्रम पाटील; व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी केसरीनाथ घरत

ॲमेझॉन, सॅमसंगही ह्युदांईच्या वाटेवर…

मजबूत वाढीची दृश्यमानता, भारतीय बाजारपेठेचे वाढते महत्त्व आणि उच्च परतावा निर्माण करण्याच्या पूर्व कामगिरीमुळे भारतीय भांडवली बाजारात परदेशी गुंतवणुकीचा ओघ वाढेल. शिवाय भारतात गुंतवणूक करणाऱ्या अनेक बहुराष्ट्रीय कंपन्यांना स्थानिक बाजारात सूचिबद्ध होण्याची हीच वेळ ठरेल. ॲमेझॉन, सॅमसंग, ॲपल, टोयोटा या सारख्या मोठ्या जागतिक कंपन्यांही भारतीय भांडवली बाजाराची वाट चोखाळतील, असाही या टिपणाचा सूर आहे. दक्षिण कोरियाच्या ह्युंदाई या बहुराष्ट्रीय कंपनीच्या, भारतीय उपकंपनीने भारतीय बाजारात सूचीबद्धतेचा निर्णय घेतला आहे, असे  उदाहरण या टिपणांत आहे.

मराठीतील सर्व अर्थवृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: India will be the third largest economy in the world by 2027 says jefferies print eco news zws