नवी दिल्ली : स्वयंपाकघरातील चीज-वस्तूंसह, अन्नधान्य, पेयांच्या वाढलेल्या किमतींचा सर्वसामान्यांच्या खिशाला जाच कायम असल्याचे, सरलेल्या एप्रिलमध्ये जवळपास त्याच पातळीवर राहिलेल्या ४.८३ टक्क्यांच्या किरकोळ महागाई दराने दाखवून दिले.  

सोमवारी जाहीर झालेल्या सरकारी आकडेवारीनुसार. एप्रिलमध्ये ग्राहक किंमत निर्देशांकावर आधारीत किरकोळ महागाई दर नाममात्र घसरून ४.८३ टक्क्यांवर नोंदवण्यात आला. मार्चमध्ये हा दर किंचित जास्त म्हणजे ४.८३ टक्के होता. तर एप्रिल २०२३ मध्ये हा दर ४.७० टक्के होता.

हेही वाचा >>> देश पुन्हा १९९२ पूर्वीच्या अराजकतेत गेल्याचे गुंतवणूकदारांना नकोच; एस. जयशंकर, बाजार अस्थिरता मतदानाच्या पुढील टप्प्यात संपुष्टात येण्याचा दावा 

राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, खाद्य श्रेणीतील महागाई एप्रिलमध्ये ८.७० टक्क्यांवर होती आणि मार्चमधील ८.५२ टक्क्यांवरून त्यात वाढ झाली आहे. त्यामुळे एप्रिलमध्ये जरी किरकोळ महागाई दर ११ महिन्यांच्या नीचांकी पातळीवर ओसरला असला तरी, अन्नधान्यांच्या महागाईसंबंधी अनिश्चितता आणि सर्वसामान्यांना त्याच्या झळा मात्र कायम आहेत. शिवाय हा  दर सलग ५५ व्या महिन्यांत, रिझर्व्ह बँकेने निर्धारीत केलेल्या चार टक्क्यांच्या लक्ष्यापेक्षा जास्त राहिला आहे.. मध्यवर्ती बँकेकडून कर्जावरील व्याज दरात कपात करायची झाल्यास, महागाई दर टिकाऊ आधारावर ४ टक्क्यांखाली घसरणे गरजेचे बनले आहे.