लोकसत्ता व्यापार प्रतिनिधी
मुंबई : बँकेतर वित्तीय कंपनी पूनावाला फिनकॉर्पने सोमवारी ३१ मार्च रोजी संपलेल्या तिमाहीत ३३२ कोटी रुपयांचा आतापर्यंतचा सर्वोच्च तिमाही निव्वळ नफा नोंदवला, जो वार्षिक तुलनेत ८४ टक्क्यांनी आणि तिमाहीगणिक २५ टक्क्यांनी वाढला आहे.आर्थिक वर्ष २०२३-२४ साठी, कंपनीने वार्षिक ८३ टक्क्यांच्या वाढीसह, १,०२७ कोटी रुपयांचा आतापर्यंतचा विक्रमी वार्षिक निव्वळ नफा नोंदवला आहे. मागील वर्षीच्या याच कालावधीत ५७७ कोटी रुपयांच्या तुलनेत कंपनीचा एकूण महसूल यंदा ९१५ कोटी रुपयांवर गेला आहे. कंपनीने दिलेल्या अहवालानुसार, सरलेल्या तिमाहीत तिच्या  व्यवस्थापनाखालील मालमत्तेत ५५ टक्के वाढ नोंदवली गेली असून ती २५,००३ कोटी रुपये झाली आहे.

मालमत्तेच्या गुणवत्तेत सुधारणाही दिसून आली असून, सकल अनुत्पादित मालमत्ता (ग्रॉस एनपीए) वार्षिक तुलनेत २८ आधारबिंदूंनी कमी होऊन १.१६ टक्क्यांवर सीमित राहिली आहे, तर नक्त अनुत्पादित मालमत्ता (नेट एनपीए) ०.५९ टक्के आहे. नक्त व्याजापोटी नफाक्षमताही (निम) वाढून ११.०६ टक्क्यांवर पोहोचली असल्याचे कंपनीने म्हटले आहे.सोमवारच्या सत्रात कंपनीच्या शेअरची किंमत ०.८१ टक्क्यांनी वाढून बीएसईवर ४८८.८० रुपयांवर स्थिरावली.

मराठीतील सर्व अर्थवृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Poonawala fincorp posts highest quarterly net profit at rs 332 crore print eco news amy
First published on: 30-04-2024 at 08:13 IST