Paytm Payments Bank: पेटीएम पेमेंट्स बँकेचे सहसंस्थापक विजय शेखर शर्मा यांनी बिगर कार्यकारी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. तसेच One97 Communication Limited ने पेटीएम पेमेंट्स बँकेच्या संचालक मंडळातून आपल्या नामनिर्देशित व्यक्तीला मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे, त्यानंतर विजय शेखर शर्मा यांनीदेखील बोर्ड सदस्यपदाचा राजीनामा दिला. पेटीएम पेमेंट्स बँक लिमिटेडचा भविष्यातील व्यवसाय आता नव्यानं स्थापन केलेल्या मंडळाद्वारे चालवला जाणार आहे.

नवीन मंडळाची निर्मिती

स्टॉक एक्स्चेंजकडे नियामक फायलिंगमध्ये पेटीएमची मूळ कंपनी One97 कम्युनिकेशन्स लिमिटेडने म्हटले आहे की, पेटीएम पेमेंट्स बँकेने बोर्डाची पुनर्रचना करण्याचा निर्णय घेतला आहे. सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे माजी अध्यक्ष श्रीनिवासन श्रीधर, सेवानिवृत्त IAS देबेंद्रनाथ सारंगी, बँक ऑफ बडोदाचे माजी कार्यकारी संचालक अशोक कुमार गर्ग आणि सेवानिवृत्त ISS रजनी सेखरी सिब्बल यांचा बोर्डात समावेश करण्यात आला आहे.

हेही वाचाः Google Pay ‘या’ देशात बंद होणार, भारतात काय परिस्थिती असेल?

नवीन अध्यक्षांची नियुक्ती केली जाणार

One97 Communications Limited ने नियामक फायलिंगमध्ये म्हटले आहे की, त्यांच्या सहयोगी पेटीएम पेमेंट्स बँकेने नवीन संचालक मंडळ नियुक्त केले आहे. हे सदस्य नुकतेच स्वतंत्र संचालक म्हणून कंपनीत सामील झाले आहेत. ते पेटीएम पेमेंट्स बँकेच्या केवळ स्वतंत्र आणि कार्यकारी संचालक मंडळाला समर्थन देणार आहे. तसेच त्यांनी नामनिर्देशित व्यक्तीला काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे. विजय शेखर शर्मा यांनीही पेटीएम पेमेंट्स बँकेच्या संचालकपदाचा राजीनामा दिला आहे. पेटीएम पेमेंट्स बँक नवीन अध्यक्ष नियुक्त करण्याची प्रक्रिया सुरू करेल, असंही One97 कम्युनिकेशन्सने सांगितले.

हेही वाचाः बायजू रवींद्रन यांच्या हकालपट्टीचा भागधारकांचा कौल; मतदान अवैध असल्याचा कंपनीचा दावा

आरबीआयच्या कारवाईमुळे अडचणी वाढल्या

पेटीएम पेमेंट्स बँक आणि विजय शेखर शर्मा यांच्या अडचणी ३१ जानेवारी २०२४ पासून वाढल्या, जेव्हा RBI ने पेटीएम पेमेंट्स बँकेवर मोठी कारवाई केली आणि नवीन ग्राहक जोडण्यावर बंदी घातली. पेटीएमवर बँकिंग नियमनाबाबत अनियमितता केल्याचा आरोप आहे. तसेच वारंवार विनंती करूनही त्याची पूर्तता होत नव्हती. यापूर्वी आरबीआयने म्हटले होते की, २९ फेब्रुवारी २०२४ नंतर कोणताही ग्राहक पेटीएम वॉलेटमध्ये पैसे जमा करू शकणार नाही, क्रेडिट व्यवहार करू शकणार नाही किंवा पेटीएम वॉलेट टॉप अप करू शकणार नाही, परंतु नंतर ही मुदत १५ मार्च २०२४ पर्यंत वाढवण्यात आली. ग्राहकाच्या वॉलेटमध्ये बॅलन्स असलेली रक्कम संपेपर्यंत वापरली जाऊ शकते.

एम दामोदरन यांच्या अध्यक्षतेखाली गट सल्लागार समिती

८ फेब्रुवारी २०२४ रोजी RBI गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी पेटीएम पेमेंट बँकेवर कारवाई केली. पेटीएम पेमेंट बँकेविरुद्ध ही एक पर्यवेक्षी कारवाई असल्याचंही त्यांनी सांगितलं होतं. कारण कंपनी नियामक नियमांचे पालन करत नव्हती. पेटीएम पेमेंट बँकेविरुद्ध आरबीआयच्या मोठ्या कारवाईनंतर मूळ कंपनी One97 कम्युनिकेशन्स लिमिटेडने SEBI चे माजी अध्यक्ष एम दामोदरन यांच्या अध्यक्षतेखाली एक गट सल्लागार समिती देखील स्थापन केली आहे, जी कंपनीच्या बोर्डाबरोबर अनुपालन आणि नियामक समस्या सुधारण्याबरोबरच त्या मजबूत करण्यासाठी काम करेल.