उद्गम कर म्हणजेच टीडीएस हा सर्वांना माहितीचा झाला आहे. या लेखात करदात्याला मिळणाऱ्या उत्पन्नावरील उद्गम कराच्या तरतुदी बघू. करदात्यांना मिळणाऱ्या उत्पन्नावर कर कापण्याच्या तरतुदी आहेत. पगार, व्याज, व्यावसायिक उत्पन्न, कंत्राटी उत्पन्न, घरभाडे, जीवन विम्याच्या मुदतीनंतर मिळणारे करपात्र उत्पन्न अशा विविध उत्पन्नावर वेगवेगळ्या दराने उद्गम कर कापण्यात येतो. हा कापलेला कर, करदाता आपल्या त्या वर्षीच्या करदायित्वातून वजा करू शकतो किंवा करपरताव्याचा (रिफंड) दावा देखील करू शकतो. उद्गम कर म्हणजे काय, तो कोणाकडून कापला जातो, तो न कापण्यासाठी काय करावे याविषयी माहिती या लेखातून घेऊ.

उद्गम कर म्हणजे काय?

उद्गम कर म्हणजे काही व्यवहारांवरील देण्यांवर ही देणी देतानाच त्यातून कर कापून घेणे. उदा. बँक, ठेवींवरील व्याज देताना त्यावर १०% उद्गम कर कापून बाकी रक्कम ठेवीदाराच्या खात्यात जमा करते. ही कापलेली रक्कम ठेवीदाराच्या प्राप्तिकर कायद्याच्या स्थायी खाते क्रमांकावर (पॅन) जमा केली जाते. ही उद्गम कराची रक्कम बरोबर जमा झाली की नाही याची खातरजमा ठेवीदार आपल्या पॅन वर लॉग-इन करून करू शकतो. उद्गम कराच्या तरतुदी प्राप्तिकर कायद्यात आणल्या गेल्या यामागे प्रामुख्याने दोन उद्देश आहेत एक म्हणजे सरकारकडे कर जमा होतो आणि दुसरा म्हणजे सरकारकडे अशा व्यवहारांची माहिती उपलब्ध होते.

हेही वाचा >>>Money Mantra : फंड विश्लेषण – इव्हेस्को इंडिया लार्ज कॅप फंड

उद्गम कराच्या कक्षा मागील काही वर्षात वाढविल्या गेल्या जेणेकरून करदात्यांच्या व्यवहारांची माहिती प्राप्तिकर खात्याला उपलब्ध होईल.

सरकारकडून मोठ्या व्यवहारांची माहिती विविध माध्यमातून गोळा केली जाते. अशा माध्यमात उद्गम कराचा मोठा वाटा आहे. त्याशिवाय विविध बँक, संस्था, कंपन्या, सरकारी संस्था यांच्याकडून दरवर्षी वार्षिक माहिती अहवालाद्वारे (ए.आय.आर.) माहिती मागविली जाते. यामध्ये प्रामुख्याने मोठ्या रकमांच्या व्यवहारांचा समावेश होतो. उदा. खात्यात जमा केलेली रोख रक्कम, गाडी खरेदी, घर खरेदी वगैरे. ही माहिती, करदात्यांचे उत्पन्न आणि त्यांनी केलेले मोठ्या रकमेचे व्यवहार विवरणपत्रातील माहितीशी तपासले जातात किंवा असे उत्पन्न मिळालेल्या करदात्याने विवरणपत्रच दाखल केले नसेल तर प्राप्तिकर खात्यातर्फे याची विचारणा होऊ शकते. यासाठी तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्ता याचा उपयोग केला जातो.

उद्गम कर कोणत्या रकमेवर कापला जातो?

व्याज, लाभांश, घरभाडे, व्यावसायिक देणी, कंत्राटी देणी, दलाली, स्थावर मालमत्ता खरेदी, बँकेतून काढलेली रोख रक्कम, वगैरे देण्यांवर उद्गम कर कापला जातो. या प्रत्येक प्रकारच्या देण्यामध्ये किमान रकमेची मर्यादा आहे. उदा. बँकेतील मुदत ठेवींवरील व्याज एका वर्षात ४०,००० रुपयांपेक्षा (ज्येष्ठ नागरिकांसाठी ५०,००० रुपये) जास्त असल्यास त्यावर १०% दराने उद्गम कर कापला जातो. या उद्गम कराचा दर हा देय रकमेच्या प्रकारानुसार १% ते १०% पर्यंत आहे. लाभांश, व्यावसायिक देणी, वगैरेंसाठी १०% हा दर आहे. स्थावर मालमत्ता विक्रीसाठी १% दराने उद्गम कर कापला जातो. अनिवासी भारतीयांना दिलेली देणी आणि पगार यासाठी वेगळे नियम आहेत. यासाठी ज्या करदात्याला देणी दिलेली आहेत त्याच्या उत्पन्नावर देय कर हा उद्गम कर म्हणून कापला जातो.  अनिवासी भारतीयांसाठी प्राप्तिकर कायद्यानुसार देय कर किंवा ज्या देशात पैसे पाठवायचे आहेत त्या देशाच्या दुहेरी कर आकारणी करारानुसार, जो करदात्याला फायदेशीर आहे त्यानुसार, उद्गम कर कापला जातो.

हेही वाचा >>>छत्रपतींच्या मावळ्यांचा ‘दांडपट्टा’ राज्यशस्त्र म्हणून घोषित; सुधीर मुनगंटीवार यांची आग्रा किल्ल्यामधून घोषणा

उद्गम कर न कापण्याची विनंती

ज्या करदात्यांचे उत्पन्न कमाल करमुक्त उत्पन्नाच्या मर्यादेपेक्षा कमी आहे आणि त्यांच्या उत्पन्नावर उद्गम कर कापला गेला तर त्यांना विवरणपत्र भरूनच करपरताव्याचा (रिफंड) दावा करावा लागतो. अशा करदात्यांचा त्रास कमी करण्यासाठी प्राप्तिकर कायद्यात उद्गम कर न कापण्याची किंवा कमी दराने कापण्याची विनंती करण्याची तरतूद आहे. वैयक्तिक करदाते (जे निवासी भारतीय आहेत)  १५ जी किंवा १५ एच या स्वयंघोषित फॉर्मद्वारे उद्गम कर न कापण्याची विनंती पैसे देणाऱ्यांना करू शकतात. वैयक्तिक करदाते, जे निवासी भारतीय आहेत, अशांना व्याजाचे उत्पन्न, घरभाडे उत्पन्न, राष्ट्रीय बचत योजनेच्या (एन.एस.एस.) अंतर्गत रक्कम काढल्यास, विमा कमिशन, लाभांश, जीवन विमा पॉलिसीची रक्कम, भविष्य निर्वाह निधीतील रक्कम अशा प्रकाराचे उत्पन्न मिळत असेल तर त्यांनी फॉर्म १५ जी किंवा १५ एच हा फॉर्म पैसे देणाऱ्या व्यक्ती किंवा संस्थांना दिल्यास त्यावर उद्गम कर कापला जात नाही. हा फॉर्म अनिवासी भारतीयांना देता येत नाही. इतर प्रकारच्या करदात्यांसाठी आणि उत्पन्नासाठी मात्र प्राप्तिकर अधिकाऱ्याकडून उद्गम कर न कापण्याचा किंवा कमी दराने कापण्याचा आदेश, अर्ज करून, प्राप्त करावा लागतो.

पॅन असणे गरजेचे

पॅन हे प्राप्तिकर खात्याने दिलेले एक प्रकारचे ओळखपत्र आहे. बँकेत खाते उघडण्यासाठी, घर, गाडी, खरेदी करण्यासाठी, बँकेत मोठी रक्कम जमा करण्यासाठी असे व्यवहार करणाऱ्याकडे पॅन असणे आवश्यक आहे. ज्या व्यक्तीला उत्पन्न मिळते आणि ज्याला उद्गम कराच्या तरतुदी लागू आहेत अशांचा पर्मनंट अकाऊंट नंबर (पॅन) असणे बंधनकारक आहे. ज्या करदात्यांकडे पॅन नाही अशांसाठी उद्गम कर जास्त दराने कापण्याची तरतूद आहे. ज्या करदात्यांकडे पॅन नाही अशांसाठी २०% दराने उद्गम कर कापला जातो आणि पॅन नसल्यामुळे विवरणपत्र दाखल करून त्याचा परतावा घेणे कठीण होते. ज्या करदात्यांनी पॅन आणि आधारची जोडणी केलेली नाही अशांचा पॅन आता अक्षम झाला आहे. अशा करदात्यांकडे पॅन नाही असेच समजले जाईल आणि त्यानुसार देय रकमेवर उद्गम कर २०% या दराने कापला जाईल. तसेच त्याला विवरणपत्र दाखल करता येणार नाही, रिफंड मिळणार नाही. ज्या करदात्यांनी अद्याप पॅन आणि आधारची जोडणी केली नसेल त्यांनी त्वरित अतिरिक्त शुल्क भरून ती करून घ्यावी जेणेकरून पॅन परत सक्रीय होईल आणि आर्थिक व्यवहार सुलभ होतील, 

उद्गम कर आणि फॉर्म २६ एएस

व्यक्तीने कापलेला उद्गम कर हा करदात्याच्या फॉर्म २६ एएस मध्ये दिसतो. करदात्याने आपला फॉर्म २६ एएस हा नियमित तपासून बघितला पाहिजे. जर एखाद्या व्यक्तीने उद्गम कर कापला असेल आणि तो करदात्याच्या फॉर्म २६ एएस मध्ये दिसत नसेल तर त्याचा पाठपुरावा उद्गम कर कापणाऱ्या व्यक्तीकडे करावा. जो पर्यंत उद्गम कराची रक्कम या फॉर्म मध्ये दिसत नाही तो पर्यंत करदात्याला त्याच्या करदायित्वातून ती रक्कम वजा करता येत नाही किंवा त्याचा परतावा तो घेऊ शकत नाही. 

या लेखात करदात्याला मिळालेल्या उत्पन्नाच्या उद्गम कराविषयी माहिती घेतली, पुढील लेखात सामान्य करदात्यांना कापाव्या लागणाऱ्या उद्गम कराविषयी माहिती घेऊ.