लोकश थोरात

नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागील लेखामध्ये आपण पूर्वपरीक्षेत भूगोल या विषयाचे महत्त्व, भूगोलाची प्रश्नसंख्या व भूगोलाचा अभ्यासक्रम यावर विस्तृतपणे चर्चा केली. आजच्या लेखामध्ये आपण अभ्यासक्रमापैकी जगाचा प्रादेशिक भूगोल हा घटक, भूगोल प्रश्नांचे स्वरूप, या विषयाच्या तयारीची रणनीती व संदर्भ साहित्याबद्दल सविस्तर चर्चा करणार आहोत.

मागील लेखात आपण प्राकृतिक भूगोल, मानवी भूगोल, भारताचा भूगोल या घटकांच्या अभ्यासक्रमाची पोटफोड केली, आता आपण चौथ्या म्हणजेच जगाच्या प्रादेशिक भूगोलाबद्दल माहिती घेऊयात. प्रादेशिक भूगोल म्हणजे कोणत्याही प्रदेशाच्या (उदा. भारत, आफ्रिका खंड, आशिया खंड) प्राकृतिक व मानवी भूगोलाचा सर्व बाजूंनी केलेला सविस्तर अभ्यास होय. या घटकात आपण जगातील सर्व खंड म्हणजेच उत्तर अमेरिका, युरोप, आशिया, ऑस्ट्रेलिया व न्यूझीलंड (ओशियानिया), आफ्रिका, दक्षिण अमेरिका व अंटार्क्टिका यांचा सविस्तर अभ्यास करतो, सर्वप्रथम त्या खंडाचा राजकीय भूगोल पाहावा, म्हणजे खंडातील देश, त्यांच्या राजधान्या, जुनी राजधानी असेल तर त्या, कर्कवृत्त, विषुववृत्त, मकरवृत्त किंवा मूळ रेखावृत्त जाणारे देश, देशांच्या एकमेकांसोबत असणाऱ्या सीमा या सर्व गोष्टी नकाशाद्वारे अभ्यासाव्यात.

हेही वाचा >>> माझी स्पर्धा परीक्षा : समाज म्हणून यशाच्या व्याख्या बदलायला हव्यात

यानंतर नकाशाद्वारे त्या खंडाचा प्राकृतिक, आर्थिक व सामाजिक भूगोल अभ्यासावा. त्या खंडातील प्राकृतिक वैशिष्ट्ये जसे पर्वतरांगा, शिखरे, वाळवंट, महत्त्वाच्या नदया – त्यांच्या उपनद्या, धरणे, काठावरील बाहरे, पठारे, बेटे अशा गोष्टी पाहाव्यात. आर्थिक व सामाजिक भूगोलामध्ये त्या खंडातील महत्त्वाची पिके, खनिजे, उद्याोग, वनसंपत्ती, आदिम जमाती (उदा. आफ्रिका) इत्यादींचा सविस्तर अभ्यास करावा. हा घटक व भारताचा भूगोल अभ्यासताना नकाशा वाचनावर आत्यंतिक भर देणे गरजेचे आहे. कोणतेही भौगोगिक वैशिष्ट्य अभ्यासताना ते नकाशामध्ये पाहणे खूप गरजेचे आहे. नकाशावाचनामध्ये तुम्ही खालील गोष्टी पाहणे आवश्यक आहे.

१) राजकीय – महत्त्वाची शहरे, त्यांचा उत्तर-दक्षिण किंवा पूर्व-पश्चिम क्रम, राज्य किंवा देशांच्या सीमा, चालू घडामोडींमध्ये चर्चेतील शहरे, प्रदेश किंवा देश इ.

२) नदया- त्यांचा उगम, उपनद्या, काठावरील शहरे, प्रकल्प, एखादे भौगोलिक वैशिष्ट्य असेल तर.

३) पर्वतरांगा – निर्मिती, त्यांचा प्रकार, महत्त्वाची शिखरे व खिंडी, त्यांचा क्रम इ.

४) वने – वनांचा प्रकार, वितरण, महत्त्वाच्या प्रजाती, आवश्यक हवामान व मृदा.

५) मृदा – मृदेची निर्मिती, प्रकार, वितरण, महत्त्वाची पिके, पोषण द्रव्यांची पातळी.

६) इतर – महत्त्वाची राष्ट्रीय उद्याने, अभयारण्य, महत्त्वाची सरोवरे इ. भारताचा व जगाचा प्रादेशिक भूगोल अभ्यासताना कोऱ्या नकाशामध्ये वरील वैशिष्ट्ये भरून त्याचे वेगवेगळे नकाशे तयार करण्याचा नक्कीच फायदा होतो. आता आपण पूर्व परिक्षेत भूगोल या विषयातून येणाऱ्या प्रश्नांचे स्वरूप पाहूयात. पूर्व परीक्षेत प्रामुख्याने खालील ४ प्रकारचे प्रश्न येतात. १) संकल्पनांवर आधारित (Conceptual) : अशा प्रश्नांसाठी भूगोलातील मूलभूत संकल्पना माहीत असणे गरजेचे आहे. परीक्षेत येणारे सर्वाधिक प्रश्न हे संकल्पनांधारीत असतात. त्यामुळे अभ्यास करताना प्रत्येक संकल्पना व्यवस्थित समजून घेणे गरजेचे आहे. उदा. खालील प्रश्नात सागरजल तापमानावर वाऱ्यांचा होणारा परिणाम माहीत असणे आवश्यक आहे.

हेही वाचा >>> TJSB Sahakari Bank recruitment : टीजेएसबी बँकेत ‘या’ पदासाठी भरती! माहिती पाहा

● प्रश्न – Consider the following statements.

1. In the tropical zones, the western sections of the oceans are warmer than the eastern sections owing the influence of the trade winds.

2. In the temperate zone, westerlies make the eastern sections of the oceans warmer than the western sections. which of the statements given above is/ are correct?

a) 1 only b) 2 only C) Both 1&2 d) Neither 1 nor 2

२) तथ्यावर आधारीत (Factual) : अशा प्रश्नांसाठी विद्यार्थ्यांना वस्तुनिष्ठ माहिती, आकडेवारी, क्रम इ. तोंडपाठ असणे आवश्यक आहे. आकडेवारी किंवा कम लक्षात ठेवताना mnemonics चा वापर उपयुक्त ठरतो. उदा. खालील प्रश्नामध्ये भारतातील बंदरांसंबंधी वस्तुनिष्ठ माहिती विद्यार्थ्यांना लक्षात असणे गरजेचे आहे.

● प्रश्न – Consider the following pairs.

1. Kamarajar Port – first major port in India registered as a company.

2. Mundra Port – Largest privately owned port in India

3. Visakhapatnam port – Largest container port in India

How many of the above pairs are correctly matched ?

a) Only one pair b) Only two pairs c) Only three pairs d) None of the pairs

क) नकाशावर आधारीत प्रश्न (Map based) :- वर उल्लेखल्याप्रमाणे नकाशावाचन हा भूगोलातील अत्यंत महत्त्वाचा भाग असून भारत व जगाच्या प्रादेशिक भूगोलातून तसेच आंतरराष्ट्रीय संबंधातून नकाशाधारीत प्रश्न येत्तात. उदा. खालील प्रश्नात आफ्रिकेतील काँगो नदीखोऱ्या संदर्भात माहिती असणे गरजेचे आहे.

ड) चालू घडामोडी आधारीत : विद्यार्थ्यांनी भारतातील व जगातील महत्वाच्या घडामोडी जसे परिषदा, युद्धाचा परिसर, पायाभूत प्रकल्प, वादातील प्रदेश अशा ठिकाणांचा नकाशाद्वारे अभ्यास करणे गरजेचे आहे. उदा. खालील प्रश्न रशिया-युक्रेन युद्धासंबंधी २०२३ च्या पूर्व परीक्षेतील आहे.

● प्रश्न-Consider the following countries :

1) Bulgaria 2) Czeck Republic 3) Hungary 4) Latvia 5) Lithuania 6) Romania

How many of the above mentioned countries share a land border with Ukraine?

a) only two b) only three c) only four d) only five

आता भूगोलाच्या तयारीविषयी पाहू. सर्वप्रथम भूगोलाचा अभ्यासक्रम सविस्तरपणे पाहून घ्या. या परीक्षेत कोणत्या गोष्टी करायच्या व कोणत्या सोडायच्या हे माहिती असणे महत्त्वाचे आहे. त्यानंतर आपण पाहिलेल्या चारही विभाग व त्यांच्या उपविभागांवर आलेले जुने प्रश्न व त्यांची प्रश्नसंख्या पाहून महत्त्वाचे पाठ ओळखावेत. यानंतर NCERT ची पुस्तके व्यवस्थित वाचावीत. या पुस्तकांची टिपणे लगेच न काढता नंतर संदर्भ पुस्तकांच्या टिपणांमध्ये NCERT पुस्तकांतील महत्त्वाचे मुद्दे लिहावेत. NCERT पुस्तकानंतर कमीतकमी २ ते ३ वेळा संदर्भ पुस्तके वाचावीत. संदर्भ पुस्तकातील कोणताही पाठ वाचण्यापूर्वी त्यावरील जुने प्रश्न आवर्जून पहावीत. यानंतर NCERT पुस्तके व संदर्भ पुस्तकांची एकत्रित टिपणे तयार करावी. टिपणे काढताना पूर्ण वाक्याऐवजी फक्त keywords लिहावेत व अक्षर शक्यतो छोटे ठेवावे. टिपणे काढून झाल्यावर त्याची वारंवार उजळणी करावी. भूगोलाचे संदर्भ साहित्य : ६ वी ते १२ वी ची NCERT ची पुस्तके (मुख्यत्वे ११ वी व १२ वी); Certificate Physical and Human Geography – Goh cheng Leong; प्राकृतिक व मानवी भूगोल – द युनिक पब्लिकेशन किंवा पर्यावरण व भूगोल – ए. बी. सवदी; अॅटलास – ऑक्सफोर्ड किंवा ओरियंट लाँगमन पब्लिकेशन; मासिके – Down to Earth, योजना, कुरुक्षेत्र इ.; वृत्तपत्र — द हिंदू, द इंडियन एक्स्प्रेस इ.