श्रीराम गीत
मुलांनी काही आगळं वेगळं करायचं ठरवलं की, अनेक कंगोरे एकदम टोकदारपणे समोर येतात. हे कंगोरे खरे किती, का खोटे याच वास्तव दाखवण्याचा हा ‘आरसा’. मॉडेलिंग हे क्षेत्र जितकं आकर्षक तितकंच जीवनाचे अनेक पैलू सामोरे आणणारं. या जगाविषयी समाजाला नक्की काय वाटते ते या लेखातून…

कोणत्याही वस्तूची जाहिरात करायची असेल तर मॉडेल हवेच. ते सुद्धा प्राधान्याने सुंदर स्त्रीचेच. दाग -दागिने, वस्त्र प्रावरणे, अगदी अंतर्वस्त्रांची जाहिरात करायला सुद्धा स्त्रियाच पाहिजेत. मिठाईची, नवीन घराची, फर्निचरसाठी किंवा लेदर अॅक्सेसरीज साठी विविध वयातील मॉडेलचा वापर केला जातो. शैक्षणिक जाहिरातींमध्ये किंवा अगदी एखाद्या नवीन निघालेल्या खासगी संस्थेच्या जाहिरातीमध्ये अभ्यासू मुलगी दाखवली जाते. खेळण्यांच्या जाहिराती दाखवताना पण गोंडस मुलगीच हवी.

वृत्तपत्र, टीव्ही किंवा मोबाइलवर मधे मधे दिसणाऱ्या जाहिराती, स्क्रीन उघडताना झळकणाऱ्या विविध उपयुक्त वस्तूंचा मारा करण्यासाठी सुद्धा मॉडेलच हवे. याचाच एक वेगळा मोठा दृश्य प्रकार म्हणजे रस्त्यावर लावलेली होर्डिंग. जितका चौक मोठा, जितका रस्ता मोठा तितका होर्डिंग चा आकार मोठा. दूर वरून वाहन येताना किंवा सिग्नलला थांबलेले असताना होर्डिंग वरच्या मॉडेल कडे लक्ष न गेले तरच आश्चर्य…

मागील पानावरून चालू

हे सारे गेली दीडशे वर्षे जगभरातील अॅड गुरूंनी प्रस्थापित केलेले कटू सत्य समजायला हरकत नाही. या विरुद्ध काही स्त्रियांनी क्षीण आवाज उठवून काहीच फरक पडलेला नाही. त्यामुळे जाहिरातीच्या मॉडेल करता ९० टक्के विविध वयाच्या स्त्रियांचा कलात्मक वापर केला जातो. दहा वर्षाची मुलगी, तिची पस्तीशीतील आई, साठीतील आजी, आणि नव्वदीतील पणजी अशा सर्व वयाच्या मॉडेलचा वापर केला जातो.

एका रात्रीत प्रसिद्धी

एखाद्या मोठ्या ब्रँडने तुम्हाला मॉडेल म्हणून सिलेक्ट केल्यानंतर साऱ्या भारतभर विविध पद्धतीच्या मीडियातून तुमची छबी झळकू लागते. लोक ओळखू लागतात. मन सुखावते. खिशात थोडाफार पैसा खुळखुळू लागतो. मात्र त्याच वेळेला त्या उत्पादनाचे सारे स्पर्धक तुमच्यावर फुली मारत असतात. हे कळेपर्यंत वेळ आणि वय दोन्ही गेलेले असते. काही उत्पादनांसाठी सतत नवीन चेहरे शोधले जातात. काही जाहिरातीत किती एक चेहरे गेल्या पन्नास वर्षात बदलले आहेत. या उलट काही उत्पादनामध्ये तोच चेहरा कायम राखला जातो.

मॉडेलिंग संदर्भात एकदा निवड झाली म्हणजे सातत्याने काम मिळेल असे फारसे घडत नाही. जाहिरातींची मालिका असू शकते किंवा एकच जाहिरात असू शकते. तसेच काम देताना खूप अटी बारीक अक्षरात घातलेल्या असतात. त्याचा यथावकाश अनुभव येऊ लागतो. ‘मितू’ चेच उदाहरण घ्यायचे झाले तर अर्ध्या लाखाचे कॉन्ट्रॅक्ट मिळाल्यानंतर पुढचे काम तिला सातव्या महिन्यात मिळाले असले तर दरमहा किती रुपये हातात पडले? जाहिरातींसाठी ऑडिशन देण्याकरता अक्षरश: शंभर शंभर तरुणी विविध स्टुडिओच्या दारात रांगेत उभ्या असतात. त्यातील ज्या सीनियर असतील किंवा आधी कोणत्यातरी जाहिरातीत चमकल्या असतील त्यांनाही नवीन जाहिरात मिळेल याची कसलीही गॅरंटी नसते. या क्षेत्रात कोणाला आणि का यश मिळेल याची काही ठोकताळे नाहीत. प्रत्येक जाहिरात एजन्सीच्या सौंदर्याच्या कल्पना बदलत असतात. थोडक्यात मी सुंदर आहे म्हणून मला मॉडेलिंगच्या कामाची जाहिरात मिळालीच पाहिजे असे नसते.

आत्तापर्यंत लिहिलेल्या अशा साऱ्या गोष्टींची समाजातील जाणकाराना पुरेशी कल्पना असते. कारण यशाची शक्यता हजारात एखाद्याला व तेही तात्पुरते यश याची माहिती समाजात पुरेशी असते. तरीही दारू, तंबाखू, सिगरेट,अफू, गांजा तब्येतीला हानिकारक असतात हे माहिती असून सुद्धा तिकडे वळणाऱ्यांना थांबवता येत नाही किंवा त्यांची संख्या कमी होत नाही.तसेच दुसरे उदाहरण झटपट पैसा मिळवण्याचे. पत्ते, जुगार, लॉटरी, रेस, मटका यावर बंदी असो किंवा नसो त्यात हरणारे यांची संख्या प्रचंड. सध्या जोरात चालू असलेल्या आयपीएल वर दिवसाला ४००० कोटी रुपयांचे बेटिंग होते अशी बातमी नुकतीच वाचली. अशा जुगारी प्रवृत्तीला जसे थांबवता येत नाही त्याचप्रमाणे मॉडेलिंग आकर्षणाचे आहे. किशोरवयीन मुला-मुलींपासून हे सुरू होते. कॉलेज क्वीन, एखाद्या कार्यक्रमातील नाच, नाटकातील छोटीशी भूमिका वा त्यानंतर होणारे कौतुक यातून मॉडेलिंगचा किडा डोक्यात शिरतो. अनेकांच्या डोक्यात तो सुप्तपणे वास करत राहतो. पण काहींचे डोके मात्र तो पोखरत सुटतो. गेल्या शतकात या नंतरच्या अन्य पर्यायांचे रस्ते फारसे उपलब्ध नव्हते ते आता झाले आहेत. हा मोठाच फरक. युट्युब वरच्या शॉर्ट फिल्म्स, विनोदी प्रहसने, स्टँड अप कॉमेडी, ओटीटी प्लॅटफॉर्म वरील छोट्या मोठ्या चॅनल वरील कामातून ज्याला सर्वांयव्हल किंवा तगून राहणे म्हणता येईल अशा शक्यता निर्माण झाल्या आहेत. मात्र काही जण खाईन तर तुपाशी नाहीतर राहीन उपाशी अशा पद्धतीत अडून बसतात,आणि उपाशीच राहातात.

एकूणच समाजातील मोठा वर्ग म्हणजे मध्यमवर्ग, तसेच कामगार वर्ग आणि सधन सुशिक्षित सुसंस्कृत मंडळी यापासून चार हात दूर राहणेच चांगले समजतात. ही वाटच निसरडी आहे.