देशातल्या अनेक भागांमध्ये मुलींची सख्या कमी झालेली असल्याने उपवर तरुणांना लग्नासाठी मुली मिळेनात. अशातच राजस्थानमधील एकाच तरुणीने तब्बल ३२ तरुणांशी लग्नं केल्याचा प्रकर उघडकीस आला आहे. राजस्थान हे राज्य देशात मुलींचा जन्मदर सर्वात कमी असलेल्या राज्यांपैकी एक आहे. त्यामुळे या राज्यात फसवी लग्नं करून आर्थिक फसवणूक करणाऱ्या, लग्नाच्या नावाखाली लुटमार करणाऱ्या अनेक टोळ्या सक्रीय आहेत. राज्यातील बान्सवाडा-डूंगरपूरमध्ये मुलींचा जन्मदर सर्वात कमी असल्याने याच भागात अशी प्रकरणं मोठ्या प्रमाणात आढळत आहेत. बान्सवाडा-डूंगरपूरसह राज्यभर पैसे घेऊन लग्न लावून देणाऱ्या दलालांचा सुळसुळाट वाढला आहे. या दलालांनी टाकलेल्या जाळ्यात अडकून अनेक तरुणांची आणि त्यांच्या कुटुंबांची आर्थिक फसवणूक होत आहेत.

या प्रकरणांमध्ये दलालांमार्फत लग्नं जमवली जातात. लग्न जमवताना दलाल त्या तरुणांकडून मोठी रक्कम उकळतात. त्यानंतर सर्व मित्र-परिवार, नातेवाईकांसमक्ष लग्न होतात आणि लग्नाच्या रात्रीच नवरी तिला लग्नात मिळालेले दागिने, नवरदेवाच्या घरातील पैसे, इतर सदस्यांचे दागिने घेऊन फरार होते. अशा अनेक प्रकरणांची राजस्थान पोलिसांत नोंद करण्यात आली आहे. यावरून स्पष्ट होतंय की राजस्थानमध्ये लुटारू वधूंचा सुळसुळाट वाढला आहे. अनेक तरुण अशा प्रकारची फसवणूक झाल्यावर बदनामीच्या भीतीने पोलिसांत तक्रारच करत नाहीत. तर काहीजण तक्रार करण्याची हिंमत करतात. अशा प्रकारच्या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर लुटमार करणाऱ्या काही वधूंना आणि त्यांच्याबरोबरच्या दलालांना अटकही झाली आहे. मात्र लुटमार करणाऱ्या कित्येक वधू राजस्थानमध्ये अजूनही मोकाट फिरत आहेत.

दरम्यान, अशाच प्रकारची एक तक्रार प्राप्त झाल्यानंतर राजस्थान पोलिसांनी एका तरुणीला अटक केली आहे. या तरुणीने एक-दोन नव्हे तर तब्बल ३२ लग्नं केली आहेत. ही तरुणी लग्न करायची, मधुचंद्राच्या रात्री घरातील सर्व दागिने आणि पैसे घेऊन फरार व्हायची. ही तरुणी एकाच वेळी अनेक नावं आणि ओळखी वापरून अनेक तरुण आणि त्यांच्या कुटुंबांच्या संपर्कात राहायची. अल्पावधित नवरदेवाचा आणि त्याच्या कुटुंबियांचा विश्वास संपादन करून घरातील पैसे, दागिने घेऊन पळून जायची. अनिता असं या लुटमार करणाऱ्या तरुणीचं नाव आहे. तिने ३२ लग्नं केली असली तरी एकाही नवऱ्याबरोबर मधुचंद्र साजरा केला नाही, मधुचंद्राच्या आधीच ती घरातून पळून जायची, असं तिने पोलीस जबाबात सांगितलं. लग्नानंतर ती माहेरच्या काही परंपरांचं कारण सांगून पसार व्हायची.

हे ही वाचा >> पत्नीला दोन पुरुषांसह हॉटेल रुमच्या बाथरुममध्ये पकडलं; पतीनं तिघांनाही झोडलं, Video व्हायरल

अनिता आणि तिच्या टोळीने या सर्व प्रकरणांमध्ये वापरलेली मोडस ऑपरेंडी सारखीच असल्यामुळे बान्सवाडा पोलीस अशा प्रकारे दलालांमार्फत होणाऱ्या लग्नांवर लक्ष ठेवून होते. अशाच एका संशयित नववधूवर पोलीस लक्ष ठेवून होते. मधुचंद्राच्या रात्री घरातील पैसे घेऊन पळून जाताना पोलिसांनी तिला पकडलं.