Bhang on Holi होळीच्या दिवशी भांग पिण्याची विशेष परंपरा आहे. होळी आणि भांग यांचं फार जुनं नातं आहे. होळीसह महाशिवरात्रीलादेखील भांगेचे सेवन केले जाते. भांगेचे सेवन हजारो वर्षांपासून होत असल्याचे आढळून येते. वेदांसारख्या प्राचीन ग्रंथांमध्येदेखील याचा उल्लेख आढळतो. आयुर्वेदात भांग केवळ शारीरिक व्याधीच नाही तर चिंताही दूर करते, असे मानले जाते. भारतात याचा मोठ्या प्रमाणात होत असलेला वापर बघून ब्रिटीशही आश्चर्यचकित झाले होते. बीबीसीच्या वृत्तानुसार, १९व्या शतकाच्या उत्तरार्धात ब्रिटिशांनी भांगेच्या परिणामांचा आणि त्याच्या सांस्कृतिक महत्त्वाचा अभ्यास केला होता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भूगोलशास्त्रज्ञ बार्नी वॉर्फ यांनी त्यांच्या ‘हाय पॉइंट्स: ॲन हिस्टोरिकल जिओग्राफी ऑफ कॅनॅबिस’ या शोधनिबंधात लिहिले आहे की, प्रदीर्घ काळापासून कॅनॅबिस वनस्पतींच्या काही भागांपासून तयार केलेल्या मादक पदार्थांचे सेवन केले जात आहे. भगवान शंकराच्या सन्मानार्थ हे सेवन केले जात आहे.

पौराणिक कथा

हिंदू पौराणिक कथेनुसार, समुद्रमंथनाच्यावेळी भांग अस्तित्वात आली. मंथनाच्या प्रक्रियेदरम्यान अमृताचा (पवित्र अमृत) एक थेंब आकाशातून पडला. ज्या ठिकाणी तो थेंब पडला, त्या ठिकाणी पहिल्यांदा भांगेचे रोप उगवले. असे मानले जाते की, समुद्रमंथनाच्या वेळी भगवान शंकराने विष प्राशन केले, तेव्हा त्यांच्या शरीरात तीव्र जळजळ निर्माण झाली. भगवान शंकराने शरीर थंड करण्यासाठी या वनस्पतीचे सेवन केले, तेव्हापासून शंकराला भांग अर्पण केली जाते.

होळी आणि महाशिवरात्रीच्या उत्सवात भांगेच्या सेवनाला विशेष महत्त्व आहे. (छायाचित्र-इंडियन एक्सपप्रेस)

आज होळी आणि महाशिवरात्रीच्या उत्सवात भांगेच्या सेवनाला विशेष महत्त्व आहे. अनेक भागांत थंडाईसह भांगेचे सेवन केले जाते. हे थंड पेय दूध, साखर, बदाम, बडीशेप, टरबूज, गुलाबाच्या पाकळ्या, मिरपूड, खसखस, वेलची आणि केशर या पदार्थांनी तयार होते.

भांग म्हणजे काय?

भारतात कॅनॅबिस नावाचं झुडूप उगवते, याचचं सायंटिफिक नाव आहे कॅनॅबिस इंडिका, ज्याला सर्वत्र गांजाचं झाडं म्हणतात. भांग आणि गांजा दोन्ही वेगवेगळे असले तरी ते एकाच वनस्पतीपासून तयार केले जाते. वनस्पतीची ही प्रजाती नर आणि मादीमध्ये विभागली गेली आहे. याच्या नर प्रजातीपासून भांग आणि मादी प्रजातीपासून गांजा तयार होतो. या वनस्पतीच्या बिया आणि पानांपासून भांग तयार केली जाते. ही हिरव्या रंगाची एक पेस्ट असते, ज्याच्या छोट्या गोळ्या तयार केल्या जातात. या गोळ्यांना भांग गोळी असेही म्हणतात. थंडाई व्यतिरिक्त, लस्सीबरोबरही याचे सेवन केले जाते. आजकाल भांग, पकोड्यांमध्ये, तसेच चटण्या आणि लोणच्यामध्येदेखील मिसळली जाते.

होळीलाच भांगेचे सेवन का केले जाते?

होळीमध्ये भांग पिण्याची परंपरा हिंदू पौराणिक कथेशी संबंधित आहे. अशी मान्यता आहे की, भगवान शंकराच्या पत्नी सती यांनी आत्मदहन केल्यावर, दुःखावर मात करण्यासाठी शंकरजी गहन ध्यान अवस्थेत गेले. पार्वती यांना भगवान शंकराशी लग्न करायचे होते. त्यांनी सांसारिक जीवनात परत यावे आणि दांपत्य जीवनाचे सुख भोगावे, अशी पार्वतींची इच्छा होती. यासाठी त्यांनी कामदेवाची मदत घेतली. कामदेवाने त्यांच्यावर भांग लावलेला बाण मारला आणि त्यांचे ध्यान भंग केले. या कृत्याने भगवान शंकराचा राग अनावर झाला आणि त्यांनी कामदेवाला भस्मसात केले. परंतु, नंतर त्यांनी पार्वतीशी लग्नही केले. वैराग्य जीवनातून भगवान शंकर वास्तविक जगात परत आल्याचा आनंद साजरा करण्यासाठी या दिवशी भांगेचे सेवन केले जाते.

भारतात भांग कायदेशीर आहे का?

गुंगीकारक औषधी द्रव्ये आणि मनोव्यापारांवर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम, १९८५ हा कायदा भारतातील अमली पदार्थ आणि त्यांच्या तस्करीशी संबंधित आहे. गांजाचे वर्णन अंमली पदार्थ म्हणून करण्यात आले आहे. या कायद्यांतर्गत त्याची लागवड करणे, हे पदार्थ बाळगणे, सेवन करणे किंवा व्यापार करणे गुन्हा आहे. परंतु, गांजाच्या रोपांतील काही भागांवरच बंदी आहे. भांग तयार करण्यासाठी वापरली जाणारी पाने आणि बिया या कायद्याच्या बंदीतून वगळण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे, गांजाची लागवड देशभरात दंडनीय असली तरी, स्वतःहून उगवलेल्या रोपातील पानांचा वापर कायदेशीर आहे.

हेही वाचा: कोण घेतंय ‘ही’ केमोथेरपी? ठरणार का ती कर्करुग्णांसाठी वरदान? तज्ज्ञ काय सांगतात?

गेल्या काही वर्षांत अनेक राज्यांनीही भांगाच्या विक्री आणि सेवनाबाबत स्वतःचे कायदे तयार केले आहेत. उत्तर प्रदेशमध्ये दारूविक्रीसाठी जसा परवाना आवश्यक असतो, तसा भांग विक्रीसाठीही परवाना असणे आवश्यक आहे. अनेक राज्यांनी भांगेच्या सेवनावर आणि विक्रीवर बंदी घातली आहे, मात्र होळीच्या निमित्ताने विक्रेते आणि ग्राहकांवर क्वचितच कारवाई केली जाते, असे वॉल स्ट्रीट जर्नलच्या अहवालात सांगण्यात आले आहे.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Breif history of holi and bhang connection rac
Show comments