इजिप्त म्हटले की, डोळ्यांसमोर उभे राहतात ते भव्य असे पिरॅमिड्स! ही इजिप्तची ओळख आहे. असे पिरॅमिड्स फक्त इजिप्त देशात नसून इतरही अनेक ठिकाणी आहेत. मात्र, इजिप्तमधील पिरॅमिड्सची भव्यता इतकी आहे की, त्यांच्या निर्मितीबद्दल कुतूहल आणि भरपूर प्रश्न आपोआप निर्माण होतात. आज इतके तंत्रज्ञान उपलब्ध असतानाही दोन टन वजनापेक्षा अधिक वजनाची एखादी वस्तू एका जागेवरून दुसऱ्या जागेवर हलवणे ही बाब अवघड वाटते. मात्र, तब्बल साडेचार हजार वर्षांपूर्वी आधुनिक यंत्रसामग्री उपलब्ध नसताना ही मेहनत कशी करण्यात आली असेल, हाच प्रश्न इजिप्तच्या भव्य-दिव्य पिरॅमिड्सकडे पाहून आपल्या मनात निर्माण होतो. संशोधकांचा असा अंदाज आहे की, गिझाच्या पिरॅमिड्समध्ये चौकोनी आकाराचे २.३ दशलक्ष मोठे दगड आहेत. त्यातील प्रत्येक दगडाचे वजन सरासरी २.३ मेट्रिक टन आहे.

आधुनिक यंत्रसामग्री उपलब्ध नसताना इतक्या मोठ्या प्रमाणावर भव्य दगडांना आणून, त्यापासून पिरॅमिडसारखी भव्य रचना उभी करणे अशक्यप्राय वाटते. म्हणूनच काहींना असे वाटते की, अशी भव्य-दिव्य वास्तू निर्माण करणे मानवी कर्तृत्वाच्या पलीकडची गोष्ट आहे आणि त्यामागे कदाचित परग्रहावर राहणाऱ्या एलियन्सचा हात असावा. मात्र, इजिप्तमधील पिरॅमिड्सबद्दल करण्यात आलेल्या अभ्यासातून एक नवी माहिती समोर आली आहे. नाईल नदीमुळेच इजिप्तमधील या भव्य-दिव्य पिरॅमिड्सची रचना करणे शक्य झाल्याचा दावा संशोधकांनी केला आहे.

हेही वाचा : न्यायाधीशांसमोर आरोपीला खरंच कायदेशीर वागणूक मिळते का? अभ्यास काय सांगतो?

नदीचा कल्पक वापर

इजिप्तमधील बहुतांश पिरॅमिड्स गिझा व लिश्ट या गावांदरम्यान ५० किमी अंतरात पसरलेल्या वाळवंटात आढळतात. सध्या नाईल नदीपासून ही जागा कित्येक किलोमीटर दूर आहे. मात्र, अनेक इजिप्तोलॉजिस्ट (इजिप्तच्या संस्कृतीचा अभ्यास करणारे संशोधक) असा कयास बांधतात की, नाईल नदी कधी काळी या पिरॅमिड्स असलेल्या परिसराच्या जवळून वाहत असावी. याच तर्काला आधार देणारे काही समकालीन दस्तऐवजही उपलब्ध आहेत.

१६ मे रोजी ‘कम्युनिकेशन्स अर्थ ॲण्ड एन्व्हायर्न्मेंट जर्नल’मध्ये या संदर्भातील अभ्यास प्रकाशित करण्यात आला आहे. साडेचार हजार वर्षांपूर्वी नाईल नदी ही इजिप्तची जीवनदायिनी होती. या नदीला ‘फादर ऑफ इजिप्त’, असे म्हटले जात असे. याच नाईल नदीच्या एका शाखेचा प्रवाह पिरॅमिड्स असलेल्या भागाच्या जवळून वाहत होता. त्यामुळे या प्रवाहाचा वापर मोठ्या दगडांच्या वाहतुकीसाठी करण्यात आला, असे मत संशोधकांनी मांडले आहे. नाईल नदीच्या या उपनदीला संशोधकांनी ‘अहरामत’ असे नाव दिले आहे.

भूरूपशास्त्रज्ञ (Geomorphologist) इमान घोनेम यांच्या नेतृत्वाखालील टीमने या ‘अहरामत’ उपनदीच्या प्रवाहाचा नकाशा तयार केला आहे. त्यांनी हा नकाशा तयार करण्यासाठी रडार सॅटेलाईट इमेजरी (Radar Satellite Imagery), ऐतिहासिक नकाशे, भूभौतिकीय सर्वेक्षण (Geophysical Surveys) इत्यादी गोष्टींचा वापर केला. अहरामत ही नाईल नदीची उपनदी हजारो वर्षांपूर्वी धुळीचे वादळ आणि तीव्र दुष्काळामुळे लुप्त झाली असावी, असे संशोधकांचे म्हणणे आहे.

या अभ्यासाचे सहलेखक सुझान ऑन्स्टाइन यांनी बीबीसीशी बोलताना सांगितले, “लुप्त झालेल्या ‘अहरामत’ उपनदीचा प्रवाह कुठून कुठे वाहत होता, हे निश्चित करता आल्यामुळे पिरॅमिडच्या रचनेसाठी या जलमार्गाचा वापर झाला असल्याची बाब अधोरेखित करण्यात मदत झाली आहे. भव्य चौकोनी दगड, लागणारे साहित्य, कामगार आणि इतर सर्वच आवश्यक गोष्टींची वाहतूक करण्यासाठी या जलमार्गाचा वापर करण्यात आला असावा, असे म्हणायला पुरेसा वाव आहे.” ‘अहरामत’ उपनदीचा प्रवाह साधारणत: ६४ किमीपर्यंत वाहत असावा. हा प्रवाह २००-७०० मीटर रुंद आणि २-८ मीटर खोल असावा.

पिरॅमिड : जगातल्या सात आश्चर्यांमधील एक

सुझान ऑन्स्टाइन पुढे म्हणाले, “हे जड चौकोनी दगड वाहून नेण्यासाठी मानवी श्रमाचा वापर करण्याऐवजी नदीच्या प्रवाही उर्जेचा वापर करण्यामुळे मेहनत कमी लागते.” सहारा वाळवंटातील गिझा व लिश्ट या गावांदरम्यान पिरॅमिडची संख्या इतकी का आहे, याचेही उत्तर त्यामुळे प्राप्त होते. मात्र, तरीही पिरॅमिडच्या भव्य-दिव्य रचनेबाबतचे कुतूहल अजिबात कमी होत नाही. कारण- शेवटी पिरॅमिडची रचना करण्याच्या ठिकाणी हे भव्य दगड वाहून आणणे हा एकूण प्रक्रियेमधील एक भाग होता. त्यानंतर हजारो कामगारांना हे चौकोनी दगड उचलून अचूक ठिकाणी ठेवण्याचे महाजिकिरीचे काम होते. दगड बांधकामाच्या जागेवर आणल्यानंतर हळूहळू वर चढवण्याचे काम उतरंडीचा उपयोग करून केले गेले असावे.

हेही वाचा : “मुस्लीम, हुकूमशहा शब्द वापरु नका!” प्रसार भारतीने कोणत्या नियमांअंतर्गत विरोधकांवर कारवाई केली?

त्याशिवाय पिरॅमिड्सची संकल्पना प्रत्यक्षात उतरवण्याआधी ती कागदावर उतरवली गेली असावी. त्यासाठीही गणित आणि प्रगत स्थापत्यशास्त्राची समज आवश्यक होती. ही समज त्या काळी इजिप्शियन लोकांकडे होती, असे दिसून येते. उदाहरणार्थ- गिझाच्या पिरॅमिडच्या प्रत्येक बाजूला ५२ अंशाचा एक अचूक कोन आहे. पिरॅमिडची रचना करणारे लोक या शास्त्रामध्ये किती पारंगत होते, हे समजण्यासाठी हा एक दाखला पुरेसा आहे. पिरॅमिडची रचना करण्याच्या कामात गुंतलेले कामगार पिरॅमिडच्या शेजारीच मोठ्या आणि अत्यंत संघटित अशा वस्त्यांमध्ये राहत होते. एका मोठी यंत्रणा यामागे कार्यरत होती. तिथे आढळून आलेले बेकरीचे अवशेष आणि प्राण्यांच्या हाडांचे ढिगारे दाखवून देतात की, कामगारांना त्यांच्या श्रमासाठी चांगले पोषण दिले जात होते.