ब्रेड आणि ब्रेडचे प्रकार जेवढे विदेशात लोकप्रिय आहेत तेवढेच भारतातही. एकेकाळी सामान्य लोकांना दुर्मीळ असणारा ब्रेड सर्रास सगळीकडे मिळायला लागूनही मोठा कालावधी उलटलाय. ब्रेडच्या लोकप्रियतेनेच ब्रेडवरही अनेक प्रयोग होऊ लागले आहेत. मात्र, तरीही व्हाइट ब्रेडने जेवढी लोकप्रियता मिळवली तेवढी इतर ब्रेडना ती फारशी मिळालेली नाही. मात्र, त्यात फारशी पोषणमूल्ये नसल्याने शास्त्रज्ञ, आहारतज्ज्ञांनी व्हाइट ब्रेडच कसा आरोग्यदायी बनवता येईल यावर प्रयोग करायला सुरुवात केली आहे. या मागे नक्की काय घडले…

व्हाइट ब्रेडवर प्रयोग कशासाठी?

काही देशांमध्ये ब्रेडचा वापर आहारात मोठ्या प्रमाणात केला जातो. इतर पौष्टिक ब्रेडच्या तुलनेत व्हाइट ब्रेड स्वस्त असल्याने त्याचाच वापर जास्त केला जातो. मात्र, त्यातील पोषणतत्त्वांच्या अभावामुळे सर्वसामान्यांना परिपूर्ण आहार मिळत नाही. ब्रेड उत्पादकांनी या आधी ब्रेडच्या पिठात गव्हाचा कोंडा घालून त्यांच्या व्हाइट ब्रेडला अधिक आरोग्यदायी बनवण्याचा प्रयत्न केला आहे, परंतु तो ब्रेड महाग असून ग्राहकांना त्या ब्रेडची चव आणि गंध, पोत आवडला नाही. त्यामुळे ब्रिटनमधील प्रसिद्ध ‘शिप्टन मिल’ने ‘एबरिस्टविथ युनिव्हर्सिटी’शी एका संशोधन प्रकल्पावर भागीदारी केली आहे. या प्रकल्पामध्ये संपूर्ण ब्रिटनमध्ये आरोग्यदायी, अधिक पौष्टिक व्हाइट ब्रेडची निर्मिती करण्याचा प्रयत्न केला जात आहे. ब्रिटनमध्ये त्यासाठी खास निधीही देण्यात आला आहे.

हेही वाचा >>> विश्लेषण : तापमानवाढीमुळे भाज्याफळांच्या महागाईचे संकट अटळ?

पोषणमूल्य वाढवण्यासाठी कशाचा वापर?

व्हाइट ब्रेडची चव आणि त्याचा गंध, मऊपणा टिकवून ठेवतच त्याची पौष्टिक मूल्ये पूर्णत: नव्या पौष्टिक ब्रेडच्या पातळीपर्यंत वाढवणे ही एक नाजूक संतुलित कृती आहे. त्यामध्ये गव्हांकूर आणि गव्हाच्या कोंड्याचा काही भाग तसेच जीवनसत्त्वे, खनिजे आणि तंतूमय घटकांनी समृद्ध असलेली इतर धान्ये उदा. क्विनोआ, ज्वारी, बाजरी यांचा समावेश करण्यात आला. तसेच हिरवे वाटाणे आणि चणे अतिरिक्त प्रथिने देण्यासाठी त्यात टाकण्यात आले.

व्हाइट ब्रेडची चव टिकवून ठेवण्यासाठी…

शास्त्रज्ञांनी व्हाइट ब्रेडच्या पिठाच्या रासायनिक रचनेचे तपशीलवार विश्लेषण करण्यास सुरुवात केली आहे. वेल्श विद्यापीठातील संशोधकांचा गट व्हाइट ब्रेडच्या पिठाचे पौष्टिक मूल्य वाढवण्यासाठी दळणे, पीठ एकत्र करण्याच्या प्रक्रियेचा अभ्यास करणार आहेत. उत्तम आरोग्यासाठी महत्त्वाचे असलेले लोह, जस्त आणि जीवनसत्त्वे आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे फायबरचे प्रमाण व्हाइट ब्रेडमध्ये फारच कमी असते. ब्रेडच्या पिठात ते इतर तृणधान्ये वापरून वाढवता येऊ शकते. त्यासाठीचेही संशोधन सुरू आहे.

हेही वाचा >>> प्रज्वल रेवण्णांना ब्लू कॉर्नर नोटीस; रेड, पर्पल, यलो अशा सात प्रकारच्या नोटिसांचे अर्थ काय आहेत?

संशोधकांचे म्हणणे काय?

व्हाइट ब्रेडवर संशोधन आणि प्रयोग करूनही ग्राहकांनी त्याला सकारात्मक पाठिंबा देण्याची गरज असल्याचे संशोधकांचे म्हणणे आहे. ब्रिटिश डायबेटिक असोसिएशनच्या मते, जे लोक नियमितपणे परिपूर्ण आहार घेतात त्यांच्यामध्ये हृदयरोग, अर्धांगवायू आणि टाइप २ मधुमेहाचा धोका ३० टक्क्यांपर्यंत कमी असतो. तसंच आतड्यांसंबंधी कर्करोगाचा धोकादेखील कमी होतो. मात्र, सर्वेक्षणांमुळे समोर आलेले सत्य म्हणजे ९५ टक्के प्रौढ परिपूर्ण आहार घेत नाहीत. पोषणतज्ज्ञांचे म्हणणे आहे की, तुम्ही परिपूर्ण आहार घ्या हे सांगून त्यांच्या आहारात बदल करणे अवघड आहे. त्यामुळे त्यांच्या आहे त्या आहारालाच परिपूर्ण बनवणे केव्हाही उचित ठरेल.