पादत्राणे खरेदी करण्यासाठी सर्वांना पायाचा आकार माहिती असणे आवश्यक असते. सामान्यतः भारतात पादत्राणे खरेदी करताना यूएस किंवा युके आकारांचा पर्याय असतो. मात्र, आता भारतात नवीन ‘शू सायझिंग सिस्टिम’ तयार केली जात आहे. नवीन ‘शू सायझिंग सिस्टिम’ विकसित करण्याच्या मोठ्या प्रकल्पाचा एक भाग म्हणून नुकतेच भारतीयांच्या पायाच्या आकाराचे संपूर्ण भारतभर सर्वेक्षण करण्यात आले आहे. या नवीन प्रणालीला ‘भा’ म्हणजे भारत असे नाव देण्यात आले आहे. त्यामुळे आता पादत्राणांवर यूएस किंवा युके ऐवजी भा असे लिहिलेले असणार आहे. ही प्रणाली भारतातील पादत्राणे उत्पादनासाठी फायद्याची ठरेल, असे सांगण्यात येत आहे. ‘भा’ म्हणजे काय? आणि या नवीन प्रणालीची गरज का आहे? याबद्दल जाणून घेऊ या.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सर्वेक्षणात काय?

सुरुवातीला असा अंदाज होता की, भारतीयांना किमान पाच ‘शू सायझिंग सिस्टिम’ची आवश्यकता असेल. सर्वेक्षणापूर्वी असे मानले गेले होते की, ईशान्य भारतातील लोकांचे पाय उर्वरित भारतीयांच्या तुलनेत लहान आहेत. डिसेंबर २०२१ ते मार्च २०२२ दरम्यान पाच भौगोलिक क्षेत्रातील ७९ ठिकाणांवरील १ लाखांहून अधिक लोकांचे सर्वेक्षण करण्यात आले. सरासरी भारतीय पायाचा आकार, आकारमान आणि रचना समजून घेण्यासाठी थ्रिडी फूट स्कॅनिंग मशीनचा वापर करण्यात आला. त्यात असे आढळून आले की, सरासरी भारतीय स्त्रीच्या पायाच्या आकारात वयाच्या ११ व्या वर्षी, तर भारतीय पुरुषाच्या पायाच्या आकारात वयाच्या १५ किंवा १६ व्या वर्षात वेगाने बदल होतात.

थ्रिडी फूट स्कॅनिंग मशीन (छायाचित्र-इंडियन एक्सप्रेस)

एकंदरीत, भारतीयांचे पाय युरोपियन किंवा अमेरिकन लोकांपेक्षा जास्त रुंद असल्याचे या सर्वेक्षणात आढळले. यूके/युरोपियन/यूएस सायझिंग सिस्टिम अंतर्गत उपलब्ध असलेल्या काही अरुंद पादत्राणांमुळे, भारतीय पादत्राणे घालत आहेत. परंतु, त्याचा आकार आवश्यकतेपेक्षा मोठा आहे. अनेक भारतीय त्यांचा योग्य आकार मिळत नसल्याने अतिरिक्त-लांब, अयोग्य आणि घट्ट पादत्राणे घालत असल्याचे आढळले आहे. स्त्रिया मोठ्या आकाराच्या उंच टाचांची पादत्राणे परिधान करत असतील, तर हे त्यांच्यासाठी गैरसोयीचे आणि दुखापतींचे कारणही ठरू शकते.

योग्य आकार न मिळाल्याने पुरुष सैल शूज परिधान करतात. चालताना शूज सैल होऊ नये म्हणून शूलेस आवश्यकतेपेक्षा जास्त घट्ट बांधतात. त्यामुळे रक्ताच्या सामान्य प्रवाहावर याचा परिणाम होऊ शकतो. पायाच्या वैशिष्ट्यांनुसार तयार न केलेली पादत्राणे परिधान केल्यामुळे, भारतीयांना दुखापत, बूट चावणे आणि पायाच्या आरोग्याच्या समस्या निर्माण होऊ शकतात. विशेषत: वृद्ध महिला आणि मधुमेहाच्या रुग्णांमध्ये. सर्वेक्षणातून मिळालेल्या माहितीच्या आधारावर असा निष्कर्ष काढण्यात आला आहे की, एकच ‘शू सायझिंग सिस्टिम’ तयार केली जाऊ शकते.

भारतीय ‘शू सायझिंग सिस्टिम’ची गरज का भासली?

ब्रिटिशांनी भारताच्या स्वातंत्र्यापूर्वी यूकेचे आकार भारतात आणले. त्यानुसार, सरासरी भारतीय महिला ४ ते ६ नंबर आणि सरासरी पुरुष ५ ते ११ नंबरच्यादरम्यान पादत्राणे घालतात. भारतीयांच्या पायाची रचना, आकार, परिमाण याविषयी कोणतीही माहिती नसल्यामुळे, भारतीय ‘शू सायझिंग सिस्टम’ विकसित करणे कठीण होते; त्यामुळे पूर्वी हा प्रकल्प कधीही हाती घेतला गेला नाही.

भारत हा जगातील सर्वाधिक लोकसंख्येचा देश आहे आणि जगातील सर्वात मोठ्या बाजारपेठांपैकी एक असलेला देश. भारतात पादत्राणांचे मोठ्या प्रमाणात उत्पादन होते. ऑनलाइन ऑर्डर केलेल्या पादत्राणांपैकी अंदाजे ५० टक्के पादत्राणे ग्राहकांद्वारे नाकारली गेली आहेत, असे काही व्यावसायिकांनी सांगितले. ‘भा’मुळे वापरकर्त्यांसह फूटवेअर उत्पादकांनाही फायदा होऊ शकतो.

‘भा’ ने सुचवलेले आठ फूटवेअर आकार

I – लहान मुले (० ते एक वर्षे)
II – लहान मुले (एन ते तीन वर्षे)
III – लहान मुले (चार ते सहा वर्षे)
IV – मुले (सात ते ११ वर्षे)
V – मुली (१२ ते १३ वर्षे)
VI – मुले (१२ ते १४ वर्षे)
VII – महिला (१४ वर्षे आणि त्यावरील)
VIII – पुरुष (१५ वर्षे आणि त्याहून अधिक).

व्यावसायिक हेतूंसाठी, सुरुवातीला III – VIII आकाराच्या फूटवेअर्सचे उत्पादन केले जाईल. ‘भा’ नुसार उत्पादित पादत्राणे देशातील जवळपास ८५ टक्के लोकसंख्येला योग्य फिटिंग आणि उत्तम आराम देऊ शकतील. ‘भा’ सिस्टीमचा अवलंब करण्याचा सर्वात मोठा फायदा असा होईल की, पादत्राणे उत्पादकांना सध्याच्या १० आकारांच्या (इंग्रजी सिस्टिम) आणि सात आकारांच्या (युरोपियन सिस्टिम) ऐवजी केवळ आठ आकारांची पादत्राणे तयार करावी लागतील. बुटाच्या शेवटच्या आकाराची अतिरिक्त लांबी ५ मिमी फूट असेल.

हेही वाचा : गर्भधारणेनंतर ३० आठवड्यांपर्यंत गर्भपातास परवानगी, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; भारतीय गर्भपात कायदा काय आहे?

‘भा’ सिस्टिमची सद्यस्थिती काय आहे?

चेन्नईस्थित वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद-सेंट्रल लेदर रिसर्च इन्स्टिट्यूट (CSIR-CLRI) ने हे सर्वेक्षण केले. त्यांनी आपल्या शिफारसी केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या उद्योग आणि अंतर्गत व्यापार विभागाला (DPIIT) सादर केल्या. DPIIT ने त्यांना मंजुरीसाठी ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स (BIS) कडे पाठवले आहे. ‘भा’ विद्यमान सायझिंग सिस्टिममध्ये पूर्णपणे फेरबदल करणार असल्याने, विभागांनी सुचवले आहे की, ‘भा’ आकाराच्या मानकांनुसार उत्पादित पादत्राणे सुरुवातीला वापरकर्त्यांना चाचणीसाठी देण्यात यावीत. ‘भा’ सिस्टिम २०२५ मध्ये लागू होण्याची अपेक्षा आहे.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Indian shoe sizing system bha rac