चैतन्य, आनंद आणि उत्साह घेऊन येणारा गणेशोत्सव. या उत्सवाशी निगडीत प्रत्येकाच्याच विविध आठवणी असतात. लहानपणीचा बाप्पा, त्यावेळी साजरा होणारा गणेशोत्सव आणि त्यानंतर महिलांसाठी लग्नानंतर साजरा होणारा गणेशोत्सव अशी विविध रुपं असणारा हा सण. आणि त्याच्याशी निगडीत बहुविध आठवणी. यात सासुरवाशिणींसाठी काही आठवणी असतात त्या माहेरच्या गणपतीच्या. याबद्दल बोलताना अभिनेत्री अनुराधा राजाध्यक्ष माहेरच्या गणपतीच्या आठवणींमध्ये रमल्या.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘मी मूळची नाशिकची आणि मुंबईत माझ्या सगळ्या काकांकडे गणपतीची प्रतिष्ठापना व्हायची. पण, दरवर्षी नाशिकहून मुंबईला यायला जमत नसल्यामुळे आपल्या घरीसुद्धा गणपती आणूया असा माझा आणि माझ्या बहिणीचा आग्रह होता. सरतेशेवटी आमच्या आग्रहाखातरच नाशिकला घरी गणपती येऊ लागला. तेथे आमचा वाडा होता, त्यामुळे तिथे साजरा केल्या जाणाऱ्या गणेशोत्सवाची धूमही काही औरच होती. गणेशोत्सवादरम्यान संध्याकाळी वाड्यातील सर्वजण आरतीला जमायचे. त्यावेळी मोठी आरास किंवा मखर असा काही प्रकार नव्हता. भरमसाठ आरत्याही नव्हत्या. आम्ही पाच आरत्या अत्यंत मनोभावे म्हणायचो. उत्साहाचं हे पर्व सुरुवातीला पाच दिवसांचं होतं. पण, मग हे पाच दिवसही आम्हाला पुरेनासे झाले आणि अनंत चतुर्दशीपर्यंत गणपती आमच्या घरी विराजमान झाले,’ असं त्या म्हणाल्या.

Ganesh Utsav Recipes 2017 : खजूर रोल

गणपती विसर्जनाबद्दलची आठवण सांगताना त्या म्हणाल्या, ‘अनंत चतुर्दशीला विहिरीत गणपतीच्या मूर्तीचं विसर्जन करायचो. घरगुती गणपतींच्या विसर्जनाला आतासारखे ढोलताशे वगैरे वाजतगाजत नसायचे. आई तेव्हा आंब्याची डाळ करायची. खरं तर ही डाळ चैत्र गौरीमध्ये करतात. पण मग प्रसादाला काहीतरी वेगळं द्यावं म्हणून तेव्हा आंब्याच्या डाळीचा बेत असायचा.’

वाचा : माहेरचा गणपती : ‘बाप्पा’सोबत माझी ओळख व्हायची आहे- सोनाली कुलकर्णी

माहेरच्या गणपतीची आठवण काढतानाच त्यांना आता साजरा केला जाणाऱ्या गणेशोत्सवामध्ये प्रकर्षाने फरक जाणवतो. धूमधडाका, अवास्तव स्तोम, श्रद्धेचा बाजार याबद्दल अनुराधा स्पष्ट मत मांडतात. ‘त्यावेळी उत्सवाचा अवडंबर केला जात नव्हता. अवास्तव धूमधडाका नव्हता. आता मात्र या उत्सवाचं कमर्शियलायझेशन (व्यावसायिकरण) झालंय असं खूप वाटतं. गणपती हा विद्येचा आणि कामाचा देव आहे. त्यामुळे आमची सर्व व्यवधानं सांभाळून आम्ही गणेशोत्सव साजरा करायचो. माझे आई- बाबा नेहमी सांगायचे की, हा आपल्या श्रद्धेचा आणि भावनिक गरजेचा भाग आहे. त्याचे अतिक्रमण कामावर होऊ देऊ नका. शिवाय या श्रद्धेचा कोणालाही त्रास होता कामा नये.’

‘गणेशोत्सवाच्या सध्याच्या बदललेल्या स्वरुपाचा मला खूप त्रास होतो. माझ्या घरी मी इको फ्रेंडली मूर्ती आणि मखर, त्यानंतर कृत्रिम तलावातच विसर्जन या गोष्टींचा मी आग्रह धरते. ही पद्धत मला आवडते,’ असंही त्या म्हणतात.

शब्दांकन- स्वाती वेमूल

swati.vemul@indianexpress.com

मराठीतील सर्व गणेशोत्सव २०१७ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ganapati utsav 2017 ganeshotsav 2017 happy ganesh chaturthi 2017 bollywood and marathi celebrities ganesh celebration and decoration marathi actress anuradha rajadhyaksha on celebrating this festival
Show comments