टोरंटो : भारताचा युवा ग्रँडमास्टर डी. गुकेशने अझरबैजानच्या निजात अबासोववर विजय साकारताना ‘कॅन्डिडेट्स’ बुद्धिबळ स्पर्धेच्या १२व्या फेरीअंती गुणतालिकेत पुन्हा संयुक्त आघाडी मिळवली. ११व्या फेरीनंतर एकटयाने आघाडीवर असणाऱ्या रशियाच्या इयान नेपोम्नियाशीला भारताच्या आर. प्रज्ञानंदने १२व्या फेरीत बरोबरीत रोखले. नाशिककर विदित गुजराथीला अमेरिकेच्या फॅबियानो कारुआनाकडून पराभव पत्करावा लागला. या निकालांनंतर प्रज्ञानंद आणि विदित हे जेतेपदाच्या शर्यतीतून जवळपास बाहेर झाले आहेत.

या स्पर्धेच्या आता केवळ दोन फेऱ्या शिल्लक असून खुल्या विभागात जेतेपदासाठी चुरस निर्माण झाली आहे. १२व्या फेरीत अमेरिकेच्या हिकारू नाकामुराने फ्रान्सच्या अलिरेझा फिरुझाला पराभूत केले. नाकामुराचा हा सलग तिसरा विजय ठरला. त्यामुळे आता अग्रस्थानासाठी गुकेश, नेपोम्नियाशी आणि नाकामुरा यांची बरोबरी झाली आहे. या तिघांच्याही खात्यावर समान ७.५ गुण आहेत. कारुआना केवळ अर्ध्या गुणाने मागे आहे. त्यामुळे त्याच्याही जेतेपदाच्या आशा कायम आहेत. प्रज्ञानंद सहा गुणांसह पाचव्या, गुकेश पाच गुणांसह सहाव्या, फिरुझा ४.५ गुणांसह सातव्या, तर अबासोव तीन गुणांसह आठव्या स्थानावर आहे. १३व्या फेरीपूर्वी आता विश्रांतीचा दिवस आहे.

हेही वाचा >>> आशिया ऑलिम्पिक पात्रता स्पर्धेत दीपक, सुजितला प्रवेश नाकारला! दुबईतील पावसामुळे बिश्केकमध्ये पोहोचण्यास उशीर

महिला विभागात, भारताच्या आर. वैशालीने युक्रेनच्या अ‍ॅना मुझिचुकला पराभवाचा धक्का दिला. वैशालीचा हा सलग तिसरा विजय होता. १२व्या फेरीतील अन्य तीनही लढती बरोबरीत सुटल्या. चीनच्या टॅन झोंगीला गुणतालिकेत तळाला असलेल्या बल्गेरियाच्या नुरग्युल सलिमोवाला नमवण्यात अपयश आले. मात्र, तिने गुणतालिकेतील अग्रस्थान कायम राखले असून तिचे आठ गुण आहेत. दुसऱ्या स्थानावर असलेली ले टिंगजी झोंगीपेक्षा केवळ अर्ध्या गुणाने मागे आहे. तिला १२व्या फेरीत कॅटेरिना लायनोविरुद्ध बरोबरीवर समाधान मानावे लागले. अन्य एका लढतीत भारताच्या कोनेरू हम्पीने रशियाच्या अलेक्झांड्रा गोर्याचकिनाविरुद्ध बरोबरी नोंदवली.

खुल्या विभागात जेतेपदाची शर्यत आता अत्यंत चुरशीची झाली. १७ वर्षीय गुकेश ‘कॅन्डिडेट्स’मध्ये खेळणारा आजवरचा दुसरा सर्वात युवा बुद्धिबळपटू आहे. मात्र, इतक्या कमी वयातही त्याने या स्पर्धेत प्रगल्भतेने खेळ केला आहे. ११व्या फेरीनंतर गुकेशची दुसऱ्या स्थानी घसरण झाली होती. त्यामुळे १२व्या फेरीत विजय मिळवणे त्याच्यासाठी गरजेचे झाले होते. त्यातच त्याला या फेरीत अबासोवविरुद्ध काळया मोहऱ्यांनिशी खेळावे लागणार होते. मात्र, याचे दडपण घेण्याऐवजी त्याने हे आव्हान स्वीकारले आणि अबासोववर विजय मिळवत पुन्हा संयुक्त आघाडी प्राप्त केली.

अबासोवविरुद्ध गुकेशने निम्झो इंडियन बचावपद्धतीचा अवलंब केला. याचे अबासोवकडे उत्तर नव्हते. डावाच्या मध्यात अबासोवला डोके वर काढण्याची संधी होती. मात्र, गुकेशने अचूक चाली रचताना आपले वर्चस्व कायम राहील याची काळजी घेतली. फारशी प्यादी शिल्लक नसल्याने अबासोव दडपणाखाली आला. अखेर ५७व्या चालीअंती त्याने हार मान्य केली.

१२व्या फेरीचे निकाल

* खुला विभाग : निजात अबासोव (एकूण ३ गुण) पराभूत वि. डी. गुकेश (७.५), फॅबियानो कारुआना (७) विजयी वि. विदित गुजराथी (५), इयान नेपोम्नियाशी (७.५) बरोबरी वि. आर. प्रज्ञानंद (६), हिकारू नाकामुरा (७.५) विजयी वि. अलिरेझा फिरुझा (४.५).

* महिला विभाग : अलेक्झांड्रा गोर्याचकिना (एकूण ६ गुण) बरोबरी वि. कोनेरू हम्पी (६), अ‍ॅना मुझिचुक (४.५) पराभूत वि. आर. वैशाली (५.५), नुरग्युल सलिमोवा (४.५) बरोबरी वि. टॅन झोंगी (८), कॅटेरिना लायनो (६) बरोबरी वि. ले टिंगजी (७.५).

‘कॅन्डिडेट्स’ स्पर्धाच्या इतिहासात कधी नव्हे इतक्या चुरशीच्या लढती या वर्षी पाहायला मिळत आहेत. गेल्या दोन ‘कॅन्डिडेट्स’ स्पर्धा अगदी सहज जिंकणाऱ्या इयान नेपोम्नियाशीला यंदा अन्य खेळाडूंकडून आव्हान मिळते आहे. स्पर्धेतील सर्वात युवा खेळाडू गुकेश आणि सर्वात अनुभवी खेळाडू हिकारू नाकामुरा हे दोघेही १२व्या फेरीत विजयी झाले. आता केवळ दोन फेऱ्या शिल्लक असताना नेपोम्नियाशी, गुकेश आणि नाकामुरा हे तिघे संयुक्तरीत्या आघाडीवर आहे. विशेष म्हणजे नाकामुराला उरलेल्या दोन फेऱ्यांत नेपोम्नियाशी आणि गुकेश यांच्याशी खेळायचे आहे. अबासोव अखेरच्या क्रमांकावर असला, तरी तो आतापर्यंत पांढऱ्या मोहऱ्यांनी खेळताना हरलेला नव्हता. त्यामुळे  त्याला नमवताना गुकेशने जो खेळ केला, तो एखाद्या जगज्जेत्याच्या दर्जाचा होता. आता विश्रांतीच्या दिवसानंतर नेपोम्नियाशी-नाकामुरा आणि गुकेश-फिरुझा या १३व्या फेरीतील लढतींवर सगळयांचे लक्ष असेल. – रघुनंदन गोखले, बुद्धिबळ प्रशिक्षक.