वृत्तसंस्था, दोहा : ‘फिफा’ विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत आशियाई संघांकडून धक्कादायक निकालांची मालिका सलग दुसऱ्या दिवशी सुरू राहिली. इ-गटातील सलामीच्या लढतीत जपानने कमालीच्या संयमाने खेळ करत चार वेळच्या विश्वविजेत्या जर्मनीचा २-१ असा पराभव केला. सामन्याच्या पूर्वार्धात ३३व्या मिनिटाला इल्काय गुंडोगनने पेनल्टीवर संधी साधून जर्मनीला आघाडीवर नेले होते. जर्मनीने ही आघाडी बराच वेळ टिकवून ठेवली होती. मात्र, जपानने अधिक संयम दाखवत योग्य संधी मिळण्याची वाट पाहिली. वेगवान चाली हे जपानचे वैशिष्टय़ असले, तरी कतारमधील उष्णतेचा परिणाम लक्षात घेता जपानी खेळाडूंनी आपला वेग काहीस संथ ठेवला. सामन्याचा वेळ संपत आला तसा त्यांनी राखून ठेवलेल्या क्षमतेचा पूर्ण उपयोग करून जर्मनीच्या बचाव फळीला कोंडीत पकडले. कमालीच्या वेगवान चाली रचून जपाननी खेळाडूंनी अनेकदा जर्मनीच्या क्षेत्रात मुसंडी मारली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राखीव खेळाडू म्हणून मैदानात आलेल्या रित्सू डोआनने ७५व्या मिनिटाला जर्मनीच्या गोलरक्षक मॅन्युएल नॉयरला अगदी सहज चकवले. डोआनला त्या वेळी मैदानात येऊन केवळ चार मिनिटे आणि नऊच सेंकदच झाली होती. सामन्यातील बरोबरीनंतर जपानच्या आक्रमणाला अधिक धार आली आणि आठच मिनिटांनी ८३व्या मिनिटाला ताकुमा असानो याने गोलकक्षात सहा यार्डावरून गोलजाळीचा अचूक वेध घेतला. जर्मनीचा गोलरक्षक नॉयरला चेंडूपर्यंत पोचण्याची संधीही मिळाली नाही. या जबरदस्त गोलने जपानने आघाडी घेतली आणि भरपाई वेळेतही ती कायम राखून धक्कादायक निकालाची नोंद केली.

सामन्यात ७४ टक्के चेंडूवर नियंत्रण ठेवणाऱ्या जर्मनीने जाळीच्या दिशेनेही ९ फटके मारले. या फटक्यात जोर नव्हता, तर कधी त्यांचे प्रयत्न जपानच्या बचाव फळीने मोडून काढले. जपानने जाळीच्या दिशेने चारच फटके मारले व त्यातील दोन फटक्यांनी अचूक काम केले. विश्वचषकाच्या सामन्यात आघाडी घेतल्यानंतर पराभूत होण्याची जर्मनीची ही पहिलीच वेळ ठरली. या सामन्यात गुंडोगनने जर्मनीला आघाडी मिळवून दिली होती, पण ती त्यांना उत्तरार्धात टिकवता आली नाही. सलग दुसऱ्यांदा विश्वचषक स्पर्धेच्या सलामीच्या लढतीत जर्मनीचा पराभव झाला. रशियामध्ये २०१८ साली झालेल्या विश्वचषकात जर्मनीला पहिल्या सामन्यात मेक्सिकोने पराभूत केले होते.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Fifa world cup football tournament defeat germany japan opening doan asano goals ysh
Show comments