Mohammad Hafeez revealed that it took two months to convince Babar Azam : विश्वचषक २०२३ नंतर पाकिस्तान क्रिकेटमध्ये बदल आणि गोंधळ सुरूच आहे. पाकिस्तान क्रिकेटमध्ये दररोज हालचाली होत आहेत. सध्या शेजारच्या देशात पाकिस्तान क्रिकेट लीग खेळवली जात आहे. या लीगदरम्यान काही काळापूर्वी पाकिस्तान संघाच्या संचालकपदावरून पायउतार झालेल्या मोहम्मद हाफीजने बाबर आझमबाबत मोठा खुलासा केला आहे. हाफिजने सांगितले की, पाकिस्तानचा माजी कर्णधार आणि अनुभवी फलंदाज बाबर आझमला टी-२० फॉर्मेटमध्ये तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी मनवायला त्याला दोन महिने लागले.

“बाबरला मनवायला दोन महिने लागले”

पाकिस्तानच्या प्रसिद्ध स्पोर्ट्स शो द पॅव्हेलियनमध्ये माजी पाकिस्तान संघाचे संचालक मोहम्मद हाफिज म्हणाला की, “बाबर आझमला टी-२० फॉर्मेटमध्ये तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी मनवायला मला दोन महिने लागले. मी बाबरला सांगितले की, तुला पाकिस्तान संघासाठी हे करावे लागेल आणि असे करणारा तू देशातील पहिला खेळाडू नाहीस. तू महान खेळाडू आहे, त्यामुळे संघाला शीर्षस्थानी आणण्याची जबाबदारी तुझी आहे.”

“तू तांत्रिकदृष्ट्या खूप सक्षम आहेस”

मोहम्मद हाफीज या शोमध्ये पुढे म्हणाला की, “तू आणि रिझवान महान खेळाडू आहात, पण फक्त तुम्ही दोघे म्हणजे पूर्ण संघ नाही. आपल्याला एक मजबूत संघ बनवायचा आहे, त्यामुळे मला तुला तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करताना पाहायचे आहे. तू गेल्या ६ वर्षांपासून वनडे फॉरमॅटमध्ये तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करत आहेस, त्यामुळे तुला या स्थानावर कोणतीही अडचण येणार नाही. तू तांत्रिकदृष्ट्या खूप सक्षम आहेस.”

हेही वाचा – Manoj Tiwary : ‘तू मॅचनंतर बाहेर भेट, आज तू गेलास…’, गौतम गंभीरशी झालेल्या वादावर मनोज तिवारीचा मोठा खुलासा

हाफिजने बाबरवर केले गंभीर आरोप

या प्रकरणाशिवाय मोहम्मद हाफिजने पाकिस्तानचा माजी कर्णधार बाबर आझम आणि माजी प्रशिक्षकांवरही गंभीर आरोप केले आहेत. तो म्हणाला की, “बाबर आझम आणि माजी प्रशिक्षक मिकी आर्थर आणि ग्रँट ब्रॅडबर्न यांनी फिटनेस प्रशिक्षण थांबवले आणि ते म्हणाले की सध्या फिटनेस ही आमची प्राथमिकता नाही आणि तुम्हाला या खेळाडूंचा फिटनेस तपासण्याची गरज नाही. त्यांना जसे खेळायचे आहे तसे क्रिकेट खेळू द्या.” मात्र, हाफिजच्या या खुलाशांवर बाबर आझमकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.