पालेभाजी हा एक असा अन्नघटक आहे, की तो आजच्या बहुसंख्य तरुण-तरुणींना आहारात आवडत नाही.पण लक्षात घ्या की आजारी पडून औषधे घेणे आणि अशक्तपणा घालवण्यासाठी इंजेक्शन्स, टॉनिक्स घ्यायला लागण्यापेक्षा आपल्या भोजनाच्या ताटातला एक कोपरा पालेभाजीला द्या आणि फरक पहा. भाजी खरेदीसाठी जेव्हा तुम्ही मंडईत किंवा भाजी मार्केटमध्ये जाता तेव्हा असंख्य प्रकारच्या पालेभाज्या ‘आम्हाला न्या आणि आरोग्य सुधारा’ असा संदेश देत तुम्हाला खुणावत असतात. त्यांच्या गुणधर्मांना जाणून घेणे महत्वाचे आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पालक- लोह आणि कॅल्शियम असल्यामुळे रक्तवाढीला आणि हाडे बळकट व्हायला उपयुक्त असते. ज्यांचे पोट वारंवार बिघडते त्यांना तर ही गुणकारी ठरते.

मेथी- मधुमेही व्यक्तीसाठी अत्यंत उपयुक्त असते. भूक आणि अन्नपचन सुधारते, पोटात गॅसेस होत नाहीत.

चाकवत- तापात किंवा अशक्तपणामुळे तोंडाची चव गेली असल्यास चाकवत तोंडाला चव आणते. अॅसिडिटीमुळे छातीत जळजळ होत असल्यास उपयुक्त.

शेपू- गॅसेस, लहान मुलांची पोटदुखी,जंत कृमी मुलींमध्ये अनियमित मासिक पाळीसाठी.

माठ- लाल आणि हिरवा अशा दोन प्रकारात मिळणाऱ्या या भाजीने कृश व्यक्तींचे वजन योग्य प्रमाणात वाढते. आम्लपित्त नियंत्रित होते. तांबडा माठ रक्तवर्धक असतो.

अळू- या भाजीची पाने आणि देठ दोन्ही वापरली जातात. यांमुळे रक्त वाढ होते आणि मलावरोध दूर होतो. प्रसूती झालेल्या स्त्रियांमध्ये दूध कमी येत असल्यास अळूची भाजी द्यावी.

करडई- उष्मांक कमी असल्याने स्थूल व्यक्तींना वजन नियंत्रणासाठी उपयोगी. तांदुळजा- या भाजीचे सेवन डोळ्यांचे विकार, खाज सुटणे, मलावरोध यासाठी उपयुक्त. वयोवृद्ध व्यक्ती, बाळंतीण, गरोदर स्त्रिया यांना खास उपयोगी.

मुळा- कच्चा कोवळा मुळा हा मलमूत्राच्या विकारांवर, तर थोडा जून झालेला पण कच्चा मुळा सलाड म्हणून खाल्ला तर मूळव्याध, पोटातले गॅसेस धरणे, अपचन या पोटाच्या तक्रारी दूर होतात.

अंबाडी- चवीला आंबट लागणाऱ्या या भाजीत क जीवनसत्व आणि खनिज पदार्थ भरपूर असतात. यामुळे प्रतिकारशक्ती वाढून सतत सर्दी खोकला होणे कमी होते.

घोळू- ही वेगळ्या चवीची बुळबुळीत भाजी यकृताचे कार्य सुधारून अन्नपचन करते. पालेभाज्यांचा समावेश आहारात नियमितपणे असावा आणि किमान अर्धा ते एक वाटी रोज खावी. मात्र त्या स्वच्छ धुवूनच वापराव्या. शिजलेल्या भाज्यांचे पाणी टाकून देऊ नये, ते पीठ मळण्यासाठी वापरावे.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Health benifets leafy vegetables are useful for good health nck
Show comments