लहान वयात मैदानी खेळांद्वारे शरीराची भरपूर हालचाल होऊन त्यातून होणारा व्यायाम हल्ली जवळपास बंदच झाला आहे. रोजचे जेवण करताना टाळाटाळ, जेवताना दूरचित्रवाणीचा मोह अशा गोष्टींमुळे योग्य आहारदेखील पोटात जात नाही. या सर्व गोष्टींच्या एकत्रित परिणामामुळे बालकांमध्ये मलावरोधचे प्रमाण वाढत आहे.
लहान मुलांना आठवडय़ात तीनपेक्षा कमी वेळा शौचाला होणे, शौचाला कडक होणे याला बद्धकोष्ठता किंवा मलावरोध म्हणतात. लहान मुलांमध्ये ही समस्या मोठय़ा प्रमाणावर वाढत असल्याचे चित्र आहे. या तक्रारीत दिसणारी लक्षणे आणि त्याला प्रतिबंध कसा करावा हे जाणून घेऊ या..

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

काय करावे?
* खाण्या-पिण्याच्या सवयींमध्ये योग्य बदल करणे महत्त्वाचे आहे. जेणेकरून शरीरात मळ मऊ तयार झाल्यास शौच करताना त्रास होणार नाही.
* जेवणात तंतूमय पदार्थाचे सेवन वाढवणे. केळी, विविध फळे व हिरव्या भाजीपालाचे आहारातील प्रमाण वाढवणे. ज्या भाज्या व फळे सालासकट खाता येतात त्यांची साले न काढता खाणे. बटाटादेखील शक्यतो न सोलताच खाणे.
* मैद्याची रोटी, ब्रेड अशा पदार्थाऐवजी शक्यतो गव्हाची पोळी, ज्वारीची वा इतर पिठांची भाकरी असे पदार्थ खाणे. अति पॉलिश केलेल्या भाताऐवजी अधिक तंतूमय पदार्थ असलेला भात किंवा ‘ब्राऊन राइस’ वापरणे.
* जेवणाबरोबर व इतर वेळीही पुरेसे पाणी पिणे.
* मुलांना उडय़ा मारण्याचे खेळ, सायकलिंग, चेंडू पकडण्याचे, पळण्याचे खेळ अशा मैदानी खेळांसाठी प्रोत्साहन देणे.
* तोंड धुतल्यावर मुलांना पाणी पिण्याची सवय लावणे.
* सकाळी दूध प्यायल्यावर मुलांना न्याहारी करण्याची सवय लावणे.
* शौचाला गेलेल्या मुलांना तेथे थोडा वेळ बसण्याची सवय लावणे.
काय टाळावे?
* मैदायुक्त पदार्थ, सोडा व इतर शीतपेये, फास्ट फूड, जंक फूड व प्रक्रिया केलेले अन्नपदार्थाचे सेवन रोज नको. असे पदार्थ कधी तरीच आहारात घेतलेले बरे.
* मुलांना शौचाला किंवा लघवीला जायचे असल्यास पालकांनी त्यांनी ती क्रिया करण्यासाठी टोकू नये वा प्रतिबंध घालू नये.
* आरोग्यदायी जीवनशैलीचे पालन केल्यास थोडय़ा विलंबाने मलावरोधावर सकारात्मक परिणाम होतो. तेव्हा लगेच आराम पडण्याकरिता घाई करू नये.

लक्षणे
* बालकाच्या पोटात दुखणे.
* शौच करताना त्रास होणे. शौचाच्या वेळी मुलाला जास्त दाब लावण्याची गरज भासणे.
* वारंवार शौचाला जाण्याची इच्छा होणे.
* नेहमी पोट भरल्यासारखे वाटणे.
* शौचाच्या वाटे रक्त जाणे.
* मुलांच्या अंतर्वस्त्रात शौचाचे डाग पडणे.
* उलटय़ा होणे, वजन कमी होत जाणे.

कारणे
* कमी पाणी पिणे.
* खाण्यात तंतूजन्य पदार्थाचे सेवन कमी असणे (उदा. सॅलड, फळे, हिरव्या पालेभाज्या, मोड आलेली कडधान्ये). तसेच जेवणात जंक-फूडचे प्रमाण जास्त असणे.
* खेळताना शौच आल्यास खेळाला प्राधान्य देऊन नैसर्गिक क्रिया टाळणे. शौचाकरिता वेळेवर न जाण्याची सवय लागणे.
* नेहमीपेक्षा वेगळ्या ठिकाणी शौचाला जाण्याची इच्छा नसणे. बाहेर गेल्यावर मुलांनी पालकांना शौचाला जायचे असल्याचे सांगितल्यावर त्यांच्याकडून रागावले जात असले, तर त्या भीतीनेही मुले ही नैसर्गिक क्रिया टाळतात.
* काही विशिष्ट आजारांमुळे किंवा काही आजारांवर दिल्या जाणाऱ्या औषधांमुळेही मलावरोध होऊ शकतो.

पाणी किती प्यावे?
वयोगट                    मात्रा
५ वर्षे                   अर्धा ते १ लिटर
५ ते १०                वर्षे १ ते दीड लिटर
१० ते १८ वर्षे         दीड ते २ लिटर

मराठीतील सर्व लोकआरोग्य बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Constipation in children
Show comments