-विक्रान्त भिसे
विक्रोळी विद्यालयात मी दहावीपर्यंत शिकलो, दहावीत गटांगळ्या खाऊन अखेर कुरियर कंपनीत कामाला लागलो. ‘इन्ट्रासिटी सर्व्हिस’ या कंपनीतलं ते काम बँकिंग क्षेत्रातल्या कुरियरचं होतं. चेक भल्या सकाळी नेमून दिलेल्या ठिकाणी पोहोचवणं, हे माझं काम. ते मी नीट करायचो. चार वर्षांत पगारवाढही दरवर्षी मिळवत होतो. पण कलेकडे ओढा होता. जिमला जाण्याबरोबरच आमच्या एरियातल्या डान्सच्या स्पर्धांतही भाग घ्यायचो. मी सातवीत असतानाच एका वर्तमानपत्रानं शालेय चित्रकला स्पर्धा घेतली, त्यात मला बक्षीस मिळून पेपरात नाव छापून आले होते, इंटरमिजिएट ड्रॉइंग ग्रेड परीक्षेत ‘ए ग्रेड’ आठवीतच मिळाली होती. पण दहावीतच अडल्यामुळे पुढे शिकण्याची इच्छा दबली होती. चार वर्षांनी दहावी झालो, तेव्हा चित्रकला शिकावी- तेसुद्धा ‘जेजे स्कूल ऑफ आर्ट’मध्येच, असे पुन्हा वाटू लागले.

काका प्रकाश भिसे हे चित्रकार आहेत, रहेजा स्कूल ऑफ आर्टमध्ये प्राध्यापकी करून ते निवृत्त झाले. त्यांनी माहिती दिली- ‘जे.जे स्कूल ऑफ आर्ट’मध्ये प्रवेशाचे नियमच बदलले आहेत. आता बारावीच्या मार्कांवर मिळतो प्रवेश. दहावीनंतर चित्रकला शिकायची तर डिग्री नाही, डिप्लोमाच मिळेल. अखेर, जवळ पडेल म्हणून दादरच्या मॉडेल आर्ट इन्स्टिट्यूटला प्रवेश घेतला. कुरियरची नोकरी सोडली. आता ही दुसरी संधी मिळाली आहे, ती घालवायची नाही असे ठरवून कलाशिक्षणातल्या पहिल्या- फाउंडेशनच्या वर्षी दिवसरात्र चित्र काढत राहिलो. दोन-तीन पारितोषिकेही मिळाली. मग डिप्लोमासाठी वांद्य्राला (वांद्रे स्कूल ऑफ आर्ट). तिथे फिल्म इंडस्ट्री, एमटीव्ही अशी काम करत पैसे मिळवून शिकलो. पण जेजेत शिकायचेच, जेजेच्या लायब्ररीत पुस्तके पाहायची- वाचायची म्हणून जेजेतून ‘डीपीएड’ (डिप्लोमा इन आर्ट एज्युकेशन) झालो. ते शिक्षण सुरू असतानाच एका छोट्या शाळेत कलाशिक्षक म्हणून लागलो. त्याआधी अॅड एजन्सीसाठी इलस्ट्रेशन्स केली. कलाशिक्षणाच्या डिप्लोमानंतर ऐरोलीच्या एका शाळेत चांगली नोकरी मिळाली… माझी जोडीदार सिद्धी जाधव ही तर ‘मॉडेल आर्ट इन्स्टिट्यूट’मध्येच भेटली होती, हा झाला माझा व्यक्तिगत प्रवास.

मराठीतील सर्व लोकरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Conceit of painter whose exhibition made critics take the term ambedkari art seriously mrj
First published on: 14-04-2024 at 01:05 IST