राष्ट्रवादी पक्षात फूट पडल्यानंतर या पक्षातील आमदार अपात्रतेवर विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी निर्णय दिला. त्यांनी अजित पवार यांचा गट हाच मूळ राष्ट्रवादी पक्ष आहे, तसेच दोन्ही गटातील आमदार पात्र आहेत, असा महत्त्वाचा निर्णय दिला. या निर्णयानंतर शरद पवार गटातील नेत्यांनी नार्वेकर यांच्यावर टीका केली. नार्वेकर यांनी भाजपा-अजित पवार गटाला पुरक असणारा निर्णय दिला, त्यांच्याकडून दुसऱ्या निर्णयाची अपेक्षा नव्हती असा आरोप केला. याच आरोपांवर खुद्द राहुल नार्वेकर यांनी प्रतिक्रिया दिली. ते आज (२२ फेब्रुवारी) माध्यम प्रतिनिधींशी बोलत होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“निर्णय प्रक्रियेवर दबाव टाकण्यासाठी आरोप”

“निर्णय प्रक्रियेवर दबाव टाकण्यासाठी हेतुपुरस्सर असे आरोप केले जातात. या प्रकरणाशी संबंध नसलेल्या गोष्टी वारंवार बोलल्या जात होत्या. माझा निर्णय चुकीचा असेल किंवा मी कोणाच्या प्रभावाखाली येऊन निर्णय घेतला असेल तर त्यांनी माझ्या निर्णयात काय चुक आहे हे दाखवून द्यावे,” असे आव्हान नार्वेकर यांनी केले.

“निर्णयातील चूक न दाखवता बिनबुडाचे आरोप”

“माझा निर्णय हा कायदेशीर दृष्टीने योग्य आहे. याची त्यांनाही कल्पना आहे. मी दिलेला निर्णय हा सर्वोच्च न्यायालयाने घालून दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसारच आहे. म्हणूनच माझ्या निकालातील चुक न दाखवता केवळ बिनबुडाचे आरोप करणे, हे त्यांच्या सोईचे आहे,” असा आरोप राहुल नार्वेकर यांनी केला.

“कायद्याच्या चौकटीत राहूनच निकाल दिला”

“मला खात्री आहे की मी दिलेला निर्णय हा शास्वत, कायदेशीर आहे. त्यात कोणताही बदल होणार नाही. न्यायालयात जाण्याचा प्रत्येकालाच अधिकार आहे. एखाद्या व्यक्तीला निर्णय मान्य नसेल तर ती न्यायालयात जाऊ शकते. मात्र एखाद्या व्यक्तीने न्यायालयात याचिका दाखल केली म्हणजे मी चुकीचा निर्णय दिला, असे होत नाही. संविधानातील तरतुदींनुसार, विधानसभेतील नियम तसेच माझ्यासमोरच्या पुराव्यांच्या आधारेच मी हा निकाल दिलेला आहे. मी निकाल देताना प्रत्येक मुद्द्यावर सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचा संदर्भ दिला आहे. माझ्या निकालाचे समर्थन कसे केले जाऊ शकते याचीही मी माहिती दिली आहे. त्यामुळे केवळ निर्णय प्रक्रियेवर दबाव टाकण्यासाठी असे आरोप केले जातात. मात्र याला मी बधणार नाही. कायद्याच्या चौकटीत राहूनच मी निर्णय दिलेला आहे,” असे मत नार्वेकर यांनी व्यक्त केले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra assembly president rahul narvekar comment on ncp revolt decision prd