अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा शपथविधी २० जानेवारीला होत असून, या कार्यक्रमासाठी हजारो लोक एकत्र येत आहेत. त्यात भारतीय वंशाच्या अमेरिकी व्यक्तींचा समावेश आहे. ट्रम्प यांच्या शपथविधी सोहळ्यासाठी भारतातूनही जवळपास ३० जणांची एक टीम अमेरिकेत दाखल झाली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या शपथविधी सोहळ्यातील कार्यक्रमासाठी नालासोपाऱ्याच्या सुरेश मुकुंद या नृत्यदिग्दर्शकासह त्याची टीम या सोहळ्याची रंगत वाढविणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

२९ वर्षीय सुरेश मुकुंद त्याच्या टीमसह गेल्या काही दिवसांपूर्वीच वॉशिंग्टनमध्ये दाखल झाला असून सध्या या सोहळ्याच्या पूर्वतयारीमध्ये तो आणि त्याची टीम व्यग्र आहे. या खास सोहळ्यासाठी सुरेश फारच उत्सुक असून ही त्याच्या आयुष्यातील एक मोठी संधी आहे यात शंकाच नाही. ‘हे एक स्वप्न सत्यात उतरण्याप्रमाणेच आहे. मी आणि माझा सहाय्यक कार्तिक प्रियदर्शन या सोहळ्यासाठी आमच्या टीमसोबत कसून तयारी करत आहोत. गेल्या काही दिवसांपासून भारतीय आणि अमेरिकन परफॉर्मर्स एकत्र येऊन उत्तम परफॉर्मन्स देण्यासाठीची तयारी करत आहोत’, असे सुरेश पीटीआय या वृत्तसंस्थेशी बोलताना म्हणाला.

सर्व जगाच्याच नजरा डोनाल्ड ट्रम्प यांच्या शपथविधी सोहळ्याकडे लागल्या आहेत. या सोहळ्यासाठी सर्वजण खास तयारी करत असून नालासोपाऱ्याच्या सुरेश मुकुंद या नृत्यदिग्दर्शकाने सात मिनिटांच्या एका खास परफॉर्मन्सची तयारी केली आहे. ज्यामध्ये त्याने भारतीय शास्त्रीय नृत्य आणि बॉलिवूड अशा विविध धाटणीच्या परफॉर्मन्सची तयारी केली आहे. माजी मिस इंडिया मनस्वी ममगईसुद्धा या शपथविधी सोहळ्यामध्ये डान्स परफॉर्मन्स करणार आहे. अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा शपथविधी सोहळा वेस्ट लॉन येथे पार पडणार आहे.

दरम्यान, ट्रम्प यांच्या शपथविधी कार्यक्रमाची तयारी जोरात सुरू असून सर्वत्र उत्साह आहे. ट्रम्प यांना विजय मिळवून देणाऱ्या ‘मेक अमेरिका ग्रेट अगेन’ या घोषवाक्यावर भर देण्यात आला आहे. अनुचित प्रकार घडू नये यासाठी अभूतपूर्व सुरक्षा ठेवण्यात आली असून, अध्यक्ष बराक ओबामा यांनी सुरक्षेचा आढावा घेतला. ट्रम्प यांना फार मोठा पाठिंबा मिळत आहे, त्यामुळे शपथविधी कार्यक्रम ऐतिहासिक असेल असे व्हाइट हाऊसचे प्रसिद्धी सचिव सीन स्पायसर यांनी सांगितले.
शुक्रवारच्या शपथविधीआधी ट्रम्प यांच्या समर्थकांनी विविध कार्यक्रम सुरू केले आहेत. उद्या ट्रम्प व उपाध्यक्ष माइक पेन्स हे अरलिंग्टन नॅशनल सिमेट्री येथे जाऊन पुष्पचक्र वाहणार आहेत. ऐतिहासिक नॅशनल मॉल येथेही उत्सवी वातावरण आहे. लिंकन मेमोरियल येथे देशातील कलाकार कार्यक्रम सादर करणार आहेत. ग्रुसीचा आतषबाजी कार्यक्रम व मिलिटरी बँडचा सहभाग ही वैशिष्ट्ये ठरणार आहेत.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: A young choreographer from nalasopara will give bollywood flavour in trumps swearing in ceremony
Show comments