"एकनाथ शिंदेंनी एका रात्रीत कांडी फिरवली अन्..." असे धंदे मी करत नाही म्हणत राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल! | mns chief raj thackeray speech in mumbai gatadhyaksha melava on uddhav thackeray rmm 97 | Loksatta

“एकनाथ शिंदेंनी एका रात्रीत कांडी फिरवली अन्…” असे धंदे मी करत नाही म्हणत राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल!

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

“एकनाथ शिंदेंनी एका रात्रीत कांडी फिरवली अन्…” असे धंदे मी करत नाही म्हणत राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल!

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. उद्धव ठाकरेंनी भाजपाशी युती तोडून महाविकास आघाडीसोबत सत्ता स्थापन करण्यावरून राज ठाकरेंनी हल्लाबोल केला. स्वार्थ आणि पैशांसाठी आपण कधी विचारांशी प्रतारणा केली नाही, असं म्हणत राज ठाकरेंनी सडकून टीका केली आहे. ते मुंबईतील नेस्को सेंटरमध्ये आयोजित गटाध्यक्ष मेळाव्यात बोलत होते.

महाराष्ट्रात जेव्हा रझा अकादमीने आंदोलन केलं होतं. तेव्हा आंदोलनकर्त्यांनी महिला पोलिसांना बाजूला नेऊन त्यांची छेड काढण्याचा प्रकार केला होता. त्यांनी पोलिसांच्या गाड्या जाळल्या होत्या. त्यावेळी केवळ मनसेनं त्यांच्याविरोधात आंदोलन केलं होतं. तेव्हा केवळ हिंदुत्व-हिंदुत्व करत बसलेले कुठे होते? या लोकांना काही देणं-घेणंच नाही, अशी टीका राज ठाकरेंनी केली.

उद्धव ठाकरेंवर टीकास्र सोडताना राज ठाकरे म्हणाले, “काल-परवा मुख्यमंत्री पदावर असलेले आणि आता बाहेर पडलेले… मुख्यमंत्री पदावर असताना ते तब्येतीचं कारण सांगून बाहेर पडत नव्हते. एकनाथ शिंदेंनी एका रात्रीत कांडी फिरवली आणि आता ते सगळीकडे फिरत आहेत. यांच्यासारखं वागणाऱ्यातला मी नाही. स्वत:चा स्वार्थ आणि पैशांसाठी दिसेल त्याचा हात धरायचा आणि बागेमध्ये कोपऱ्यात जाऊन बसायचं, हे असले धंदे मी करत नाही.

मराठी किंवा हिंदुत्वाच्या मुद्यावर उद्धव ठाकरेंवर एकतरी गुन्हा दाखल आहे का? त्यांनी कधी भूमिकाच घेतली नाही, त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल नाही. फक्त स्वार्थासाठी आणि पैशांसाठी सगळ्या गोष्टी करायच्या. कधी हा तर कधी तो… असं करत सत्तेत बसायचं. पाकिस्तानी कलाकार जेव्हा भारतात धुडगूस घालत होते, तेव्हा त्यांच्या पार्श्वभागावर लाथ मारून मनसेनं त्यांना हाकलून दिलं होतं. तेव्हा हे हिंदुत्ववादी कुठे होते. आता ते म्हणतात राज ठाकरे हिंदुत्ववादी झाले. पण मी आधीपासूनच हिंदुत्ववादी आहे. एका हिंदुत्ववादी आणि कट्टर मराठी घरात माझा जन्म झाला आहे, अशी टीका राज ठाकरेंनी केली आहे.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 27-11-2022 at 19:53 IST
Next Story
राज ठाकरेंची मुंबईत मोठी घोषणा! मनसेच्या आंदोलनांची माहिती देणारी पुस्तिका करणार प्रकाशित