क्रॉफर्ड मार्केटमध्ये एका मासळी विक्रेत्याकडील एका माशाने सोमवारी अनेकांचे लक्ष वेधून घेतले. तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार या विचित्र आकाराच्या माशाचे ‘सन फिश’ असे नाव असून हा मासा अत्यंत दुर्मीळ असून तो मुंबईनजीकच्या समुद्रात आढळत नसल्याने तज्ज्ञांनीदेखील आश्चर्य व्यक्त केले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

समुद्रात अनेकदा अनाकलनीय व गूढ गोष्टी वारंवार आढळत असतात. या सागरी जीवांचे प्रमाण मोठे असून सोमवारी असाच एक दुर्मीळ व अजब आकाराचा आणि अडीच फूट लांब मासा एका मच्छीविक्रेत्याला वसई व मुंबईदरम्यानच्या समुद्रात सापडला. नियमित मासे पकडण्याच्या जाळ्यात हा मासा आल्याचे मच्छीविक्रेते मोहम्मद रिझवान यांनी सांगितले. त्यांनी तो क्रॉफर्ड मार्केटमधील त्यांच्या दुकानात आणला असता अनेकांनी असा मासा प्रथमच पाहत असल्याचे सांगितले. त्यांनी या माशाबाबत सागरी अभ्यासक प्रदीप पाताडे यांना माहिती दिली. त्यांनी तात्काळ या माशाबाबत ज्येष्ठ सागरी संशोधक डॉ. विनय देशमुख यांना कळवले.

त्यांनी हा मासा ‘सन फिश’ असल्याचे स्पष्ट केले. क्रॉफर्ड मार्केटमध्ये रिझवान यांनी हा मासा दोन दिवसांपासून बर्फात ठेवला असून त्याची अद्याप कोणी खरेदी केलेली नाही. त्यामुळे दोन दिवसांत हा मासा खराब होणार असल्याने तो नष्ट करण्यासाठी पाठवला जाईल असे रिझवान यांनी सांगितले. तसेच गेल्याच महिन्यात अलिबागमधील एका कोळ्यालादेखील हा मासा आढळल्याचे रिझवान यांनी सांगितले.

‘सन फिश’ हा खोल समुद्रात,  आढळतो. तो आडवा पडलेल्या स्थितीत तरंगतो, त्यामुळे तो मेला असावा, अशी शंका येऊ शकते. हा मासा अत्यंत दुर्मीळ असून तो सहसा आढळत नाही. ४० वर्षांपूर्वी या जातीचे मासे मुंबईच्या किनाऱ्यावर आढळत होते. हे ७ किलोपासून २० किलोपर्यंत वाढतात. शैवाळ हे त्यांचे खाद्य आहे. बऱ्याचदा समुद्रातील अंतर्गत प्रवाह बदलल्याने हे मासे क्वचित किनाऱ्याकडे येतात.

– डॉ. विनय देशमुख, सागरी संशोधक

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rare sunfish reaches in crawford market
Show comments