चंद्रपूर : लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत विधानसभा निवडणुकीवर लक्ष ठेवून असलेल्या इच्छुकांनी आतापासूनच जनसंपर्क अभियान सुरू केले आहे. आगामी विधानसभा पक्षाच्या चिन्हावर लढण्याची घोषणा करणारे अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांनी अम्मा टिफिन वितरणाच्या माध्यमातून गाठीभेटी सुरू केल्या तर काँग्रेसचे महेश मेंढे यांनी सांस्कृतिक कार्यक्रमातून जनसंपर्क मोहीम सुरू केली आहे. इतर इच्छुकही विविध माध्यमातून जनसंपर्क मोहीम राबवत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

लोकसभा निवडणुकीनंतर या जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीवर डोळा ठेवून असलेले अनेक इच्छुक आतापासूनच विविध माध्यमातून जनसंपर्क अभियान राबवत आहे. या जिल्ह्यात चंद्रपूर, राजुरा, बल्लारपूर, चिमूर, ब्रम्हपुरी व वरोरा हे सहा विधानसभा मतदारसंघ आहेत. या सहापैकी चंद्रपूर विधानसभा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी आरक्षित आहे. येथे अपक्ष किशोर जोरगेवार आमदार आहेत. मात्र, त्यांनी एक वर्षापूर्वीच आगामी विधानसभा निवडणूक कोणत्याही एका पक्षात प्रवेश करून पक्षाच्या चिन्हावर लढण्याची घोषणा केली होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सरकारला समर्थन देणारे आमदार जोरगेवार आगामी निवडणूक शिंदे शिवसेनाकडून लढण्याची अधिक शक्यता आहे. त्यामुळेच त्यांनी जनसंपर्क अभियानावर भर दिला आहे. शहरातील मान्यवर डॉक्टर, सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार तसेच मॉर्निंग वॉक ग्रुपला गाठीभेटी देऊन जनसंपर्क अभियान सुरू केले आहे. या माध्यमातून अम्मा टिफिनचे वितरणही आमदार जोरगेवार यांनी सुरू केले आहे. २०० युनिट मोफत हा मुद्दा आमदार जोरगेवार यांच्यासाठी अडचणीचा विषय आहे. त्यामुळेच जोरगेवार सहा महिन्यांपूर्वीपासूनच तयारीला लागले आहेत.

हेही वाचा…उन्हाच्या तडाख्यात शासकीय रुग्णालयात रुग्णांच्या रांगा, उष्माघात नव्हे…

काँग्रेसचे २०१९ चे पराभूत उमेदवार महेश मेंढे यांनी सांस्कृतिक कार्यक्रमाच्या मेजवानीतून संपर्क सुरू केला आहे. यासोबतच इतर पक्षातील इच्छुक उमेदवारांनीही जनसंपर्कावर भर दिला आहे. यामध्ये भाजपकडून ब्रिजभूषण पाझारे, ॲड. राहुल घोटेकर, काँग्रेसकडून प्रवीण पडवेकर आहेत. सेवानिवृत्त पोलीस अधिकारी सुधाकर अंभोरे यांनीही तयारी सुरू केली आहे. बल्लारपूर विधानसभा मतदारसंघात इच्छुकांची सर्वाधिक गर्दी बघायला मिळत आहे. येथे चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे विद्यमान अध्यक्ष तथा काँग्रेस नेते संतोष रावत, प्रदेश युवक काँग्रेसच्या महासचिव शिवानी वडेट्टीवार, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे अध्यक्ष राजेंद्र वैद्य, काँग्रेसकडून डॉ. विश्वास झाडे, ॲड. विजय मोगरे, माजी आमदार देवराव भांडेकर, घनश्याम मुलचंदानी, प्रकाश पाटील मारकवार, राजू झोडे, बंडू धोतरे, नंदू नागरकर, नंदू खनके, भाजपचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा, देवराव भोंगळे, चंदनसिंग चंदेल, संध्या गुरुनुले, शिवसेनेचे संदीप गिऱ्हे यांच्यापासून अनेक इच्छुक विधानसभेच्या तयारीला लागले आहेत. लोकसभा निवडणुकीत अनेक जण बल्लारपूर विधानसभा मतदारसंघाच्या बाहेर पडलेच नाहीत. राजुरा विधानसभा मतदारसंघात भाजपकडून माजी आमदार ॲड. संजय धोटे, माजी आमदार सुदर्शन निमकर, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष देवराव भोंगळे यांनी तयारी सुरू केली आहे. तर काँग्रेसचे विद्यमान आमदार सुभाष धोटे यांचे बंधू अरुण धोटे यांनाही उमेदवारी हवी आहे.

हेही वाचा…रॅगिंग सुरूच! महाविद्यालय व विद्यापीठांवर कठोर कारवाई करण्याचा यूजीसीचा इशारा

अनेकांची तयारी सुरू

वरोरा विधानसभा मतदारसंघात आमदार प्रतिभा धानोरकर यांचे दीर अनिल धानोरकर विधानसभेसाठी इच्छुक आहेत. तर भाजपकडून रमेश राजुरकर यांना उमेदवारी हवी आहे. चिमूर विधानसभेत काँग्रेसकडून डॉ. अविनाश व डॉ. सतीश वारजूकर हे दोघेही इच्छुक आहेत. ब्रम्हपुरीत विरोधी पक्षनेते आमदार विजय वडेट्टीवार यांच्या विरोधात भाजपकडे चेहरा नसला तरी माजी आमदार अतुल देशकर यांच्यासह तिथेही अनेकांनी तयारी सुरू केली आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Aspirants gear up for assembly elections in chandrapur public relations campaigns underway rsj 74 psg