Premium

अजित पवारांची बारामतीमध्ये कसोटी

स्थानिक भाजप नेत्यांचा विरोध डावलून पुणे जिल्ह्याचे पालकमंत्रीपद भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने अजित पवार यांच्याकडे सोपविण्यास मान्यता दिल्याने आता अजितदादांची पुणे जिल्ह्यात खरी कसोटी आहे.

ajit pawar in baramati politics
अजित पवारांची बारामतीमध्ये कसोटी

संतोष प्रधान

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

स्थानिक भाजप नेत्यांचा विरोध डावलून पुणे जिल्ह्याचे पालकमंत्रीपद भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने अजित पवार यांच्याकडे सोपविण्यास मान्यता दिल्याने आता अजितदादांची पुणे जिल्ह्यात खरी कसोटी आहे. कारण बारामती लोकसभा मतदारसंघात चुलत बहिण सुप्रिया सुळे यांना मदत होईल अशी भूमिका घेणार की भाजपला अपेक्षित निकाल मिळवून देण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा करणार याची आता साऱ्यांनाच उत्सुकता असेल. पुणे जिल्ह्यात लोकसभेचे चार मतदारसंघ आहेत. चारही मतदारसंघात भाजपला अपेक्षित असलेले यश मिळवून देण्याचे मोठे आव्हान आता पालकमंत्री म्हणून अजित पवारांसमोर असेल.

शिवसेना आणि राष्ट्रवादीतील फुटीनंतर भाजपने राज्यात लोकसभेच्या ४८ पैकी ४५ जागा जिंकण्याचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. मिशन-४५ अंतर्गत भाजपने तयारी सुरू केली आहे. स्थानिक भाजप नेत्यांच्या विरोधानंतर तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची फार काही इच्छा नसतानाही पुणे जिल्ह्याचे पालकमंत्रीपद अजित पवारांकडे सोपविण्यात आले. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट घेतल्यावर पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाचा तिढा सुटल्याने शहा यांनी अजितदादांच्या बाजूने कौल दिल्याचे स्पष्टच होते. आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपला अपेक्षित यश मिळवून देण्याचे अजित पवार यांच्यासमोर आव्हान असेल.

हेही वाचा >>> अजित पवारांच्या मनासारखे झाले; छगन भुजबळ, आदिती तटकरे यांच्यासाठी प्रतीक्षा

अजित पवार यांची खरी कसोटी बारामती लोकसभा मतदारसंघात लागणार आहे. चुलत बहिण सुप्रिया सुळे यांना मदत होईल अशी भूमिका अजितदादा घेणार का ? हा प्रश्न राजकीय वर्तुळात चर्चिला जात आहे. बारामती मतदारसंघ जिंकण्याचे भाजपचे यंदा ध्येय आहे. भाजपने बारामती मतदारसंघ प्रतिष्ठेचा केल्यास अजित पवारांची भूमिका काय असेल, याचीही उत्सुकता असेल. खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडून सातत्याने बहिण-भावाच्या नात्याचा उल्लेख केला जात असला तरी यंदाच्या रक्षाबंधनाला दोघे बहिण-भाऊ एकत्र आले नव्हते.

हेही वाचा >>> भाजपच्‍या कुरघोडीमुळे आमदार बच्‍चू कडू अस्‍वस्‍थ!

तसेच बंडानंतर शरद पवार यांना निवृत्त होण्याचा सल्ला अजित पवार यांनी दिला होता. यावरून पवार घराण्यात पूर्वीएवढे सख्य राहिलेले दिसत नाही. बारामतीमध्ये अजित पवार यांचा गट सुप्रिया सुळे यांच्या विरोधात उमेदवार उभा करणार का? भाजपने एखादा उमेदवार उभा केल्यास त्याला निवडून आणण्याकरिता अजित पवार प्रयत्न करणार का? हे सारे गुंतागुंतीचे प्रश्न आहेत. यामुळेच अजित पवार यांची बारामतीमधील भूमिका निर्णायक ठरणार आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Ajit pawar important role in baramati after pune district guardianship print politics news ysh

First published on: 05-10-2023 at 11:20 IST
Next Story
रायगडमध्ये तटकरे की शिंदे गट बाजी मारणार?