आगामी लोकसभा निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर आली आहे. त्या अनुषंगाने देशातील सर्वच राष्ट्रीय आणि प्रादेशिक पक्षांनी तयारीला सुरुवात केली आहे. भाजपासारख्या पक्षातील बडे नेते देशाच्या वेगवेगळ्या भागात जाऊन लोकांशी संवाद साधण्याचा प्रयत्न करत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी हेदेखील आपल्या सभेच्या माध्यमातून विरोधकांना लक्ष्य करत आहेत. शनिवारी (३ फेब्रुवारी) मोदी ओडिसा दौऱ्यावर होते. या दौऱ्यादरम्यान त्यांनी एका सभेला संबोधित केले. यावेळी बोलताना त्यांनी ओडिसा राज्यातील नवीन पटनाईक सरकारवर भाष्य करण्याऐवजी काँग्रेसवरच टीका करणे पसंत केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भाषणात काँग्रेसवर टीका, पटनाईक सरकारवर मात्र शब्दही नाही

गेल्या २४ वर्षांपासून ओडिसामध्ये बिजू जनता दलाचे प्रमुख नवीन पटनाईक यांचे सरकार आहे. स्थानिक पातळीवर तेथे भाजपा हा प्रमुख विरोधी पक्ष आहे. त्यामुळे त्या राज्यात गेल्यानंतर नरेंद्र मोदी नवीन पटनाईक यांच्यावर टीका करतील, तेथील प्रशासनाच्या त्रुटींवर बोट ठेवतील अशी अपेक्षा अनेकांना होती. मात्र, सभेत मोदींनी पटनाईक यांना लक्ष्य करण्याऐवजी काँग्रेसची राजवट कशी भ्रष्ट होती, काँग्रेसच्या राजवटीत ओडिसाशी कशा प्रकारे दुजाभाव करण्यात आला, यावरच भाष्य केले.

मोदी-पटनाईक एकाच मंचावर

आपल्या ओडिसा दौऱ्यादरम्यान मोदींनी संबलपूर येथील आयआयएम कॅम्पसच्या उद्घाटन समारंभाला हजेरी लावली. यावेळी नवीन पटनाईक हेदेखील उपस्थित होते. या कार्यक्रमात बोलताना मोदींनी नवीन पटनाईक यांना मित्र म्हणून संबोधित केले, तर नवीन पटनाईक यांनीदेखील मोदींचे कौतुक केले. मोदींनी भारताला नवा मार्ग आखून दिला असून आपण आर्थिक शक्ती बनण्याच्या मार्गावर आहोत, असे पटनाईक म्हणाले.

भाषणात ओडिसाला दिलेल्या आर्थिक मदतीची उजळणी

या कार्यक्रमानंतर त्यांनी स्थानिक नेत्यांनी आयोजित केलेल्या संबलपूर येथील सभेला संबोधित केले. यावेळी बोलताना ओडिसाच्या विकासासाठी केंद्र सरकारने किती निधी दिला, २०१४ सालाच्या आधी किती निधी मिळायचा, आता किती निधी मिळतोय याची तुलना केली.

२०१९ मध्ये मोदींकडून पटनाईक यांच्यावर टीका

याआधी मोदींनी २३ एप्रिला २०१९ रोजी ओडिसात एका सभेला संबोधित केले होते. २०१९ सालच्या लोकसभा निवडणुकीआधी त्यांनी ही सभा घेतली होती. आपल्या या सभेत त्यांनी नवीन पटनाईक यांच्यावर सडकून टीका केली होती. भाजपाच्या कार्यकर्त्यांना मारले जात आहे, असा आरोपही त्यांनी यावेळी केला होता. २२ एप्रिल २०१८ रोजीच्या झारसगुडा येथील सभेत त्यांनी नवीन पटनाईक हे भ्रष्ट नेते आहेत, असा आरोप केला होता.

भाजपाच्या स्थानिक नेत्यांचे भाषणाकडे लक्ष

मोदींच्या संबलपूर येथील भाषणाकडे ओडिसामधील भाजपा कार्यकर्त्यांचे विशेष लक्ष होते. मोदी आपल्या भाषणाच्या माध्यमातून ओडिसातील राजकारणाची दिशा ठरवून देतील, अशी अपेक्षा या नेत्यांना होती. कारण स्थानिक पातळीवर भाजपाच्या नेत्यांकडून नवीन पटनाईक सरकारवर सडकून टीका केली जाते. त्यामुळे मोदीदेखील पटनाईक यांच्यावर टीका करतील, असे तेथील भाजपाचे नेते आणि कार्यकर्त्यांना वाटले होते. प्रत्यक्षात मात्र तसे झाले नाही. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाची ओडिसा राज्यासाठी काय रणनीती असणार? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Narendra modi visit odisha criticizes congress and praises naveen patnaik prd