पवना धरणामध्ये ४८ टक्के पाणीसाठा

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पिंपरी-चिंचवड शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पवना धरणामध्ये ४८ टक्के पाणीसाठा आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवड शहरवासीयांना यंदाच्या उन्हाळ्यात दररोज पाणी मिळणार आहे. गतवर्षी एक दिवसाआड पाणी देण्यात आले होते. मात्र, या वर्षी पाणीकपातीचे संकट टळले आहे.

पालकमंत्री गिरीश बापट यांच्या अध्यक्षतेखाली पुण्यात पाटबंधारे विभागाचे अधिकारी तसेच पिंपरी-चिंचवडचे आयुक्त आणि पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीमध्ये धरणातील पाणीसाठय़ाचा आढावा घेण्यात आला. बैठकीला पालकमंत्री गिरीश बापट, जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे, महापालिका आयुक्त श्रावण हार्डीकर, पाणीपुरवठा विभागाचे सहशहर अभियंता रवींद्र दुधेकर, प्रवीण लडकत, रामदास तांबे आदी उपस्थित होते.

पिंपरी-चिंचवड शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पवना धरणामध्ये ४८ टक्के पाणीसाठा आहे. शहरासाठी पवना धरणातून रोज ४८० दशलक्ष लिटर पाणी उचलले जाते. पालकमंत्र्यांनी पिंपरी-चिंचवड शहरासाठी ०.५ टीएमसी जास्तीचे पाणी उचलण्यासही परवानगी दिली आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवडकरांना या वर्षी उन्हाळ्यात पुरेसे पाणी मिळणार आहे.

गेल्यावर्षी पाटबंधारे विभागाने पिंपरी-चिंचवड महापालिकेला पाणीपुरवठा कपातीच्या सूचना केल्या होत्या. त्यामुळे शहरात दोन महिने एक दिवसआड पाणीपुरवठा केला जात होता. या वर्षीही एक दिवसआड पाणीपुरवठा करण्याबाबत चर्चा सुरू होती. मात्र, पाटबंधारे विभागाने पिंपरी-चिंचवड महापालिकेला दिलासा देत सध्या घेतले जाते तेवढेच पाणी घेण्याची परवानगी दिली आहे. पिंपरी-चिंचवड शहरामध्ये उन्हाळ्याच्या दिवसात पाण्याची मागणी जास्त असली, तरी पिंपरी-चिंचवडकरांना पुरेसे पाणी देण्यासाठी पाणीपुरवठा विभागाने योग्य नियोजन केले आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: No water cut in pimpri chinchwad
Show comments