Premium

मागासवर्ग आयोगाच्या सदस्यपदाचा राजीनामा देणाऱ्या ॲड. बालाजी किल्लारीकर यांनी का घेतली शरद पवारांची भेट?

राज्य मागासवर्ग आयोगाच्या सदस्यपदाचा राजीनामा देणाऱ्या ॲड. बालाजी किल्लारीकर यांनी शनिवारी शरद पवार यांची मुंबईत भेट घेतली.

Balaji Killarikar meet Sharad Pawar
मागासवर्ग आयोगाच्या सदस्यपदाचा राजीनामा देणाऱ्या ॲड. बालाजी किल्लारीकर यांनी का घेतली शरद पवारांची भेट? (छायाचित्र – लोकसत्ता ग्राफिक्स)

पुणे : मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी केवळ त्याच समाजाचे सर्वेक्षण करण्याऐवजी राज्यात सर्व जातींचे सर्वेक्षण करण्यात यावे, या भूमिकेवरून राज्य मागासवर्ग आयोगाच्या सदस्यपदाचा राजीनामा देणाऱ्या ॲड. बालाजी किल्लारीकर यांनी शनिवारी शरद पवार यांची मुंबईत भेट घेतली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या भेटीनंतर बालाजी किल्लारीकर यांनी महाराष्ट्रात जातनिहाय जनगणना करण्याच्या आपल्या भूमिकेला शरद पवार यांचा पाठिंबा असल्याचे सांगितले. ते म्हणाले, राज्य मागासवर्ग आयोगासमोर सध्या दोन महत्त्वाचे प्रश्न आहेत. त्यापैकी एक प्रश्न मराठा आरक्षणाचा आहे. दुसरा प्रश्न हा ओबीसी समाजाच्या समस्यांबाबतचा आहे. मराठा समाजाचे आरक्षण सर्वोच्च न्यायालयात टिकवण्याच्यादृष्टीने मी आयोगासमोर असा प्रस्ताव मांडला होता. महाराष्ट्रात संपूर्ण जातीय जनगणना झाली पाहिजे. त्यामध्ये जी काही आकडेवारी येईल, त्याचा तुलनात्मक अभ्यास करुन प्रश्न सोडवला पाहिजे. मराठा आरक्षण या नावाने आरक्षण दिले नाही, तरी ‘ईडब्ल्यूएस’सारखा विशिष्ट वर्ग तयार करुन मराठा समाजाला आरक्षण देता येईल, अशी माझी भूमिका होती. पण शासनाच्या माझ्या भूमिकेत फरक पडत होता. त्यामुळे मी नाराजीने राजीनामा दिला. मी आज या सगळ्याबाबत पवार यांच्याशी चर्चा केली. जातनिहाय जनगणना झाली पाहिजे. राज्य मागासवर्ग आयोगाच्या माध्यमातून सर्व जातींचे सामाजिक आणि आर्थिक मागासपण तपासण्यासाठी सर्वेक्षण झाले पाहिजे, हे मी पवार यांना सांगितले. त्यांचा माझ्या भूमिकेला पाठिंबा आहे.

हेही वाचा – टाकाऊ रेल्वे डब्यातून साकारले उपाहारगृह

हेही वाचा – पुणे : महात्मा गांधी रस्त्यावर सराफ व्यावसायिकावर कोयत्याने वार

महाराष्ट्रात सध्या मेळावे आणि काही संघटनांच्या माध्यमातून वितुष्ट निर्माण झाले आहे. हे वातावरण निवळायचे असेल तर जातनिहाय जनगणना गरजेची आहे. राज्य मागासवर्ग आयोगातील सदस्य बाहेर कुठल्या पदावर आहेत, कोणत्या समाजाची सेवा करतात, हे महत्त्वाचे नाही. आयोगात बसल्यावर त्यांनी न्याय आणि तटस्थ भूमिका घेणे आवश्यक आहे. संबंधित जातीलाच प्राधान्य देणारी भूमिका त्याने घेता कामा नये. त्यांनी सर्व समाजाचा विचार केला पाहिजे. शरद पवार यांचा जातनिहाय जनगणनेला पाठिंबा आहे. सर्वपक्षीय बैठक बोलावण्यासाठी राज्य सरकारकडे आग्रह धरावा, अशी विनंती मी त्यांना केल्याचे किल्लारीकर यांनी सांगितले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Why did balaji killarikar who resigned as a member of backward classes commission meet sharad pawar pune print news psg 17 ssb

First published on: 03-12-2023 at 12:24 IST

आजचा ई-पेपर : पुणे

वाचा